ठाणे : ठाणे महानगरपालिकेला मे.स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार २७ ऑक्टोबर सकाळी 9.00 वाजल्यापासून ते शनिवार २८ ऑक्टोबर सकाळी 9.00 वाजेपर्यत बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत स्टेम प्राधिकरण योजनेमधील देखभाल दुरूस्ती करणे व पिंपळास येथील शुद्ध पाणी वाहून नेणारी 1530 मि.मी व्यासाच्या जलवाहिनीवर गळती थांबविण्याची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या पिसे व टेमघर शुध्दीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशन, पंपिग मशिनरीची तातडीची निगा, देखभाल, दुरूस्ती व इतर तातडीचे कामे करण्यासाठी महापालिका स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेचा व मे. स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा 24 तासाचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे.परिणामी शुक्रवारी सकाळी 9.00 ते शनिवार सकाळी 9.00 वाजेपर्यत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागात 24 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
सदर कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
