मानधनवाढ, ग्रॅच्युईटी व मासिक पेन्शनचे शासकीय आदेश ताबडतोब काढावेत या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक
अनिल ठाणेकर
ठाणे : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या प्रतिनिधींनी मानधनवाढ, ग्रॅच्युईटी व मासिक पेन्शनच्या मागील संपात मान्य केलेल्या मागण्यांबाबतचे जीआर ताबडतोब काढवेत, या मागणीला घेऊन बेमुदत उपोषण व हजारो अंगणवाडी कर्मचारी व कृती समितीच्या नेत्यांचे जेल-भरो आंदोलन करण्यात आल्याची माहिती एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी दिली आहे.
कृती समितीचे ज्येष्ठ नेते कॉ. अतुल दिघे यांनी उपोषणकर्त्यांना प्रेरणा देणारे भाषण करून कार्यक्रमाची सुरवात केली. कृती समितीच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कृती समितीच्या शिष्ठमंडळांना मंत्रालयात बोलावून त्यांचे निवेदन स्विकारले. परंतु ही भेट उभ्या उभ्या झाल्यामुळे कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या रात्री प्रचंड पाऊस कोसळल्यामुळे संपूर्ण आझाद मैदान जलमय झाले होते. मंडपात व स्टेजवर देखील प्रचंड ओल होती. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी खुर्च्यांवर बसून पूर्ण रात्र काढली. तरीही त्यांचे मनोबल तुटले नाही. पोलिसांनी त्यांच्या नियमाप्रमाणे संध्याकाळी सर्वांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वांनी तिथेच थांबण्याची ठाम भूमिका घेतली. कृती समितीचे नेते वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले व शेवटी ही कारवाई थांबवण्यात आली. या शिष्ठमंडळात शुभा शमीम, दिलीप उटाणे, सूर्यमणी गायकवाड, नितीन पवार, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर व जयश्री पाटील यांचा समावेश होता. यावेळी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, प्रधान सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे व अन्य अनेक अधिकारी उपस्थित होते. आझाद मैदानाच्या स्टेजच्या मागच्या गेटजवळील रस्त्यावर पोलिसांच्या गाड्या आणण्यात आल्या व घोषणांच्या गजरात जेल भरो आंदोलनाला सुरवात झाली. कृती समितीचे प्रमुख नेते शुभा शमीम, भगवानराव देशमुख, सुर्यमणी गायकवाड, राजेश सिंग, नितीन पवार, माधुरी क्षिरसागर, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी स्वतःला अटक करवून घेतली. चार गाड्या भरून सत्याग्रहींना यलो गेट पोलीस ठाण्यात आणून स्थानबद्ध करण्यात आले. पोलिस यंत्रणा हजारो अंगणवाडी कर्मचारी महिलांना अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यासाठी अक्षम ठरल्यामुळे त्यांनी आझाद मैदानातच सर्वांना स्थानबद्ध करत असल्याची घोषणा केली व सुमारे दहा हजार महिलांच्या नावांची यादी करून त्यांना अटक केल्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतरही ज्यांची नावे यादीत येऊ शकली नाहीत अशा सुमारे सहा हजार महिलांनी मैदानावर व मैदानाच्या बाहेर घोषणा दिल्या. परंतु पोलिसांची महिलांना अटक करण्याची क्षमता संपल्यामुळे त्यांनी याद्या करण्याचे काम बंद केले. सायंकाळी अटक करून नेलेल्या नेत्यांना सोडेपर्यंत अंगणवाडी कर्मचारी पावसाची पर्वा न करता मैदानावर ठाण मांडून बसल्या. हे सर्व नेते परत आल्यानंतर सभा घेऊन सर्व सत्याग्रहींचे अभिनंदन करण्यात आले व लढ्याचा पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात आला.पाऊस व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील आंदोलनकर्त्या महिलांचा परतीचा प्रवास लक्षात घेता बेमुदत साखळी धरण्यामध्ये २६ व २७ या दोन दिवसांसाठी मुंबई व ठाणे येथील नागरी प्रकल्पातील कर्मचारी व ज्यांचा परतीच्या प्रवासाचे नियोजन उशीराचे आहे अशा बाहेरगावच्या कर्मचारी आझाद मैदानावर ठाण मांडून बसतील. ३० सप्टेंबरपासून मंत्रीमंडळाच्या बैठकीत मानधनवाढ, मासिक पेन्शन व ग्रॅट्युईटीचा निर्णय होईपर्यंत रोज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून लोक २५० ते ३००च्या संख्येने रोज उपस्थित राहतील असा निर्णय कृती समितीने घेतला आहे, असे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी सांगितले.
०००००
