ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे आवाहन
रमेश औताडे
मुंबई : देशात धार्मिक विद्वेषाचा वनवा पेटवून त्यावर राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. अशा वेळी सर्व धर्मातील धर्मगुरूंनी आपापल्या धर्मातील शांतीचासंदेश समाजात रुजवून विद्वेषाचा वनवा शांत करावा, असे आवाहन वारकरी विचार मंचचे अध्यक्ष ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित सर्व धर्मीय सद्भावना संमेलनात ते बोलत होते. या संमेलनाला विविध धर्मातील धर्म गुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शामसुंदर महाराज पुढे म्हणाले की, ज्या वेळी धर्माचा आधार घेऊन स्वार्थासाठी सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे प्रयत्न होतात. सच्चा धर्माच्या विचारांना बाजूला सारून धर्माच्या नावाने पाखंडीपणा केला जातो तेव्हा खऱ्या धार्मिकांना त्या पाखंडाचं खंडन करून खऱ्या धर्माच रक्षण करावं लागतं.
या संमेलनाला इस्लामचे उपासक मौलाना, जमात ए इस्लाम हिंदचे राष्ट्रीय पदाधिकारी, ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू फादर, वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार, प्रवचनकार, अभ्यासक, हिंदू धर्मातील साधू, सन्याशी, बैरागी, वेदशास्त्र पंडित, निरंकारी, तुकडोजी महाराज परंपरेतील गुरूदेव संप्रदायाचे प्रबोधनकार, बौद्ध भिकू, भंत्ते उपस्थित होते.
