अरविंद केजरीवालांची विधानसभेत टीका

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विधानसभेत संबोधित केले. राजीनामा दिल्यानंतर प्रथमच त्यांनी दिल्ली विधानसभेला संबोधित करताना भारतीय जनता पक्षावर (भाजप) हल्ला चढवला.

“मनीष सिसोदिया आणि मला इथे पाहून विरोधी पक्षातील माझ्या सहकाऱ्यांना दु:ख झाले असेल. मी नेहमी म्हणतो की पंतप्रधान मोदी खूप शक्तिशाली आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर संसाधने आहेत, पण मोदी हे देव नाहीत. देव आपल्यासोबत आहे. मला
न्यायालयाचे आभार मानायचे आहेत”, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

एकेकाळी मुख्यमंत्रिपदाच्या ‘नंबर वन’ खुर्चीवर विराजमान झालेल्या केजरीवाल यांना त्यांच्या पूर्वीच्या पदापासून काही अंतरावर ४१ क्रमांकाची जागा देण्यात आली. त्यांची उत्तराधिकारी आतिशी आता मुख्यमंत्रिपदावर विराजमान आहेत, तर केजरीवाल यांचे विश्वासू लेफ्टनंट मनीष सिसोदिया यांना त्यांच्या शेजारी ४० क्रमांकाची सीट देण्यात आली.

मद्य वितरण योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आप पक्षाच्या अनेक नेत्यांवर कारवाई सुरू आहे. या करवाईनुसार मनिष सिसोदिया, अरविंद केजरीवाल यांना तुरुंगवास झाला आहे. केजरीवाल यांनी दावा केला की, भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याशी नुकत्याच झालेल्या संभाषणामुळे त्यांना आश्चर्य वाटले.

 “मी विचारले की मला अटक केल्याने त्यांना कशी मदत झाली. त्यांनी मला सांगितले की त्यांनी मला अटक करून संपूर्ण दिल्ली सरकारला पायउतार केले”, असं केजरीवाल म्हणाले. “त्यांनी मला जे सांगितले त्याचे मला आश्चर्य वाटले. दिल्लीतील लोकांचे जीवन उद्ध्वस्त करून आनंद साजरा करणारा असा हा कोणता पक्ष आहे, याचे मला आश्चर्य वाटते.”

“मला तुरुंगात पाठवून त्यांनी दिल्लीतील कामे बंद पाडली. रस्त्यांचीही दुरवस्था झाली. हा त्यांचा एकमेव हेतू होता. आज मी मुख्यमंत्री आतिषीजींसोबत दिल्ली विद्यापीठातील एका रस्त्याची पाहणी केली. हा रस्ताही लवकरच दुरुस्त केला जाईल, बाकीचे दिल्लीतील रस्तेही लवकरच दुरुस्त केले जातील, आता दिल्लीतील लोकांना काळजी करण्याची गरज नाही”, असे केजरीवाल यांनी X वर पोस्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *