संतोष बस्नेत प्रशिक्षकपदी नियुक्त; प्रिशा शेट्टीची भारतीय संघात निवड
छत्रपती संभाजीनगर : जागतिक तायक्वांदो ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय तायक्वांदो संघाच्या प्रशिक्षकपदी छत्रपती संभाजीनगरच्या संतोष बस्नेत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘इंडिया तायक्वांदो’चे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी भारतीय ज्युनियर तायक्वांदो संघ जाहीर केला असून, संघाच्या प्रशिक्षकपदी संतोष बस्नेत यांची निवड करण्यात आली आहे. जागतिक तायक्वांदो ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धा दक्षिण कोरियात २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे, अशी माहिती इंडिया तायक्वांदोचे सचिव अमित धमाळ यांनी दिली.
भारतीय तायक्वांदो मुलींच्या संघात प्रिशा शेट्टी, अरण्या ठाकूर, पिहू कुमारी, पूजा, झेना राजा, सक्षम यादव, रामडिंगलानी, वैष्णवी चौधरी, जनानी, टुलीप ओझा या खेळाडूंचा समावेश आहे. सातारा येथील प्रिशा शेट्टी हिला प्रशिक्षक अक्षय खेतमर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रिशा जागतिक तायक्वांदो स्पर्धेत आपला ठसा उमटवेल असा विश्वास महासचिव गफार पठाण यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय मुलांच्या संघात मनजीत सिंग राठोड, हरमन सिंग गिल, हार्दिक अहलावत, अमन, कुणाल, नेहाल देवाली, क्षितिज तिवारी, अरमान इन्सान, आयुष शुक्ला आणि उज्ज्वल या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी संतोष बस्नेत यांची नियुक्ती इंडिया तायक्वांदोतर्फे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष संदीप ओंबासे, महासचिव गफार पठाण, आणि खजिनदार डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी संघातील खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष संदीप ओंबासे यांनी सांगितले की, “भारतीय संघात महाराष्ट्रातील खेळाडूंना संधी मिळाल्यामुळे राज्यातील तायक्वांदो खेळाचा विकास होईल आणि या खेळाडूंचे यश भविष्यातील युवा खेळाडूंना प्रेरणा देईल.” महासचिव गफार पठाण यांनी असे मत व्यक्त केले की, “प्रिशा शेट्टी आणि प्रशिक्षक संतोष बस्नेत यांनी आपल्या परिश्रमाने हे स्थान मिळवले आहे, त्यांच्या यशासाठी आम्ही शुभेच्छा देतो.” खजिनदार डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी नमूद केले की, “प्रिशा शेट्टीचे जागतिक स्पर्धेसाठी होणारे प्रदर्शन आणि संतोष बस्नेत यांचे नेतृत्व भारतीय संघाला उत्कृष्ट कामगिरी करण्यास प्रोत्साहित करेल.
महाराष्ट्र राज्य तायक्वांदो असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष तुषार आवटे व घनश्याम सानप , सचिव सुरेश चौधरी कार्यकारिणी सदस्य नारायण वाघाडे, प्रमोद दौंडे , आणि पद्माकर कांबळे यांनी देखील संघातील खेळाडू व प्रशिक्षक यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
00000
