पेण- : नवरात्रोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू असून कार्यशाळांमध्ये देवीच्या मूर्ती बनवण्याची, त्यांचा साजशृंगार करण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे. पेण हे गणपतीमूर्तींचे माहेरघर असले तरी येथील कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्तीही साकारण्याचे काम वर्षभर सुरू असते. त्यामुळे या मूर्तीही जगभर प्रसिद्ध आहेत. येत्या ३ ऑक्टोबरला घटस्थापना होणार असून अनेक मूर्तींचे रंगकाम, साजशृंगार, जरी-खड्यांचे काम सुरू आहे तर जवळपास १० हजारांहून अधिक मूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत.
सध्या पेण शहरातील कासार आळी, कौंडाल तळे, कुंभार आळी, फणस डोंगरी यांसह तालुक्यातील अंतोरे, हमरापूर, जोहे, कळवे, तांबडशेत येथील कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्ती दोन फुटांपासून पाच ते सहा फुटांपर्यंत मूर्ती बनवल्या जात आहेत. या मूर्ती साधारण तीन हजारांपासून पुढे ३० ते ३५ हजारांपर्यंत घाऊक दरात विकल्या जातात. देवीच्या मूर्तींना आठ हात, मोकळे केस, साडीवरील नक्षीकाम, नाकात नथ घालून वेगवेगळ्या अवतारात कारागीर साकारत आहेत.
मूर्तींचे नाजूक, सुबक काम करताना कारागिरांना विशेष लक्ष केंद्रीत करावे लागते. गणेशमूर्तींपेक्षा देवीच्या मूर्ती साकारण्यास जास्त वेळ लागतो. देवींच्या मूर्तींचे काम कितीही नाजूक आणि अवघड असले तरी पेणच्या कलात्मक गुणांमधून मूर्तिकारांची अदाकारी दिसून येते. म्हणूनच गणरायांप्रमाणे पेणच्या देवीच्या मूर्तींना भाविकांकडून विशेष पसंती मिळते.
परदेशात मूर्ती रवाना
पेणमधील देवीच्या काही कच्च्या मूर्ती थायलंड, मलेशिया, सिंगापूर, अमेरिका, न्यूझीलंड, बँकॉक आदी देशांत गणेशमूर्तींबरोबरच रवाना झाल्या आहेत. त्यामुळे गणेशमूर्तींबरोबरच देवीच्या मूर्तींनाही मागणी वाढली आहे. यंदा साधारणपणे आठ ते १० हजार मूर्ती परदेशात रवाना झाल्या असून आठ फुटाच्या मूर्तींना ३० ते ३५ हजार रुपये मोजावे लागतात.
0000
