ठाणे : काही महिन्यांपासून थंड पडलेल्या फेरीवाला विरोधातील कारवाईचे हत्यार ठाणे पालिकेने पुन्हा एकदा बाहेर काढले आहे. त्याअंतर्गत ठाणे स्थानकात कारवाई करून पालिकेने परिसर फेरीवालामुक्त केला आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने ठाणे रेल्वेस्थानकाच्या १५० मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे.
ठाणे रेल्वेस्थानक परिसर नेहमी गजबजलेला असतो. मात्र, प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे हा परिसर फेरीवाल्यांनी हडपल्याचे चित्र काही महिन्यांपासून दिसत होते. याचा फटका रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना बसत होता. नौपाडा, कोपरी प्रभाग समितीमधून अनधिकृत फेरीवाल्यांबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे अखेर या तक्रारींची दखल घेत पालिका उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्या उपस्थितीत अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात आली. सॅटिस पुलाखालील फेरीवाले, आलोक हॉटेल ते तीन हात नाका (गोखले रोड), राम मारुती रोड, गावदेवी भाजी मार्केटबाहेरील फेरीवाले, जांभळी नाका, तलावपाळी; तसेच कपडा मार्केट येथे कारवाई केल्याने परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.
जप्त केलेला माल दान
फेरीवाला विरोधातील धडक कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेली फळे, भाजीपाला व इतर साहित्य सेवाभावी संस्थांना देण्यात आले आहे. रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यात आला असून, सर्व पदपथ नागरिकांसाठी मोकळे करून देण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *