ठाणे : डाक विभागासोबत सर्वसामान्यांची नाळ जोडली गेली आहे. पोस्टमन सामान्यांना आपल्या जवळचा आणि कुटुंबातील सदस्य वाटतो. याच पद्धतीने विधी सेवा प्राधिकरण सुद्धा सर्वसामान्यांना आपले वाटू लागले आहे. प्राधिकरणाचीही नाळ सर्वसामान्यांशी जोडली जात आहे. लोक अदालतीच्या माध्यमातून न्याय आता लोकांच्या दारापर्यंत जात आहे, असे प्रतिपादन न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी यांनी केले. ठाणे डाक विभागातर्फे आयोजित केलेल्या डाक चौपाल- सरकार आपल्या दारी कार्यक्रमात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. जिल्हा नियोजन भवन सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी आमदार संजय केळकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार, महिला व बालकल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड जिल्हा महिती अधिकारी मनोज सानप आणि अभिनेते विघ्नेश जोशी या सर्वांनीही मनोगत व्यक्त केले. आमदार केळकर म्हणाले की, एस.टी महामंडळ व पोस्ट ऑफिस हे सर्वसामान्य जनमाणसाची सेवा करणारे विभाग आहेत. जिथे रस्ता नसेल तिथे एस.टी जाते. जिथे गाव तिथे पोस्टमन पोचतो. तर डॉ. कैलास पवार यांनीही पोस्टमन एस टी प्रमाणेच गाव, खेड्यापाड्यातील जीवन वाहिनी आहे. पूर्वी गावातील माणूस त्याची आतुरतेने वाट पाहत असायचा. तो सुखाची, दुःखाची बातमी घेऊन यायचा, मनी ऑर्डर घेऊन यायचा. माझ्या आयुष्यातून त्याचे महत्व आणि आठवण जाणे कदापि शक्य नाही असे सांगितले. प्रास्ताविकेत ठाणे पोस्ट ऑफिसचे प्रवर अधीक्षक समीर महाजन यांनी “डाक चौपाल” हा टपाल विभागाचा अभिनव उपक्रम आहे. सरकारच्या कल्याणकारी योजना आणि त्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी टपाल विभाग देशभरात पाच हजार डाक चौपालाचे आयोजन करीत आहे. हा उपक्रम 30 सप्टेंबर पर्यंत सुरू असेल. या चौपालच्या माध्यमातून टपाल विभाग प्रत्येक घरातील लोकांना जोडण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून एकही घर टपाल खात्याच्या कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही. ग्रामीण भागात सामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातल्या कामासंदर्भातील सुलभता सुनिक्षित करण्यासाठी डाक चौपाल महत्त्वाची भूमिका आहे अशी माहिती देतानाच या दिवशी एका छताखाली जनतेस डाक विभागाच्या तसेच सर्व सरकारी कल्याणकारी योजनांविषयी माहिती मिळेल तसेच या सर्व योजनांचा लाभदेखील घेता येईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, बँक खाते बाल आधार, आधार मोबाईल लिंकिंग, अपघाती विमा, महिला सन्मान बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, टपाल जीवन विमा, तसेच डाक विभागाची सर्व प्रकारची सेविंग्ज खाती या सर्व सेवा आणि योजनांचा समावेश असेल. भारतीय डाक विभागाच्या योजना आणि नागरिक केंद्रित सुविधांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे डाक विभाग सर्वतोपरी सज्ज आहे, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा दंत चिकित्सक अर्चना पवार यांनी डाक बचत खाते उघडले असता त्यांना न्या. सूर्यवंशी यांच्या हस्ते पासबुक देण्यात आले.
