मुंबई : अजित पवारांना महायुतीत घेतल्याने भाजपाला लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याची कबूली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिली. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर नाराज झालेल्या समर्थकांना ही तडजोड का करावी लागली, हे समजवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असे प्रतिपादन फडणवीसांनी केले. ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्ये फडणवीस बोलत होते.
विरोधी पक्षनेता असताना तुम्ही ज्या पक्षावर सर्वाधिक हल्ले केले. ७० कोटींचा सिंचन घोटाळा. त्यांना तुम्ही सामील करून घेतले. लोक म्हणतात की, देवेंद्र फडणवीसांनी जे केले, ते भाजपाच्या मूळ विचारांना, भाजपाच्या एकनिष्ठ मतदाराला हे आवडलं नाही आणि त्यामुळे लोकसभेला तुमची अशी अवस्था झाली, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता.
उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बघा, मला त्यांना (भाजप/आरएसएस कार्यकर्ते) सांगायचं नाही, तुम्हाला सांगायचं आहे. त्यांना मी सांगितलं आहे. भाजप आणि आरएसएस दोघांनाही मी सांगून बसलो आहे.”
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “मी इतकंच सांगेन की हो… मी ही गोष्ट मान्य करतो की, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला जेव्हा सोबत घेतले. ते आमच्या मतदारांना आवडलं नाही. अजिबात आवडलं नाही. पण, आम्ही जेव्हा परिस्थिती त्यांच्यासमोर ठेवली की, ते जेव्हा आमच्यासोबत आले, ते कोणत्या परिस्थिती आले. कोणत्या परिस्थिती त्यांना सोबत घ्यावे लागले. आमच्या मतदारांच्या, आमचे जे कोअर (महत्त्वाचे) लोक आहेत, त्यांच्या हे लक्षात आले आहे की, राजकारणात अनेकदा अशी परिस्थिती येते, जेव्हा तडजोड करावी लागते.”
“अनेक तडजोडी अशा असतात की, ज्या तु्म्हाला किंवा तुमच्या लोकांना मनापासून आवडत नाहीत, पण कराव्या लागतात. अशा तडजोडी आम्ही या प्रकरणात केल्या. पण, आज मी विश्वासाने सांगू शकतो की, १०० टक्के नाही, पण ८० टक्के लोकांना आम्ही समजवण्यात यशस्वी झालो आहोत की, आम्ही हे का केले”, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
