लक्षवेधी
अजय तिवारी
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक धोकादायक बनत आहे. अलिकडे पुन्हा एकवार करण्यात आलेल्या हल्ल्यातून डोनाल्ड ट्रम्प बचावले असले तरी देशातील धोकादायक वातावरण उघड झाले आहे. दुसरीकडे अध्यक्षीय वादविवादानंतर मजबूत नेत्या म्हणून कमला हॅरिस यांची प्रतिमा उदयास आली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्कंठता वाढली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नेहमीच अनागोंदीने भरलेली असते. यंदाची निवडणूक तर आणखी गोंधळाची बनली आहे. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्सने अमेरिकेची विभागणी केल्यामुळे पाच नोव्हेंबर रोजी होणारी महत्त्वपूर्ण निवडणूक आता ‘स्विंग स्टेट्स’वर अवलंबून आहे. त्यामुळे ही निवडणूक जास्त चुरशीची होण्याची शक्यता आहे. आता अशी शक्यता आहे की ‘स्विंग स्टेट्स’ जिंकेल तो देशाचा पुढचा अध्यक्ष होईल; परंतु ट्रम्प यांचा एकूण स्वभाव लक्षात घेता आणि कमला हॅरिस यांना मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता ते पराभव सहन करू शकतील का? या राज्यांमध्येच ट्रम्प यांची टीम निवडणूक लढवण्याची आणि हॅरिस यांचा विजय अवैध ठरवण्याची तयारी करत असल्याची भीती वाढत आहे. त्याचे अनेक पुरावे सापडले आहेत. रिपब्लिकन वापरत असलेल्या अनेक घाणेरड्या युक्त्यांपैकी ही एक आहे. मंगळवारच्या चर्चेपूर्वी ट्रम्प यांनी हॅरिस यांच्या विरोधात प्रभावी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी शर्यतीतून माघार घेतल्यानंतर हॅरिस यांनी लोकशाही मोहिमेला चैतन्य दिले. त्या लोकांच्या नजरेत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना ट्रम्प यांनी त्यांच्यावर भयंकर वैयक्तिक हल्ले सुरू केले आणि धोरणावर लक्ष केंद्रित करण्याच्या त्यांच्या सहाय्यकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. ही चूक त्यांनी गेल्या वेळीही केली होती. वादविवादाच्या वेळी ट्रम्प यांनी हॅरिस यांच्यावर वैयक्तिक हल्ले केले, तर हॅरिस यांनी ट्रम्प यांच्या कमकुवतपणावर हल्ला केला. त्यामुळे ट्रम्प अनेक वेळा विचलित झाले. ट्रम्प हे त्यांच्या विरोधकांबद्दल वैयक्तिक टिप्पण्या करण्यासाठी अनेक वर्षांपासून ओळखले जातात. त्यांच्या अनेक समर्थकांच्या मते हॅरिस यांच्यावरील हल्ल्यामध्ये त्यांनी अनेक मर्यादा ओलांडल्या आहेत.
अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये ट्रम्प आता वंशवादावर उतरले आहेत. हॅरिस कृष्णवर्णीय आणि दक्षिण आशियाई आहे, अलीकडेच ती ‘काळी व्यक्ती’ बनली आहे.’ अशी टीका त्यांनी केली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मर्यादाभंग करताना ट्रम्प यांनी कृष्णवर्णीय पत्रकारांच्या परिषदेत म्हटले की, हॅरिस काळ्या आहेत, हे मला माहीत नव्हते आणि आता ती कृष्णवर्णीय म्हणून ओळखली जात आहे. ती भारतीय वर्णाची आहे. त्यांच्या या टिप्पण्या आक्षेपार्ह आहेत. त्यांची टीका तमाम भारतीयांना नाराज करणारी आहे, हे वेगळे सांगायला नको. ट्रम्प निवडणूक जिंकण्यासाठी वांशिक टिप्पण्यांचा आधार घेत आहेत, यावरून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा होतो. देशाचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बराक ओबामा यांचा जन्म अमेरिकेत झाला नसल्याचा खोटा आरोप करण्याचा ट्रम्प यांचा वर्णद्वेषाचा मोठा आणि घृणास्पद इतिहास आहे. आता ते हॅरिस यांच्यावरही अशीच टिप्पणी करत आहे.
ट्रम्प यांनी आठ वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या तत्कालीन उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावरही बेफाम आरोप केले होते. चुकीच्या लैंगिकतावादी आरोपांच्या मागील रेकॉर्डची पुनरावृत्ती करून ट्रम्प यांनी तेच विधान पुन्हा पोस्ट केले. प्रतिस्पर्ध्यावर चुकीचे हल्ले करण्याची गेल्या दहा दिवसांमधली त्यांची ही दुसरी वेळ. ती अशोभनीय आणि निषेधार्ह आहे. अमेरिकनांना वांशिक टिप्पणी आणि लैंगिक हल्ले आवडत नाहीत. हॅरिस यांच्यावर वांशिक आणि लैंगिक हल्ला करणारे ट्रम्प एकटे नाहीत. त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवल्यानंतर काही वेळातच इंटरनेटवर त्यांच्याबद्दलच्या चुकीच्या आणि लैंगिकतावादी कथांचा एक ऑनलाइन स्फोट झाला. त्यापैकी बरेच खोटे होते, हे सिद्ध झाले आहे. काही ‘सोशल मीडिया’ पोस्टमध्ये हॅरिस यांचे सॅन फ्रान्सिस्कोचे माजी महापौर विली ब्राउन यांच्याशी संबंध होते, असे म्हटले गेले. हा आरोप अनेक पुराणमतवादी प्रभावकर्त्यांनी पुन्हा जागृत केला. त्यांनी हॅरिस यांचा एक मॉर्फ केलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यात त्यांना बदनाम फायनान्सर आणि दोषी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनसोबत दाखवण्यात आले. बहुतेक चुकीच्या माहितीमध्ये लैंगिक ट्रोल्सच नाही, तर खोट्या ट्रान्सफोबिक लेखांचाही समावेश आहे. 2020 मध्ये अमेरिकन सनलाइट प्रोजेक्टच्या सह-संस्थापक, डिसइन्फॉर्मेशन वॉचडॉग, नीना जॅन्कोविझ यांनी केलेल्या एका अभ्यासात नमूद केले आहे की निवडणुकीदरम्यान 13 महिला राजकारण्यांवर हल्ले करणारी ‘लिंगभेद आणि विकृत माहिती’ची तीन लाख 36 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. यापैकी सुमारे 78 टक्के प्रकरणे हॅरिस यांच्यासंबंधी आहेत.
मागील निवडणुकीत ट्रम्प यांनी निवडणूक निकाल स्वीकारण्यास नकार दिला होता आणि त्यांच्या चिथावणीनंतरच समर्थकांनी अमेरिकन संसदेवर हल्ला केला. या वेळीही चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी कॅपिटल हिलवरील हल्ल्याचा बचाव केला. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पुराव्याशिवाय ठामपणे सांगितले की गैरप्रकार करून निवडणूक जिंकण्यात आली. कॅपिटलवर हल्ला करणाऱ्या हिंसक जमावाचा त्यांनी बचाव केला. ट्रम्प यांनी स्प्रिंगफील्ड, ओहायो येथे हैतीयन स्थलांतरितांवर पाळीव प्राणी मारल्याचा आणि खाल्ल्याचा घृणास्पद आरोप केला. याबाबत पुरावा मागितला असता ‘मी ते टेलिव्हिजनवर पाहिले’ असे बेजबाबदार उत्तर ट्रम्प यांनी दिले. टीव्हीवरील ताज्या वादामध्ये एक मजबूत नेता म्हणून हॅरिस यांची प्रतिमा उदयाला आली आहे, तर ट्रम्प पूर्णपणे नकारात्मक आणि उदास दिसत होते. त्यामुळे संपूर्ण रिपब्लिकन पक्षात नाराजी आणि उदासीनता आहे. वादविवादानंतर घेतलेल्या मतचाचण्यांमध्ये ट्रम्प लक्षणीयरीत्या मागे पडू लागले आहे. त्यामुळे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रभाव असणाऱ्या राज्यांमध्ये फेरविभागणी झाली आहे. प्रमुख स्विंग राज्यांमधील किरकोळ फरकावर निवडणुकीचे निकाल अवलंबून राहणे अपेक्षित आहे. हॅरिस यांचा संभाव्य विजय कमकुवत करण्याच्या प्रयत्नात ट्रम्प यांची टीम निकालांना आव्हान देऊ शकते, अशी चिंता वाढत आहे.
अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत असताना हॅरिस यांच्याविरोधात खोटे बोलण्यासाठी ट्रम्प यांची टीम तयार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इलॉन मस्कचे ट्विटर यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मस्क हे ट्रम्प यांची पूजा करत आहेत. ट्रम्प आणि त्यांचे समर्थक हॅरिस यांच्याकडून पराभव सहन करू शकतील का, हीच सर्वात मोठी शंका आहे. बेलगाम बंदुका असलेल्या अमेरिकेत आजघडीला ध्रुवीकरण शिगेला पोहोचले आहे, ते गृहयुद्धाला कारणीभूत ठरू शकते, यात शंका नाही. अमेरिकेत पाच नोव्हेंबरला होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ताज्या सर्वेक्षणाचे निकाल समोर आले आहेत. सर्वेक्षणानुसार, ट्रम्प आणि हॅरिस यांच्यात कोण कोणाला आणि किती प्रमाणात मागे टाकत आहे हे जाणून घेणे खूप मनोरंजक आहे. सर्वेक्षणामध्ये हॅरिस यांना 47 टक्के तर ट्रम्प यांना 42 टक्के मतदारांचा पाठिंबा असल्याचे दिसते. नोंदणीकृत मतदारांमध्ये केलेल्या या दोनदिवसीय सर्वेक्षणात हॅरिस यांना पाच टक्के गुणांची आघाडी मिळत असल्याचे दिसते. अध्यक्षीय वादविवाद ऐकणाऱ्यांपैकी 53 टक्के लोकांनी हॅरिस जिंकतील असे म्हटले तर 24 टक्के लोकांनी ट्रम्प जिंकतील, असे म्हटले आहे.
59 वर्षीय हॅरिस यांनी 78 वर्षीय ट्रम्प यांना अध्यक्षपदाच्या लढाईपुर्वी झालेल्या वादात बचावात्मक पावित्र्यात ढकलले आहे. डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन यांच्याकडून आलेल्या प्रतिक्रियांनुसार वारे कोणत्या दिशेने वहात आहे, हे ही स्पष्ट झाले आहे. 53 टक्के रिपब्लिकनांनी ट्रम्प यांनी सरशी वर्तवली आहे, तर 91 टक्के डेमोक्रॅट्सनी हॅरिस यांच्या विजयाची शक्यता व्यक्त केली. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत, ज्याचा आधुनिक काळात विचारही केला जात नव्हता. निवडणुका जवळ येत आहेत, तसतसे प्रचारातील विष वाढत आहे. ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. ट्रम्प यांचा प्रचार आणि त्यांचे भाषण याला मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. त्यांनी अमेरिकन समाजाला मित्र आणि शत्रूमध्ये विभागले आहे. आपल्या सोबत असणारा अमेरिकेचा मित्र आहे तर विरोधात असणारा अमेरिकेचा शत्रू आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यापूर्वी अमेरिकन निवडणुकांमध्ये असा विचार कधीच पहायला मिळाला नव्हता.
(अद्वैत फीचर्स)
