नागपूर : रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस, राज्यसभेचे माजी उपसभापती दिवंगत नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षात रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा संकल्प रिपब्लिकन पक्षाचे ( खोरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र यांनी पक्ष कार्यकर्त्यासमोर बोलताना केला. नागपूर येथील हिंदी मोर भवन मध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. काही लोक रिपब्लिकन पक्ष संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र उपेंद्र शेंडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्ते जिद्दीने रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ.एन. व्ही. ढोके यांनी यावेळी बोलताना सांगितले. राष्ट्रीय संघटक सचिव उत्तमराव गवई यांनी रिपब्लिकन पक्ष आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवनावर परखडपणे विचार मांडले.
—–मविआला भाऊ निरभवणे यांचा इशारा
रिपब्लिकन पक्ष खोब्रागडे गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे म्हणाले बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी आयुष्यभर काँग्रेस विरोधात काम केलेले आहे. असे असतानाही अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी रिपब्लिकन पक्षा (खोरिपा) ने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. आता महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मविआने आमच्या बरोबर सन्मानपूर्वक जागा वाटपाबाबत चर्चा करावी. नाही तर आम्ही रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्वबळावर विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेऊ शकतो,असा इशारा भाऊ निरभवणे यांनी मविआला दिला.
पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष-माजी प्राचार्य डॉ. गोपीचंद मेश्राम, राष्ट्रीय सहप्रवक्ते प्रशिक आनंद, ज्येष्ठ नेते पंजाबराव रामटेके, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन बागडे, चिटणीस प्रा. अशोक ढोले, कार्याध्यक्ष डॉ. देवेश कांबळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे, वर्धा जिल्हा अध्यक्ष विनायकराव ताकसांडे , अतुल खोब्रागडे, आदी मान्यवरांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवनावर आपले विचार मांडले. सूत्रसंचालन विदर्भ प्रदेश अध्यक्ष सी. पी. रामटेके यांनी तर प्रास्ताविक नागपूर प्रदेश अध्यक्ष राजू भाऊ गजभिये यांनी केले. आभार प्रदर्शन प्रशांत डांगे यांनी केले. यावेळी गोपाळराव खोब्रागडे, भीमराव चौरे, विनोद साळवी, सरदार कर्नेलसिंग दिघवा, विक्रांत पाटील, दिगंबर वाकोडे, सिद्धार्थ रामटेके, आनंद वानखेडे, सुरेश दहिकर, अरूण कांबळे,प्रकाश तारू आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
000000
