२०० कोटींचा निधी मंजूर
मुरबाड : मुरबाड- ल्याण रेल्वेच्या भूमी अधिग्रहणासाठी रेल्वेने २०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती माजी खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड येथे दिली. मुरबाड-कल्याण रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करण्यासाठी एकूण १५०० कोटी खर्च अपेक्षित आहे.
त्यातील वरील उल्लेख केल्याप्रमाणे पहिला टप्पा केला होता. दुर्दैवाने या भागात जमिनीचे फारसे व्यवहार झाले नसल्यामुळे सद्यस्थितीतील रेडीरेकनरनुसार शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर मुरबाड येथील कपिल पाटील यांच्या कार्यालयात बाधित शेतकऱ्यांबरोबर पाटील यांनी चर्चा केली.
दिल्ली येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना चांगला दर देण्याच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. अनेक दशकांपासून रखडलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रेल्वे मार्ग रखडणार नाही, असे म्हणत या प्रकल्पाला शेतकऱ्यांनीही साथ दिली.
त्यामुळे सर्वाधिक वेगाने भूसंपादनाच्या कामाबाबत कार्यवाही झाली, परंतु शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव कमी मिळणार असल्याने त्याबाबत चर्चा चालू असल्याचे त्यांनी म्हटले.
शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन
मुरबाड रेल्वे मार्ग बदल होऊन कुडवली येथे जाणार असल्याचे शंका काही शेतकऱ्यांनी चर्चेत उपस्थित केली. त्यासंदर्भात पाटील यांनी सांगितले की, सध्या मंजूर झालेल्या ट्रकप्रमाणे रेल्वे मार्ग होणार आहे, तसेच जे कोणी अशी माहिती देत आहेत, त्यांनी सदरचा रेल्वे मार्ग बदलून कुडवली येथे नेण्यासंदर्भात काही पत्र व्यवहार केला आहे का? याची विचारणा संबंधितांना करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी कपिल पाटील यांनी लक्ष घालून जास्तीत जास्त दर मिळवून द्यावा व रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती केली.
