अनिल ठाणेकर/अरविंद जोशी

 

भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीमध्ये ज्येष्ठ साहित्यकार हरिवंशराय बच्चन उत्तर भारतीय भवन उभारणे हे काम सुरु आहे. शहरातील साहित्यप्रेमी, कला व संस्कृती प्रेमी तसेच हिंदी भाषिकांच्या मागणीनुसार हे उत्तर भारतीय भवनाचे काम सुरु करण्यात आले असून आता शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याने राज्य सरकारने या भवनासाठी आणखी २५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. आधीचे १५ कोटी व आता २५ कोटी असे एकूण ४० कोटींच्या निधीतून हे आधुनिक भवन उभे राहत आहे , या भवन उभारणीच्या कामाला आता वेग येणार आहे , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.
सर्व जाती धर्माचे लोक मीरा भाईंदर शहरात गुण्या गोवींदाने एकोप्याने प्रेमाने राहतात. “मिनी भारत” अशी मीरा भाईंदर शहराची ओळख आहे आणि मीरा भाईंदर मधील सर्व प्रमुख समाजांना हक्काची जागा मिळावी यासाठी विविध समाज भवन आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या दोन वर्षात मंजूर करून त्यासाठी राज्य सरकार कडून मोठ्या प्रमाणात मंजुरीसह निधी आणला. त्यातील बऱ्याचशा समाज भवनाची कामे प्रगतीपथावर आहेत. “सबका साथ – सबका विकास” हे सूत्र ठेऊन आमदार सरनाईक यांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मीरा भाईंदर शहरात हिंदी भाषिकांची संख्याही मोठी असून त्यांना हक्काचे भवन मिळावे यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीमध्ये ज्येष्ठ साहित्यकार हरिवंशराय बच्चन उत्तर भारतीय भवन उभारणे या कामाचे भूमिपूजन करून ते काम सुरु करण्यात आले. सुरुवातीला हे काम कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या मोबदल्यात बिल्डर करून देणार होता. तसे या बिल्डरने महापालिका अधिकाऱ्यांसमोर कबूल केले होते. पण नंतर त्या बिल्डरने नकार दिल्याने निधीचा प्रश्न निर्माण झाला तसेच कामाला उशीरही झाला. आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकार कडे पाठपुरावा करून , उत्तर भारतीय भवनाच्या कामासाठी राज्य सरकारकडून आधी १५ कोटी रुपये निधी मंजूर करून आणले होते. त्यातून भवनाचे काम सुरु आहे. पण या भवनाच्या कामाची भव्यता लक्षात घेता आणखी २५ कोटी निधी दिला जावा यासाठी आमदार सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे भवनाच्या उर्वरित कामासाठी आणखी २५ कोटी निधी देण्याचा शासन निर्णय झाला असून निधीच्या तरतुदीचा शासन निर्णय जारी झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी मंजूर केला आहे. या भवनाच्या पायाभरणीचे फाउंडेशनचे काम झाले आहे. वाढीव निधी मंजूर झाल्याने आता ९ मजल्याचे हे अद्ययावत सुसज्ज असे या भवनाचे काम वेग घेणार आहे , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.
प्रत्येक समाजाला दिला न्याय
आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल सुरु ठेवली आहे. आमदार सरनाईक यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात मीरा भाईंदर शहरातील प्रत्येक समाजाला हक्काचे समाज भवन मंजूर करून दिल्यामुळे प्रत्येक समाजात आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येक राज्याची किंवा त्या त्या प्रदेशाची संस्कृती परंपरा असते. हि संस्कृती परंपरा कला आपण जोपासली पाहिजे. वर्षात विविध सण उत्सव कार्यक्रम असतात. विद्यार्थी , तरुण , ज्येष्ठ नागरिक , माता भगिनी यांच्यासाठीही विविध कार्यक्रम होतात. सामाजिक सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक कार्यक्रमही प्रत्येक समाजाकडून होत असतात. हे सर्व कार्यक्रम व विविध सामाजिक उद्देशांसाठी या समाज भवनाचा वर्षभर चांगला उपयोग लोकांना होईल, असेही आमदार सरनाईक यांनी सांगितले.
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *