मुंबई : माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माहीम ज्युवेनाईल चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेमध्ये वरळी सी फेस म्युनिसिपल स्कूलचा रेहान शेख विजेता ठरला. अचूक फटकेबाज खेळासह गेममधील सर्व बोर्डात राणीवर वर्चस्व राखत रेहान शेखने अंतिम फेरीमध्ये जोरदार मुसंडी मारणाऱ्या पोद्दार अकॅडमी हायस्कूल-मालाडच्या प्रसन्न गोळेचे आव्हान २५-० असा नील गेम देत संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाच्या माहीम ज्युवेनाईल चषकाला गवसणी घातली. विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषक व स्ट्रायकर पुरस्काराने एमजेएससीचे अध्यक्ष विजय येवलेकर, सेक्रेटरी राजन गुप्ता, उपाध्यक्ष विकास खानोलकर, खजिनदार महेश शेट्ये, कार्यकारी सदस्य प्रसाद कुलकर्णी, माजी क्रिकेटपटू सुरेंद्र बाबरेकर, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
शिवाजी पार्क येथील माहीम ज्युवेनाईल पव्हेलीयनमध्ये तत्पूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात रेहान शेखने सरळ जाणाऱ्या सोंगट्या सहज घेत कस्तुरबा गांधी स्कूलच्या सिध्दांत मोरेला १९-० असे नमविले. दुसरा उपांत्य फेरीचा जनगणमन ज्युनियर कॉलेज-कोपरचा अथर्व म्हात्रे विरुध्द प्रसन्न गोळे यामधील सामना अखेरपर्यंत चुरशीचा झाला. शेवटच्या बोर्डा अगोदर ९-७ अशी आघाडी घेणाऱ्या अथर्व म्हात्रेला निर्णायक क्षणी सर्वांगसुंदर खेळ करीत प्रसन्न गोळेने १४-९ असे चकविले आणि अंतिम फेरीत धडक दिली. उपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार आयएनजी इंग्लिश स्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा नील म्हात्रे, नारायण गुरु स्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलचा सम्यक पवार यांनी जिंकला. स्पर्धेत मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शालेय-कॉलेजमधील ३२ खेळाडूंनी भाग घेतला होता.
००००
