नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये क्षयरोग आजाराचा प्रसार रोखणेसाठी, मा. आयुक्तांच्या मार्गदर्शनाने, आरोग्य विभागामार्फत विशेष शिबीरांचे आयोजन केले असता सदर शिबीरांकरीता नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. भेटी दिलेल्या नागरीकांमध्ये क्षयरोग आजारांबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली. तसेच कार्यक्षेत्रात जास्तीच जास्त नागरीकांपर्यंत पोहचुन जनजागृती करण्यासाठी 25 सप्टेंबरला 13 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत विविध ठिकाणी जाहिर शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरांकरीता 5906 नागरीकांनी भेट दिली असून, 86 संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुने घेण्यात आले.
सदर शिबिरांच्या निमित्ताने नमुंमपा कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृती उपक्रम राबवून नागरिकांना हस्तपत्रके देवून क्षयरोगविषयी जनजागृती निर्माण केली. तसेच क्षयरोगाची लक्षणे असल्यास जसे दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, ताप येणे, भूक मंदावणे, वजनात लक्षणीय घट, छातीत दुखणे, मानेवर गाठ इ. असल्यास जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन क्षयरोगाची मोफत तपासणी करण्याचे आवाहन नमुंमपामार्फत करण्यात आले.
नमुंमपा, खाजगी संस्था व नागरिक एकत्रित आल्यास तसेच संशयित क्षयरुग्णांनी लवकरात लवकर आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी केल्यास नवी मुंबईतून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करणे शक्य आहे. तरी नमुंमपाच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या कामगिरीमध्ये सातत्य राखणेकरिता तसेच नवी मुंबई क्षयरोगमुक्त करणेकरिता खाजगी संस्था व नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *