विद्यार्थ्यांनी मांडले स्वच्छता विचार
नवी मुंबई : स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने स्वच्छतेची सवय लागणे महत्वाचे आहे हे लक्षात घेत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई शहराचे भविष्य असणा-या नव्या पिढीच्या मनावर स्वच्छताविषयक विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थीदशेपासूनच स्वच्छतेचे संस्कार रूजविले जात आहेत. या माध्यमातून शहराचे भविष्य स्वच्छ व सुरक्षित केले जात आहे.
त्यानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणा-या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये नमुंमपा शिक्षण विभागाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली शालेय स्तरावर विविध स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. या अनुषंगाने नुकत्याच महापालिका शाळांप्रमाणेच खाजगी शाळांमध्येही वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत आपले विचार मांडले.
वक्तृत्व व निबंध स्पर्धेकरिता स्वच्छतेशी संबंधित विषय देण्यात आले होते. ज्यामध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता महात्मा गांधी, संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यापैकी एक विषय निवडण्याचा पर्याय होता. त्याचप्रमाणे इ.सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता माझ्या स्वप्नातील शहर, स्वच्छतेतून समृध्दीकडे यापैकी एक विषय निवडायचा होता. तसेच इ.नववी – दहावी गटाकरिता ऊठ तरूणा जागा हो – स्वच्छतेचा धागा हो आणि स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता यापैकी एक पर्याय निवडण्याचे सूचित केले होते.
या विषयांच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक, 23 माध्यमिक शाळांप्रमाणेच खाजगी 333 शाळांतील 10 हजार 512 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपले स्वच्छताविषयक विचार मांडले.
निबंध स्पर्धेतही नवी मुंबई महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक, 23 माध्यमिक शाळांसोबत खाजगी 333 शाळांतील 10 हजार 426 विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपले स्वच्छता विचार शब्दांकित केले.
विद्यार्थी म्हणून आपण स्वच्छता कार्यात कसे योगदान देऊ शकतो याचा विचार या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वतीने अविष्कृत झाला. या स्पर्धांची तयारी करताना विद्यार्थ्यांसह त्यांचे शिक्षक व पालकही स्वच्छतेशी निगडीत स्पर्धेतील विषयांच्या अनुषंगाने स्वच्छतामय झाल्याचे चित्र शाळांमधून तसेच स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या घरांमधून बघावयास मिळाले.
या स्पर्धांमधून केंद्रनिहाय प्रत्येक गटातून एका विद्यार्थ्याची निवड करण्यात आली असून निबंध स्पर्धेतील 30 व वक्तृत्व स्पर्धेतील 30 अशा बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी बारकाईने विचार केला व तो मांडला हे या स्पर्धा उपक्रमाचे यश असून याव्दारे नवी मुंबईतील घराघरांत स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांमार्फत प्रसारित झाला.
००००
