ठाणे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटर झालेला आरोपी अक्षय शिंदे याचे पार्थिव दफन करण्याचा निर्णय त्याच्या पालकांनी घेतला होता. कोर्टात केस सुरु असल्यामुळे भविष्यात पार्थिवाची गरज लागल्यास हा निर्णय घेण्यात आला होता. पण त्याच्या पार्थिवाला बदलापूरमध्ये दफन करण्यास स्थानिंकांनी विरोध दर्शविल्यानंतर हा वादा कोर्टात गेला होता. अखेर सोमवारपर्यत अक्षयचे पार्थिव दफन करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानुसार  उल्हासनगर  येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेचे पार्थिव दफन करण्यात आले.

स्थानिकांचा विरोध लक्षात घेता यावेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात अक्षयच्या मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला आहे. अक्षय शिंदे याचा अंत्यविधी बदलापूरमध्ये करण्यास स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर, अक्षयच्या कुटुंबीयांनी अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीतील जागेची सुद्धा पाहणी केली होती. मात्र, अंबरनाथमध्ये सुद्धा मनसे आणि शिवसेनेने त्याचा अंत्यविधी करण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर, उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी खड्डा खोदण्यात आला. मात्र, येथेही स्थानिकांकडून विरोध होत होता. अक्षय शिंदे याच्या दफन विधीसाठी खोदलेला खड्डा येथील कार्यकर्त्यांनी बुजवला होता, तो खड्डा पुन्हा उतरण्यासाठी जेसीबी स्मशानभूमीत आणण्यात आला. त्यानंतर, पोलिसांच्या बंदोबस्तात पुन्हा हा खड्डा खोदण्यात आला.

दरम्यान, पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाने आज अक्षयच्या आई-वडिलांना शवागृहात नेले होते. त्यानंतर, अक्षय शिंदेचा मृतदेह त्याच्या आई आणि वडिलांनी ताब्यात घेतला, त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शववाहिका उल्हासनगर दिशेने निघाली. उल्हानगरमध्ये कडक पोलिस बंदोबस्तात अक्षयच्या मृतदेहाचे दफन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *