स्वाती घोसाळकर
मुंबई: बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वासनांध अक्षय शिंदेचा पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचा तपास आता सीआयडी करणार आहे. अक्षय शिंदेचे एन्काऊंटर झाल्यावर आज एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी बदलापूर स्टेशनमध्ये ‘बदला पूरा झाला’चा नारा देत पेढे वाटले होते. तर विरोधकांनी हे एन्काऊंटर बोगस असल्याचा आरोप केला आहे. अक्षयसोबत यातील सहभागी आरोपी आणि अजूनही फरार असलेल्या संस्थाचालकांना वाचवण्यासाठीच हे एन्काऊंटर केले गेले असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
काल सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या पोलिस एन्काऊंटरमध्ये अक्षयचा मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक तज्ञांच्या पथकाने आज एन्काऊंटर झालेल्या पोलिस वाहनाची तपासणी केली. ज्यात शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला होता.
बदलापूरच्या एका शाळेतील शिंदे हा सफाई कामगार होता. त्य़ाने शाळेच्या शौचालयात दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केला. शाळेचे संचालक आणि पोलिसांनी प्रथम हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु जनआंदोलन झाल्यानंतर अखेर घटना घडल्यानंतर पाच दिवसानी १७ ऑगस्ट रोजी अक्षयला अटक करण्यात आली होती.
ही घटना पोलीस कोठडीतील मृत्यूशी संबंधित असल्याने त्याचा तपास सीआयडी करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मुंब्रा बायपासवर ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे सीआयडी अधिकाऱ्यांचे पथक जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. घटनेच्या वेळी वाहनात उपस्थित असलेल्या पोलिसांचे जबाबही ते नोंदवणार आहेत.अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचेही जबाब सीआयडी अधिकारी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी आपल्या मुलाच्या कथित हत्येचा तपास करण्याची मागणी केली आहे. पोलिसांना पैसे देऊन त्याचा खुन करण्यात आल्याचा आरोप अक्षयच्या आई वडीलांनी केला आहे.
पोलिसांनी अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी घातली
अक्षय शिंदेचे पोस्टमार्टेम जे.जे.रुग्णालयात करण्यात आले. अक्षय शिंदेचे सात तास पोस्टमार्टेम सुरू होतं. संपूर्ण पोस्टमार्टेम प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे. पाच डॉक्टरच्या पॅनलने पोस्टमार्टेम केलं. शवविच्छेदन अहवालामध्ये मोठा खुलासा झाला आहे. अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. डोक्यात लागलेल्या गोळीमुळे अती रक्तस्त्राव झाला. आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.
अक्षयच्या एन्काऊंटरची पोलिस स्टोरी !
बदलापूर पोलीस ठाण्यात अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल होता. त्यामुळे तपासासाठी ठाणे क्राईम ब्राँचची टीम तळोजा कारागृहात ट्रान्सपर वॉरंटसह आली. संध्याकाळी चार वाजता पोलिसांनी अक्षय शिंदेला ताब्यात घेतलं. सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता तळोजा जेलमधून आरोपी अक्षय शिंदेला घेऊन ठाण्याकडे निघालो. व्हॅनमध्ये संजय शिंदे, निलेश मोरे, अभिजीत मोरे, हरिश तावडे हे पोलीस अधिकारी होते. यामधील संजय शिंदे हे ड्रायव्हरशेजारी तर निलेश मोरेंसोबत दोन पोलीस आरोपीच्या शेजारी बसले होते. रस्त्यात जात असताना आरोपी अक्षय शिंदे शिवीगाळ करू लागला आणि मला जाऊ द्या अस म्हणू लागला. त्यानंतर निलेश मोरे यांनी संजय शिंदेंना फोन करून सांगितलं. संजय मोरे हे स्वत: आरोपी अक्षयच्या समोर बसले होते. अक्षय शिवीगाळ करत होता, सहा ते सव्वा सह वाजता पोलीस व्हॅन मुंब्रा-बायपास रोडवर आल्यावर आरोपीने निलेश मोरेंच्या जवळील पिस्तुल तो खेचू लागला. दोघांमध्ये झटापट झाली, त्यावेळीच पिस्तुल लोड होईन एक गोळी फायर झाली, यामध्ये निलेश मोरे जखमी झाली ही गोळी त्यांच्या मांडीला लागली. अक्षयने पिस्तुल स्वत:कडे घेत संजय शिंदे आणि हरिश तावडे यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. या दोन्ही गोळ्या पोलिसांना लागल्या नाहीत यादरम्यान संजय शिंदे यांनी अक्षयवर एक गोळी झाडत त्याला जखमी केले. त्यानंतर पोलिसांना त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रूग्णालयात आणले तिथल्या डॉक्टरांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
जायचंय बदलापूरला, गाडी वळली मुंब्राला?
सुषमा अंधारेंचा पोलिसांना सवाल
पुणे: शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरच्या या घटनेबाबत संशय व्यक्त केला. पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला म्हणत पोलिसांसह, सरकारवरही हल्लाबोल केला आहे.
अक्षय शिंदे याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती. परंतु, कायद्याची प्रक्रिया बायपास होता कामा नये. अक्षय शिंदेला तळोजा मधून बदलापूर मध्ये न्यायचं असेल तर गाडी मुंब्रा कडे का नेली? पोलिसांनी चार्जशीट रविवारी का फाईल केलं? ज्या पिस्तूलने अक्षयने गोळी झाडली ती पिस्तूल अनलोडेड असते. मग अक्षय शिंदे याला पिस्तूलचे लॉक कसे काढता आले? दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांच्या कमरेला लागलेलं पिस्तूल कसं काढेल, असा सवाल देखील सुषमा अंधारेंनी व्यक्त केला आहे. एन्काऊंटर करणारा संजय शिंदे वादग्रस्त पोलीस अधिकारी आहे. विजय पलांडे याला पळवून लावण्यात त्यांचा हाथ होता. प्रदीप शर्मा यांचा तो जवळचा होता. हा माणूस सस्पेंड होता. अक्षय शिंदे याला संपवल्यामुळे हे प्रकरण संपत नाही. कोणाला वाचवलं जातं आहे ? ही संपूर्ण घटना हे राज्य प्रायोजित दहशतवाद आहे, अक्षय शिंदे प्रकरणावर आम्ही कोर्टात जाणार असंही यावेळी सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. या प्रकरणाची न्यायधिशांच्या समितीकडून चौकशी व्हायला पाहिजे, संजय शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांचे निलंबन व्हायला पाहिजे. ठाण्यातून जे सत्ता केंद्र चालते त्याबद्दल आम्हाला विश्वास नाही. २४ तासात घटनेची माहिती मानवाधिकार यांना दिली पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
पीडितेच्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न – सरोदे
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या मते एन्काऊंटर म्हणजे खूनच असतो. तसंच, पालकांवर पोलिसांनी दबाव आणला होता, असा खुलासा ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी केला आहे.“अक्षय शिंदे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस होता. त्याने लहान मुलींवर अत्याचार केले होते, त्यामुळे त्याच्या मृत्यूचं मला अजिबात वाईट वाटत नाही. परंतु, ज्या पद्धतीने अक्षय शिंदेचा पोलिसांनी खून केला, त्याला आपण एन्काऊंटर म्हणतो, ते एन्काऊंट सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवलं आहे. जगातल्या कोणत्याही देशात एन्काऊंटर कायदेशीर नाही. त्यामुळे रस्त्यावर होणारा न्याय यावर रस्त्यावर समाधान आणि आनंद व्यक्त करणारा माणूस कायद्याच्या दृष्टीने मागासलेला असतो असं असीम सरोदे म्हणाले.
“घटनेच्या सुरुवातीला जेव्हा या प्रकरणाची चौकशी एसआयआटीमार्फत व्हावी अशी आम्ही मागणी केली होती तेव्हा पीडितांच्या पालकांवर दबाव टाकण्यात आला होता. आम्ही एसआयटीमार्फत चौकशी करणार आहोत, पण तुम्ही अर्ज करू नका असा दबाव टाकण्यात आला होता, असा दावा असीम सरोदे यांनी केला. काही पक्षाच्या व्यक्तींनी त्यांच्या घरी जाऊन, त्यांना दुसरीकडे नेऊन त्यांच्यावर दबाव आणला होता’. असंही ते म्हणाले.
“जर त्या मुलींनी नेमकेपणाने सांगितलं होतं की झाडूवाला दादा माझ्यावर असं असं करत होता. मग एफआयआरमध्ये पोलिसांना कोणी सांगितलं की अनोळखी लिहायचं. त्या शाळेमध्ये सर्व महिला कर्मचारी आहेत. पोलिसांकडून शाळेला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शाळेचे ट्रस्टी एका राजकीय पक्षाच्या संबंधित आहेत. संघाशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे. शाळेचे सीसीटीव्ही फुटेज गायब करणारा व्यक्ती आणि संचालक आपटे नावाचा व्यक्त संशयित आहे. हे फरार आहेत. त्यांना अजूनही पकडण्यात आलं नाही. त्यामुळे कोर्टात असं वातावरण आहे की न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. संवेदनशील वकिलांची टीम माझ्याबरोबर होती. त्यांचा अर्ज घेण्यात आला नाही. मी वकिलपत्र दाखल केलं, त्यानंतर ऐकण्याची प्रक्रिया सुरू झाली”, असंही ते म्हणाले.