माथेरान : ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेत शिक्षक आणि त्यानंतर तिथेच मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त होणे, इथल्या विद्यार्थ्यांना घडवत असताना गावविषयी सहानुभूती आणि सर्वांच्या सहकार्याने गावात एक वेगळाच ठसा उमटवला आहे. अनेक कटू प्रसंगांना सामोरे जाऊन धैर्याने उभ्या राहणाऱ्या आमच्या गव्हाणकर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी शाळेसाठी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे आणि आदर्श शिक्षकाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कल्पना पाटील आहेत असे गौरवोद्गार शाळेचे विश्वस्त प्राचार्य शशीभूषण गव्हाणकर यांनी काढले.
मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात गव्हाणकर बोलत होते. कल्पना पाटील यांच्या वाढदिवशीच त्यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम म्हणजे एक दुग्धशर्करा योग असल्याचे काहींनी आपल्या भाषणात नमूद केले तर केवळ शाळेपुरता मर्यादीत न राहता कल्पना पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी गावात अत्यावश्यक सुविधा निर्माण होण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न केले.आता पाटील यांनी पुढील काळात गावाच्या हितासाठी राजकीय क्षेत्रात आगमन केल्यास नक्कीच या गावाला दिशा मिळू शकते असे मत माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
कल्पना पाटील यांनी अत्यंत तळमळीने आणि कष्टाने शाळेसाठी मेहनत घेतली आहे. शाळेला ज्या काही उणीवा होत्या त्या भरून काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्या उत्तम शिक्षिका तसेच विद्यार्थ्यांना मायेने प्रेम देणाऱ्या माऊली होत्या सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामजिक कार्यात सहभागी व्हावे असे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी स्पष्ट केले.असंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षिकेचा निरोप समारंभ कार्यक्रमात अनमोल विचार व्यक्त केले माथेरानच्या इतिहासात पहिल्यांदाच एका शिक्षिकेचा सेवानिवृत्त कार्यक्रम मोठया संख्येने उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या समवेत पार पडला. हे त्यांनी शाळेला दिलेल्या अभूतपूर्व योगदान आणि श्रमाचे द्योतक असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली. शालेय विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थ्यांचे डोळे यावेळी पाणावले होते.

कोट
सेवानिवृत्त होण्याआधी माझ्या रजा शिल्लक होत्या परंतु मी त्या घेतल्या नाहीत कारण मला माझे सर्व दिवस हे शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसोबतच आनंदाने व्यथित करावयाचे होते.मला या शाळेने, विद्यार्थ्यांनी,शिक्षकांनी आणि या गावाने भरभरून प्रेम दिले आहे याची पोचपावती आज सेवानिवृत्त कार्यक्रमास ही सर्वांची उपस्थिती सांगून जात आहे.
कल्पना पाटील—मुख्याध्यापिका गव्हाणकर ट्रस्ट शाळा माथेरान

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *