इमारतीच्या बेसमेंट मधील दोन्ही बारला ठोकले सील
ओसी मिळण्याचा मार्ग सुकर
ठाणे : तब्बल १३ वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लढा देणाऱ्या ठाण्यातील रामचंद्रनगरमधील लाभेश को. ऑप. हौ. सोसायटीला अखेर यश मिळाले आहे. सोसायटीने केलेल्या चिवट पाठपुराव्याची ठाणे महानगरपालिकेला दखल घ्यावी लागली आहे. सोसायटीच्या तक्रारीवरून सदर इमारतीमध्ये सुरू असलेल्या दोन बारवर पालिकेने सीलबंद कारवाई केली.
ठाण्यातील रामचंद्र नगरात लाभेश को. ऑप. हौ. सोसायटी आहे. या सोसायटीतील इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या (गोडवून) ऐवजी श्रीमाता बिअर बार ॲण्ड रेस्टॉरंट आणि शितल बार अनधिकृतपणे सुरू आहेत. या दोन्ही बारमध्ये ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनेक कामे करण्यात आली आहेत. अनधिकृत, वाढीव कामे आणि वापर बदल करण्यात आले आहेत. याबाबत २०११ पासून उपरोक्त सोसायटी ठाणे महानगरपालिकेकडे मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत बांधकामे, वाढीव आणि वापर बदल कामे तोडण्याबाबत, दोन्ही बार बंद करण्यासाठी तक्रारी करत आहेत. सोसायटीने अनेकदा दोन्ही बार मधील अनधिकृत, वाढीव बांधकामांबाबत आणि वापर बदला बाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे अखेर ठाणे महानगर पालिकेने मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत कामे करणाऱ्या बारला नोटीस बजावून ते सिल करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार शुक्रवारी (ता.२७) पालिकेने दोन्ही बार सील करण्याची कारवाई केली. इमारतीतील बार आणि अनधिकृत, वाढीव बांधकाम आणि वापर बदलाचा येथील रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता कमिटीने मोठ्या हिमतीने आणि चिवटपणे ठाणे महानगर पालिकेच्या शहर विकास विभागाकडे पाठपुरावा केला. या इमारतीच्या विकासकाने इमारतीमध्ये मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनधिकृत वाढीव बांधकामे आणि वापर बदल करून त्याची विक्रीदेखील केली होती. इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या (गोडावून) ऐवजी शितल बार (चंद्र शितल बार) व श्रीमाता बिअर बार ॲण्ड रेस्टॉरंट (देवी दर्शन बार ॲण्ड रेस्टॉरंट) सुरू करून बारमधून तळमजल्यावर (दुकानाच्या रांगेत ११ नंबर गाळ्यात) जाण्यासाठी बेकायदा सिमेंट जिना बांधला आहे. त्यावरही कारवाईचे आदेश आहेत. याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे केलेल्या तक्रारीची पालिकेने दखल घेत शुक्रवारी शहर विकास आणि लोकमान्य सावरकर प्रभाग समिती (सहायक आयुक्त) जा. क्र.८८५ च्या पत्रानुसार या विभागाकडून दोन्ही बारवर सीलबंद करण्याची कारवाई केली.
बार मालकांच्या धमक्यांना आणि वेळोवेळी केल्या गेलेल्या खोट्या आरोपांना व आशीर्वादांना न जुमानता सोसायटीच्या सर्व सभासदांनी एकत्रितपणे गुंडगिरी विरुद्ध कायदेशीर लढा दिला आहे. त्याला आज यश मिळाले आहे, एवढे वर्ष एक अदृश्य शक्ती या सगळ्यांच्या मागे उभी होती, अशी भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली. तर हे बार पालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून कोणाच्या आशीर्वादाने चालत होते याचाही पालिका प्रशासनाने शोध घेऊन त्यांच्यावरही एमआरटीपी आणि इतर कलमांतर्गत कठोर कारवाई करायला हवी अशी मागणी रहिवाश्यांकडून केली जात आहे.
दरम्यान इमारतीमधील सोसायटीत चेरमेन, सेक्रेटरी आणि इतर विविध पदांवर काम करणारे दुलाजी लक्ष्मण लाड यांनी पदाचा गैरवापर करत बेसमेंटमध्ये बार सुरू करण्याची नियम बाह्य परवानगी आणि नाहरकत दिली. बारमध्ये मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनधिकृत, वाढीव कामे आणि वापर बदल केले. हे सर्व पालिका आणि मंजूर नकाशाच्या विरोधात असल्याने ठाणे महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त आर ए राजीव यांनी त्यावेळेचे चेअरमन, सेक्रेटरी दुलाजी लाड यांच्यावर मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनधिकृत, वाढीव आणि वापर बदल काम केल्याचा ठपका ठेवत एमआरटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्यापि दुलाजी लाड याच्यावर गुन्हा दाखल झाला नसून तो तत्काळ दाखल करावा अशी मागणी सोसायटीकडून केली जात आहे. तर पालिकेने वेळोवेळी केलेल्या अनधिकृत आणि वाढीव बांधकाम, वापर बदल यावर केलेल्या कारवाईमुळे सदर इमारतीला ओसी मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून रहिवाशांचा १३ वर्षांचा वनवास संपणार आहे.
0000
