आजच्या तरुण पिढीला जास्त पैसे मिळतात; परंतु त्यासाठी त्यांना कोणती किंमत मोजावी लागते, याचा विचार केला जात नाही. कंपन्यांचे हितसंबंध जपताना तरुण पिढीला आपण अकाली वृद्धत्वात किंवा मृत्यूच्या दाढेत ढकलत आहोत, याचे भान राखले जात नाही. फक्त आठ तास काम करण्याच्या कायद्यामुळे जगाच्या आपण मागे पडलो, याचा साक्षात्कार सरकारला झाला आणि सरकारने कामगार कायद्यात दुरुस्त्या केल्या. उद्योजकांच्या भल्यासाठी कामगार कायदे दुरुस्त करताना त्यात तरुण पिढीच्या आरोग्याशी आपण खेळतो आहोत, याचे भान ना सरकारला राहिले ना नफा कमवण्याच्या मागे लागलेल्या उद्योजकांना. टार्गेट ओरिएंटेड काम करून घ्यावे, त्याला विरोध असण्याचे काहीच कारण नाही; परंतु हे करताना टार्गेट किती असावे, हे ही एकदा ठरवले पाहिजे. तरुण पिढी कंपन्यांत १२-१२ तास काम करीत असेल आणि त्यांचा प्रवासाचा वेळ दररोज सरासरी दोन तास असेल, तर २४ तासांपैकी त्याच्याकडे दहा तासच उरतात. याशिवाय काम संपल्यानंतर घरी आले, तरी कंपन्यांतून फोन काही थांबत नाही. अशा वेळी ही तरुण पिढी कुटुंबीयांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. स्वतःसाठी ही वेळ काढू शकत नाही. दडपण, तणावाखाली त्यातील काही व्यसनाधीन होतात. व्यसनांचे समर्थ नाही; परंतु आपली व्यवस्था त्यांना त्यात ढकलत आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी अनेक मार्ग असताना या मार्गांचा अंगीकार करण्याऐवजी सोपा मार्ग म्हणून ही पिढी व्यसनांकडे वळते. आजचे युग हे तणावाचे युग आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तणावातून जात आहे. जणू कामाचा ताण ही आजच्या काळातील एक सामान्य समस्या बनली आहे; पण प्रश्न असा पडतो, की माणूस किती ताण सहन करू शकतो? कधी-कधी कामाचा ताण इतका वाढतो, की त्यामुळे मृत्यूही ओढावतो. पुण्यात ॲना सेबॅस्टियन पेरिल या २६ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटचा मृत्यू झाला. जीवनात यशस्वी होण्याची अनेक स्वप्ने उराशी बाळगून नोकरी करायची, जोडीदार निवडायचा आणि त्याच्यासोबत सुखदुःख वाटून घेत जीवन जगायचे अशी स्वप्ने ॲनाने पाहिली असतील. चेन्नईतून ही स्वप्ने घेऊनच ती एक हजार किलोमीटर दजूर आली. कथितपणे कामाच्या जास्त ताणामुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या आईनेच तशी तक्रार केली. युवतीच्या मृत्यूनंतर ‘अर्न्स्ट अँड यंग इंडिया’ या कंपनीवर गंभीर आरोप केले जात आहेत. थकवा जाणवत असल्याच्या तक्रारीनंतर अॅना सेबॅस्टियनला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर निधन झाले.
अॅनाची आई अनिता ऑगस्टिन यांनी ‘ईवाय इंडिया’चे प्रमुख राजीव मेमोनी यांना पत्र लिहिल्यानंतर ही बाब चर्चेत आली. त्यांचे हे पत्र ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाले. अॅनाच्या आईने सांगितले, की तिची मुलगी कामाच्या ओझ्यामुळे खूप तणावाखाली होती. ती अनेकदा रात्री उशिरापर्यंत काम करायची आणि कधी-कधी वीकेंडलाही काम करायची. आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी कंपनीने एकाही कर्मचाऱ्याला पाठवले नाही, ही बाब अत्यंत निराशाजनक असल्याचा आरोपही त्यांनी केला. माणुसकी म्हणून तरी किमान तिच्या कंपनीतील सहकारी किंवा विभागप्रमुखांनी तिच्या अंत्यसंस्काराला हजर राहणे आवश्यक होते; परंतु नफेखोरीच्या मागे आणि करिअरच्या मागे लागलेल्यांना माणुसकीच राहिली नाही. त्यांची मने असंवेदनशील झाली आहेत.
ॲनाच्या आईचे पत्र व्हायरल झाल्यानंतर कंपनीला आम्ही तरुणांसाठी किती करतो, हे सांगण्याची वेळ आली, यातच सारे आले. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी अॅनाच्या मृत्यूचे कारण तपासले जाईल, असे सांगितल्यानंतर कंपनीचे डोळे उघडले असावेत. कामाच्या दबावामुळे ॲना सेबॅस्टियनचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील कर्मचाऱ्यांनी कामाच्या जास्त दबावामुळे आत्महत्या केल्या आहेत. याच वर्षी मे महिन्यात मध्य प्रदेशातील उज्जैन येथील एका खासगी बँकेच्या उपसरव्यवस्थापकाने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी त्याने बहिणीला फोनवर सांगितले होते. कामाचे खूप दडपण आहे आणि आता घरी परतणार नाही. यानंतर हिमांशूने आत्महत्या केली. या वर्षी ऑगस्टमध्ये उत्तर प्रदेशच्या एटामध्ये एका पोस्टमास्तरने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तो अनेकदा कामाच्या दबावामुळे अस्वस्थ असल्याचे आणि नोकरी करण्याची इच्छा नसल्याचे सांगत असे. त्यांना सहा महिन्यांपूर्वीच नोकरी मिळाली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तेलंगणातील कोमाराम भीम जिल्ह्यातील एका बँक व्यवस्थापकाने कामाच्या दबावामुळे आत्महत्या केली होती. ३५ वर्षीय बनोथ सुरेश हे स्टेट बँकेमध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. कीटकनाशक प्राशन करून त्यांनी जीवनयात्रा संपवली. कामाच्या दबावामुळे तो नैराश्यात गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. कामाचा ताण ही एक गंभीर समस्या आहे, जी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम करू शकते. एखादी व्यक्ती किती ताण सहन करू शकते आणि तरीही सामान्यपणे कार्य करू शकते.
ताणतणाव हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक भाग आहे; पण जेव्हा तो खूप जास्त होतो, तेव्हा त्याचा आपल्या आरोग्यावर आणि आनंदावर परिणाम होतो. तणावामुळे आपण चिंताग्रस्त आणि चिडचिड होऊ शकतो. तणाव इतका गंभीर असू शकतो, की त्यामुळे मानसिक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. कामाचा ताण ही भारतातील चिंताजनक बाब आहे. अलीकडील सर्वेक्षण आणि अभ्यासानुसार, कामाचा ताण सहन करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. ‘नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस’ने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे, की भारतातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामाचा ताण जाणवतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आणखी एका अभ्यासात असे आढळून आले आहे, की भारतातील चार कामगारांपैकी जवळजवळ एक कामगार कामाशी संबंधित तणावाने ग्रस्त आहे. ‘ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन’ने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की ५३ टक्के भारतीय कर्मचाऱ्यांना जास्त कामाचे तास आणि जास्त कामाचा ताण यामुळे तणाव जाणवतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालात असे म्हटले आहे, की कामाच्या तणावामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या वाढतात. या अहवालानुसार, कामाच्या तणावाचा शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. ‘आयआयएम’ अहमदाबादने केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे, की कामाचा ताण हे कर्मचाऱ्यांमध्ये ‘बर्नआउट’ होण्याचे मुख्य कारण आहे. जे कर्मचारी तणावग्रस्त वाटतात त्यांना ‘बर्नआउट’चा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे नोकरीतील समाधान कमी होते. अनुपस्थिती वाढते आणि उत्पादकता कमी होते. ‘नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन’ (एनसीबीआय) च्या सर्वेक्षणानुसार, तणाव आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतो आणि अकाली मृत्यूचा धोका वाढवू शकतो. अभ्यासात असे दिसून आले आहे, की ज्या लोकांना खूप तणाव जाणवतो आणि तणावाचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो असे मानतात. त्यांना अकाली मृत्यूचा धोका ४३ टक्के जास्त असतो. अभ्यासानुसार, अमेरिकेत दरवर्षी २० हजार २३१ मृत्यू तणावामुळे होतात. हा आकडा उच्च रक्तदाब आणि किडनीच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येइतका आहे. तथापि, हा अभ्यास सिद्ध करू शकला नाही, की तणाव हे मृत्यूचे खरे कारण आहे. ‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’नुसार, एखाद्याने आठवड्यातून ४८ तासांपेक्षा जास्त काम करू नये आणि दिवसांत आठ तासांपेक्षा जास्त काम करू नये. असे असताना भारतात वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे नियम आहेत. फॅक्टरी ॲक्ट १९४८ नुसार, कारखान्यातील कामाचे तास कोणत्याही दिवसात नऊ पेक्षा जास्त नसावेत. प्रत्येक कामगाराला अर्ध्या तासाचा ब्रेक मिळायला हवा आणि काम सुरू केल्यानंतर पाच तासांनी हा ब्रेक घेणे आवश्यक आहे.
आठवड्यातून ४८ तासांपेक्षा जास्त काम करू शकत नाही. जर एखाद्या कामगाराने आठवड्यात किंवा एका दिवसात निर्धारित वेळेपेक्षा जास्त काम केले, तर त्याला जास्त पैसे मिळतील. खाण कायदा १९५२ नुसार, खाणीत काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही दिवसात ओव्हर टाईमसह दहा तासांपेक्षा जास्त काम करण्याची आवश्यकता नाही आणि किमान वेतन कायदा १९४८ नुसार, ओव्हर टाईमसाठी दिलेले वेतन वास्तविक दरापेक्षा दुप्पट असावे. बहुतेक लोक आठ तास चांगले काम करू शकतात. जास्त तास काम केल्याने स्पष्टपणे विचार करणे आणि सर्जनशील बनणे कठीण होऊ शकते. कामाच्या दरम्यान ब्रेकदेखील आवश्यक आहे. ब्रेक घेतल्याने एकाग्र होण्यास आणि बरे वाटण्यास मदत होते. प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने काम करतो. त्यामुळे लोकांनी त्यांच्या क्षमतेनुसारच काम केले पाहिजे. कंपन्यांनी जास्त वेळ काम करण्याच्या आणि व्यस्त राहण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या पलीकडे जाण्याची वेळ आली आहे. त्याऐवजी त्यांनी सहानुभूतीची संस्कृती वाढवली पाहिजे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानसिक आरोग्याविषयी चर्चा करण्यासाठी सुरक्षित जागा दिली पाहिजे. कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावण्याची भीती बाळगू नये. त्यांना त्यांच्या समस्या मांडण्याचा अधिकार असायला हवा. वास्तविक, तणावाचा सामना करणे महत्त्वाचे आहे. जर आपण तणाव हाताळू शकत नसलो, तर ते आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यास हानी पोहोचवू शकते.