आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विकासकामांचे मुख्यमंत्री करणार लोकार्पण, भूमिपूजन

ठाणे : शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मीरा भाईंदर शहरात येत असून त्यानिमित्ताने संपूर्ण शहर भगवे झाले आहे. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री करणार आहेत. तत्पूर्वी हजारो महिलांचा सहभाग असलेली “कलश यात्रा” शहरात काढली जाणार आहे. आमदार प्रताप सरनाईक आयोजित भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलनाला मुख्यमंत्र्यांसह दोन जगदगुरु शंकराचार्य उपस्थित राहणार आहेत.
भाईंदर येथील हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानात “भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलना”ची सुरुवात झाली असून प्रसिद्ध प्रवचनकर्ते श्री अनिरुद्धाचार्य जी महाराज यांच्या प्रवचनाने सुरुवात करण्यात आली. त्याला हजारो भक्तांनी पहिल्याच दिवशी उपास्थिती लावली. अतिशय भक्तिमय वातावरणात कालचे प्रवचन संपन्न झाले. या भागवत सत्संगाला ठाणे, मिरा-भाईंदरमधील हजारो भक्तांनी भरभरुन प्रतिसाद दिला. ३० सप्टेंबर रोजी “भागवत सत्संग ~ सनातन राष्ट्रसंमेलना”चा सायंकाळी समारोप होणार असून त्यावेळी जगद्गुरु शंकराचार्य, विविध साधू महंत, आध्यत्मिक क्षेत्रातील दिग्गज या संमलेनात उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलनात उपस्थित राहणार आहेत. भागवत सत्संग कार्यक्रमानंतर स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुरावा व त्यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यात मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात हायवे जवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा , घोडबंदर किल्ला सुशोभीकरण , हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे कला दालन , थोर निरुपणकार श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह , नवघर तलाव सुशोभीकरण व म्युझिकल फाउंटन , काशीमीरा जरीमरी तलाव सुशोभीकरण व म्युझिकल फाउंटन या कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. सोमवारी तिसऱ्या दिवशी अनंत श्री विभूषित श्री पश्चिमाम्नाय द्वारकाशारदापीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामीश्री सदानन्द सरस्वती जी महाराज, जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती ‘1008’ महाराज , अनंत श्री विभूषित श्री अयोध्या कोसलेस सदन पीठाधीश्वर जगद्गुरू रामानुजाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्य ‘विद्याभास्कर’ जी महाराज, स्वामी गोविंद देव गिरी जी महाराज कोषाध्यक्ष – राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास (अयोध्या), प. पू. बालयोगी श्री सदानंद महाराज, गजानन ज्योतकर गुरूजी अयोध्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा पुरोहित हे आज या संमलेनात उपस्थित राहून आशीर्वाद व मार्गदर्शन करणार आहेत. मीरा भाईंदर शहराच्या इतिहासात जगद्गुरू शंकराचार्य व इतके साधू महंत पहिल्यांदाच शहरात येत आहेत, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *