भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार अशी ज्यांची ख्याती व प्रचार केला जातो, त्या देवेन्द्र फडणवीस यांच्याच नागपूर जिल्ह्यातील कामटी विधानसभा मतदारसंघातील आमदराने असे काही तारे तोडले आहेत की भाजपाला कुठे पाहु आणि कुठे नको, असे व्हावे. एकूणच आपल्या राजकीय नेत्यांना आधुनिक माध्यमांचे भान अजिबातच नाही हे वारंवार दिसलेच आहे. त्यातीलच ताजे उदाहरण सावरकर नामक या भाजपा आमदाराने दिले आहे. कुठे ते स्वातंत्र्यवीर आणि कुठे हे वाचाळवीर. नावातील साम्य सोडले तर टेकचंद व वि. दा सावरकरांमध्ये काहीह साम्य दिसूच शकत नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा जमिनीपासून चार अंगुळे वर, हवेत, चालणारा रथ दाणदिशी जमिनीवर आदळला. त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा होता. मावळत्या लोकसभेत २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत, भाजपाची खासदारांची संक्या २३ होती. तर मित्रपक्ष ( अखंड ) शिवसेनेची विजयी खासदारांची संख्या होती १८. एकूण दोघांचे मिळून ४१ खासदार मावळत्या लोकसभेत होते. पण नव्या लोकसभेत ती संख्या कुठच्या कुठे उडाली. काँग्रेस प्रणित महाराष्ट्र विकास आघाडीने भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी तसेच राज्यातील महायुतीवर मात केली. भजापाची स्वबळावरील खासदारांची संख्या २३ वरून थेट ९ वर घसरली. मित्रपक्ष एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सात तर दुसरा मित्रपक्ष अजितदादा पवारांच्या रा,ट्रवादी काँग्रेसचा केवळ एक खासदार असे मिळून महायुतीचे सतरा वीर लोकसभेत महाराष्ट्राने धाडले. तो मोठाच हादरा दिल्लीतील महाशक्तीला होता. त्या दणक्याने भानावर आलेले दिल्लीतील आणि मुंबई नागपुरातील भाजपा नेते विचार करू लागले आणि त्यांनी गेलेला जनाधार परत मिळवण्यासाठी महायुतीच्या राज्य सरकारचा वापर तातडीने सुरु केला. शेतकरी, गरीब, नोकरदार, युवा आणि महिला वर्गाला लक्ष्य करून योजनांचा धडाका लावला. शेतकऱ्यांसाठी सोयाबीन कापसाला अधिकचे भाव, कर्जमाफीतील उरलेल्या लाभ, केंद्राच्या शेतकरी सन्मान योजनेतील राज्याचा निराळा अधिकचा वाटा, महिलांना घरगुती गॅसचे तीन मोफत सिलेंडर, युवकांसाठी विविध महामंडळाच्या शिष्यवृत्या आदींमध्ये वाढ, कौशल्य विकासाच्या अनेक योजना आदि सर्व गोष्टींबरोबरच, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हे एक मोठे पाऊल शिंदे सरकारने उचलले. योजनेसाटी पात्र ठरणाऱ्या राज्यातील किमान दोन कोटी महिलांच्या बँक खात्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधी दरमहा पंधराशे प्रमाणे किमान तीन हप्ते पडले पाहिजेत अशी पावले राज्य सरकार टाकते आहे. लाडक्या बहीणींच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये थेट जमा कऱण्याची ही योजना बघता बघता बरीच लोकप्रियही झाली आहे. पण त्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेपही घेतले आहेत. जरी योजना चांगली असली तरी ती आणण्याची सरकारची नियत साफ नाही, अशी टिका पहिल्या दिवसापासून होते आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आदिंनी सरकारवर टीका करतानाच योजना भली व कल्याणकारक असून त्याचा लाभ सरकाराल निवडणुकीत होऊ शकतो हे थोडेफार मान्यही केले आहे. सर्वांच्याच मनात या योजनेमुळे महायुतीच्या मतपेटीत भरघोस वाढ होईल अशी भीती वा आशा ( आपापल्या राजकीय भूमिकेनुसार ! ) जरी असली तरी विरोधकांच्या टीकेला खतपाणी घालण्याचा उद्योग आजवर सत्तारूढ बाजूने कोणीच केला नव्हता. पण एकनाथ शिंदे, देवन्द्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे महायुतीचे नेते राज्याच्या सर्व भागात जाऊन योजनेचा लाभ महिलांना देण्यासाठी मेळावे घेत आहेत. तिथे महिलांमध्ये थेट जाऊन राखी बांधून घेण्याचेही कार्यक्रम शिंदे, फडणवीस, पवार करत आहेत. योजना आणली राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या महिला बालकल्याण खात्याने. नाव आहे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना, असे आणि पैसा दिला जातोय तो अजित पवारांच्या अखत्यारीतील अर्थखात्याकडून. शिवाय या योजनेचे मूळ जनक भाजपा नेते मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण हे आहेत. तेंव्हा भाजपा नेतेही श्रेयाचे वाटेकरी आहेतच. योजनेच्या यशापेक्षा श्रेयावरून महायुतीत रस्सीखेच सुरु अस्लयाचेही आपण पाहातच आहोत. अशा एकंदरीत स्थितीत नागपूर शेजारच्या कामठी मतदारसंघातील भाजपाचे आमदार टेकचंद सावरकरांनी जाहीर कार्यक्रमात विरोधकांच्या टीकेल योग्य ठरवू टाकले आहे. सरकारने ही योजना आणली, हा मतांसाठी केलेला जुगाड आहे, असा प्रकारचे उद्गार या महाशयांनी काढले आहेत. एका कार्यक्रमात आमदरा महोदय म्हणाले की “आम्ही एवढी मोठी भानगड कशासाठी केली, तुम्ही इमानदारीने सांगा. ज्या दिवशी तुमच्या घरापुढे मतदानाची पेटी येईल. त्यावेळी माझ्या लाडक्या बहिणी कमळाला मत देतील, यासाठी आम्ही हे जुगाड केलंय. हे सर्वजण खोटं बोलले असतील. मात्र, मी खरं बोलतो. माझं बोलणं खरं आहे की नाही? नाहीतर बोलायचं एक आणि करायचं एक, मी काय रामदेव बाबांचा कार्यकर्ता आहे का?”,असंही आमदार टेकचंद सावरकर यांनी म्हटले. टेकचंदांना बहुधा वाटत हते की मी काय विनोद करतोय, लोक माझ्या बोलण्यावर काय खुष आहेत…, पण सध्याच्या समाज माध्यमांच्या सुगीच्या युगात त्या भाषणातील नेमके जुगाड व भानगड वर्णनासह काढलेले उद्गार एका क्लीपमद्य ले व ती क्लीप वेगाने सर्वत्र पसरवण्याचे काम सुरु झाले असून ते उद्गार भाजपाला महागात पडणारे ठरणार आहेत. बघा आम्ही म्हटलेच होते की लाडकी बहीण योजना फक्त मतांच्या बेगमीसाठीच सरकारने आणलेली आहे. निवडणुका संपल्या की योजना फेकून देतील लाडक्या बहिणांच्या हाती नंतर काहीच पडणार नाही… अशा प्रकारची टीका काँग्रेसने सुरु केली आहे. टेकचंद महाशयांच्या त्या उद्गारांवर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी लगेचच ट्वीट केले आहे व त्या ट्वीटमध्ये ती क्लीपही त्यांनी जोडली आहे. सहाजिकच आता तमाम दृष्य व श्राव्य माधम्यांच्या हाती, छापील वृत्तपत्रांच्याही हाती नवे कोलीत मिळाले असून भाजपाला टीव्ही पडद्यावरून व वृत्तपत्रांच्या स्तंभांतून धुण्याचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. उगवत्या व्हाटसप, ट्वीटर फेसबुक, इन्टाग्राम असा माध्यांचे महत्व तमाम राजकीय नेत्यांनी सतत लक्षात टेवायला हवे. असाच भयंकर चुका पूर्वी र र पाटील (“विरोधी उमेदवाराला बलात्कार करयाला निवडणुका होईप्रयंत थांबायला काय जालं होते…!”) काँग्रेस राजवटीत पाटबंधारे मंत्री असताना अजितदादा पवार (“धरणातील पाणी कसे काय वाढवायचे, आता मी त्यात XXX करु काय ?” ), आदि अनेक उदाहरणे या पूर्वी घडलेली आहेत. समोर लावलेले टीव्हीचे माईक पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वीही व नंतरही सुरुच असतात, याचे भान नसणारे तत्कालीन काँग्रेस प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी, तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे पक्षनिधीला पैसा देत नाहीत अशी तक्रार मंत्री सतीश चतुर्वेदींकडे करणे, हाही प्रकार त्यातलाच होता. पण टीव्ही कॅमेरे तर दूरच, समोर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या खिषातील मोबाईल हे अत्यंत प्रभावी प्रसार माध्यम बनले आहे आणि फोनवरून शूटिंग करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा स्फोटक क्लीपच्याच शोधात आहे, याचे भान राजकीय नेत्यांनी सतत बाळगायला हवे. तरच असे अडचणीचे प्रसंग टाळता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *