वादविवाद
अजय दीक्षित, चेन्नई
तिरुपती बालाजी देवस्थानमध्ये देण्यात आलेल्या लाडवांच्या प्रसादात चरबी आणि माशाचे तेल वापरण्यात आल्याच्या आरोपावरून काहूर माजले. हा भाविकांच्या श्रद्धांशी खेळ आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू असले, तरी तिरुपती देवस्थानच्या प्रतिमेला धक्का बसतो आहे. या प्रकाराचा नेमका सोक्षमोक्ष लावून वाद संपवणे गरजेचे आहे.
आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिराच्या प्रसादा(लाडू)मध्ये वापरण्यात आलेल्या तुपात प्राण्यांची चरबी आणि माशाचे तेल असल्याचा एक अहवाल अलिकडेच समोर आला. या प्रकरणावर प्रत्येकजण प्रश्न उपस्थित करत आहे. प्रसादात भेसळ करून हिंदूंच्या श्रद्धेला तडा दिला गेल्याचा आरोप केला जात आहे. लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी मिसळल्याचे प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांमधून स्पष्ट झाल्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केल्यानंतर देशभर खळबळ उडाली. दुसरीकडे, अशा प्रकारच्या अहवालालाच आव्हान देण्यात आले आहे. केंद्र सरकारने चार कंपन्यांच्या तुपांचे नमुने तपासले असून एका कंपनीला नोटीस पाठवली आहे. त्याच वेळी नायडू यांच्या आरोपावर माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे तर काहींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाच्या अहवालाबाबत चिंता व्यक्त केल्यावर हा वाद सुरू झाला. ‘एआर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड’च्या तुपात प्राण्यांची चरबी मिसळल्याची पुष्टी अहवालात मिळाल्याचे चंद्राबाबूंनी सांगितले; परंतु असे तूप खरेदी केलेच नाही, संशय आल्यानंतर तूप नाकारण्यात आल्याचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सांगितले. कोण खरे, कोण खोटे हे तपासात उघड होईल; परंतु त्यांच्या धार्मिकतेचा आणि तिरुपती देवस्थानमधील लाडवांमध्ये झालेल्या भेसळीचा संबंध लावला जात आहे.
मंदीर संस्थानाला तूपपुरवठा करणारे उत्पादक बाजारभावापेक्षा खूपच कमी दराने तूप पुरवत होते, तेव्हा मंदिर संस्थेशी संबंधित लोकांना संशय येऊ लागला. अशा स्थितीत तुपाचा दर्जा तपासण्याची मागणी जोर धरू लागली. संशय अधिक गडद झाल्याने मंदिरात तूपपुरवठा करणाऱ्या सर्व डेअरीच्या तुपाची चाचणी घेण्यात आली. प्रीमियर ॲग्री फूड्स, कृपाराम डेअरी, वैष्णवी, श्री पराग मिल्क आणि एआर डेअरी फूड तिरुमला तिरुपती देवस्थानला तूप पुरवत असे. या घटनेचा परिणाम भारतातील इतर मंदिरांवरही झाला आहे. वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात अधिकारी आता अतिरिक्त दक्षता घेत आहेत. प्रशासनाने मंदिरात बनवल्या जाणाऱ्या लाडूंची शुद्धता तपासण्यास सुरुवात केली आहे. देशातील प्रत्येक मोठ्या देवस्थानाच्या प्रसादालयात बनवल्या जाणाऱ्या प्रसादासाठी मागवण्यात येणाऱ्या कच्च्या मालाची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रयोगशाळा असतात. शिर्डीच्या साई संस्थानचीही प्रयोगशाळा आहे. त्यात कच्च्या मालाची गुणवत्ता तपासली जाते. त्याचबरोबर दैनंदिन भोजनालयातील अन्नाची चवही अगोदर प्रसादालय व्यवस्थापक घेतात आणि नंतरच भाविकांना दिले जाते. या पार्श्वभूमीवर तिरुपती बालाजी देवस्थानकडे प्रयोगशाळा असताना तुपातील चरबी त्यांच्या लक्षात आली नाही का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी भगवान विष्णूचे अवतार आहेत. गेल्या तीनशे वर्षांपासून त्यांच्या मंदिरात येणाऱ्या हिंदू भाविकांना प्रसाद म्हणून लाडू दिले जात असून या लाडूला 2014 मध्ये ‘जीआय’ टॅगही मिळाला आहे. म्हणजे तिरुपती तिरुमला नावाचा हा लाडू फक्त आंध्र प्रदेशच्या तिरुपती मंदिरातच मिळतो. असे असताना चंद्राबाबू नायडू यांच्या दाव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला. वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तिरुपतीमधील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरालाही सोडले नाही आणि लाडू बनवण्यासाठी निकृष्ट साहित्य आणि प्राण्यांची चरबी वापरली, असा आरोप त्यांनी केला. तुपाच्या नमुन्यात प्राण्यांची चरबी, ‘लार्ड’ (डुकराच्या चरबीशी संबंधित) आणि माशांचे तेल असल्याचा दावाही केला होता. नमुने गोळा करण्याची तारीख 9 जुलै 2024 होती आणि प्रयोगशाळेचा अहवाल 16 जुलैचा होता. निविदेतील अटीनुसार, तूप खरेदी केल्यानंतर त्याची चाचणी करणे आवश्यक असते. चाचणीनंतरच तुपाचा वापर करायचा असतो. निविदेतील अटींचा भंग करून तूप चाचणीसाठी पाठवण्यात आले नाही. निविदेतील कलम 80 नुसार, पुरवठा केलेल्या तुपाच्या प्रत्येक खेपेसाठी एनएबीएल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. याशिवाय, निविदा कलम 81 नुसार तुपाचे नमुने तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) ला प्रयोगशाळा चाचणीसाठी पाठवणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर ऑगस्ट 2023 ते जुलै 2024 या कालावधीत काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीच्या आधीच्या नमुन्यांमध्ये ही भेसळ कशी आढळून आली नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तिरुपती देवस्थान ट्रस्टने ‘एनएबीएल’ प्रमाणपत्रासाठी तसेच चाचणीसाठी नमुने पाठवले नाहीत का, हा प्रश्न उरतो. काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीच्या ज्या बॅचमध्ये भेसळ आढळली, त्याचे ‘एनएबीएल’ प्रमाणपत्र सादर केले नाही का? गुणवत्तेच्या कमतरतेचे कारण म्हणजे ‘इन हाऊस लॅब’चा अभावही समोर आला. नमुने तपासणीसाठी बाहेरील प्रयोगशाळेत पाठवणे आणि वाजवी दर नसणे या कमतरतांचा फायदा घेत पुरवठादारांनी 320 ते 411 रुपये प्रती किलोचा दर घेत तूपपुरवठा केला. तेलगु देसम पक्षाच्या सरकारने तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी म्हणून जे. एस. राव यांची नियुक्ती केली. त्यानंतर भेसळीचा अहवाल आला आणि ‘एआर डेअरी फूड’चा करार रद्द करण्यात आला. ‘एआर डेअरी’ने म्हटले आहे की नामांकित ‘एनएपीएल लॅब’मध्ये चाचणी केल्यानंतर आणि ॲगमार्क प्राधिकरणाद्वारे प्रमाणित केल्यानंतरच आम्ही तुपाचे टँकर पाठवले. पाचपैकी एका टँकरबाबत तिरुपती देवस्थानची तक्रार होती. त्या एका टँकरच्या अहवालालाही आम्ही आव्हान दिले आहे. तिरुपती देवस्थानाला दररोज दहा टन तूप लागते. त्यापैकी आम्ही 0.1 टक्कादेखील तूप पुरवत नाही. अहवालात इतर कारणेही नमूद करण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, हे चारा किंवा जनावरांच्या औषधामुळेदेखील होऊ शकते. अहवालात आमचे नाव नाही. आम्ही आरोप फेटाळून अहवालाला आव्हान दिले आहे.
तिरुपती मंदिरानंतर पाटण्यातील महावीर मंदिरात लाडूंची सर्वाधिक विक्री होते. बुद्ध मार्गावर असलेल्या एका कारखान्यात तामिळनाडू आणि कर्नाटकमधील कारागीर प्रसाद म्हणून लाडू तयार करतात. तिथे महावीर मंदिराचे लाडू तयार केले जातात. कारखान्याचे प्रभारी आर. शेषाद्री म्हणाले की नैवेद्य तयार करण्यासाठी बेसन, हरभरा डाळ, शुद्ध गायीचे तूप (नंदिनी ब्रँड), काजू, बेदाणे आणि वेलची यांचा वापर केला जातो. तिरुपती मंदिरातही पूर्वी फक्त नंदिनी तूप वापरले जात होते; परंतु भाव वाढल्याने अन्य कंपन्यांचे तूप वापरण्यास सुरुवात झाली. पाटण्याच्या महावीर मंदिरात मात्र भाव वाढल्यानंतरही नंदिनी तूप घेणे थांबवले गेले नाही. तिरुपतीनंतर देशात दुसऱ्या क्रमाकांच्या लाडूची विक्री तिथे होते. शिर्डीतही साई संस्थान पूर्वी भाविकांना लाडू देत होते. कोणतेही तूप वापरले तरी लाडू बनवल्यानंतर काही वेळात गोठते. त्यामुळे लाडवाला बुरशी लागल्यासारखे दिसते. वास्तविक ती बुरशी नसते; परंतु संशयाला जागा नको, म्हणून आता साई संस्थानने भाविकांना लाडूऐवजी बुंदीचा प्रसाद द्यायला सुरुवात केली आहे. बुंदी तेलात तळली जाते. ती सुकवून भाविकांना दिली जाते. त्यामुळे ती कितीही काळ टिकते. लाडवाचे तसे नसते. लाडू गरम गरम असतानाच बांधावे लागतात. ते सुकल्यानंतर काही काळाने तूप पुन्हा गोठते. बुंदी न वाळवता पॅक केली आणि तुपात तयार केली असल्यास वास येतो. या पार्श्वभूमीवर देशात महागाई वाढत असताना उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात तिरुपती बालाजी देवस्थानला कमी दरात तूप देण्याची तयारी उत्पादकांनी का दाखवली आणि विश्वस्तांनी त्यावर अंधपणाने विश्वास का ठेवला, असे प्रश्न उपस्थित होतात. कर्नाटकच्या नंदिनी दूध संघाने 2015 मध्ये 324 प्रति किलो दर दिला होता, तेव्हा महाराष्ट्रातील ‘गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस्’ची 276 प्रति किलो दराची निविदा तिरुपती देवस्थानने मंजूर केली होती. आठ वर्षांनंतर महागाई वाढली. गायीच्या तुपाची किंमत 500 रुपये प्रति किलो असताना एका खासगी कंपनीने 320 रुपये प्रति किलो दराने कसे देऊ केले, असा प्रश्न विश्वस्त मंडळाला पडला नाही. आत्ता मंदिराने 475 रुपये प्रति किलो दराने नंदिनी तूप खरेदी करणे पुन्हा सुरू केले आहे. तिरुपती देवस्थान देत वा विकत असलेले लाडू सुरक्षित आणि भेसळमुक्त आहेत, याची खात्री करण्याची जबाबदारी देवस्थानची आहे; मात्र तूप पुरवठादाराला दोषी ठरवून ते या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवू इच्छितात. गोमांस हा वादाचा विषय आहे आणि आता तो प्रसादमशी जोडला गेला आहे, हे पाहता राजकीय पक्षांनी तणाव निर्माण करणे टाळायला हवे होते. आता आरोप-प्रत्यारोप झाले आहेत आणि संशयाची बीजे पेरली गेली आहेत. लाडूचे पावित्र्य विज्ञानाच्या आधारेच ठरवले पाहिजे.
(अद्वैत फीचर्स)
