नोंद

प्रसाद देशपांडे

बड्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरीभोवतीचे वलय गेल्या काही वर्षांमध्ये काहीसे फिकट झाले आहे. कामाचा अतीताण आणि त्यामुळे होणाऱ्या मानसिक-शारीरिक त्रासाच्या घटनांमुळे खळबळ माजली आहे. अलिकडेच एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या ॲना सेबेस्टियन या मुलीचा अतीकामाच्या ताणाने मृत्यू झाला. कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका यावा, इतका ताण या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांवर का असतो ?

कोणताही कर्मचारी नोकरी करतो ते कारकिर्द घडवण्यासाठी आणि पैसा कमावण्यासाठी. काम केल्याबद्दल मिळणारा पगार त्याला काम करण्यासाठी प्रोत्साहित करतो. अधिक काम करण्याबद्दल अधिक पैसे मिळणार असतील तर तो आनंदाने तयार होतो. मग ती आयटी कंपनी असो, मॅन्युफॅक्चरिंग किंवा सरकारी कंपनी असो अथवा सेवा देणारी कंपनी असो. काम करण्यासाठी आलेली व्यक्ती स्वत:हून कंपनीत अर्ज करते, मुलाखत देते, सर्व अटी मान्य करते आणि स्वेच्छेने काम स्वीकारते. एक कर्मचारी म्हणून तुम्ही कंपनीला उत्कृष्ट संख्यात्मक आणि गुणात्मक आउटपुट दिले पाहिजे, ही वरिष्ठांची अपेक्षा असते. पण, आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यावर, त्याच्या प्रकृतीवर वाईट परिणाम व्हावा इतका कामाचा ताण असेल तर ते नक्कीच गैर आहे. इतर सर्व कंपन्यांप्रमाणेच आयटी कंपन्यांमध्येही दोन प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. एचआर, फायनान्स किंवा सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणारे लोक आणि मार्केटिंगसाठी किंवा ग्राहकांसाठी प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी. अर्थातच बाहेर सेवा पुरवणाऱ्यांना कंपनीकडून टारगेट्स दिली जातात. ती पूर्ण करण्यासाठी वेळेची मर्यादाही दिली जाते. अशा विभागांमध्ये नक्कीच कामाचा ताण असू शकतो. कधी कधी आयटी कंपन्यांमध्ये एखाद्या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार ग्राहक कंपनीकडून दिला जातो. अशा वेळी ती ग्राहक कंपनी वेळेची मर्यादा घालून ताण वाढवू शकते.
मोठ्या कंपनीत काम भरपूर असते आणि कालमर्यादेमुळे ताणही असतो, पण तरीही वर्षभर रात्रंदिवस सातत्याने काम करावे लागेल अशी स्थिती कोणत्याही कंपनीत कधीही नसते. क्वचित एखादा अर्जंट प्रोजेक्ट असू शकतो. पण 365 दिवस असे काम नक्कीच नसते आणि तसे असेल तर कंपनीच्या प्लॅनिंग शेड्यूलमध्ये नक्कीच काही तरी गोंधळ असतो. कारण अनेक कंपन्या सेवा पुरवताना पुढे आणखी कुणाला तरी सेवा देत असतात. उदाहरणार्थ, बँकिंग, इन्शुरन्स, सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी संस्था. त्यात हॉस्पिटल्स असतात, हेल्थकेअर सेवासंस्था असतात, एनजीओ असतात किंवा आणखी कुणीही असू शकते. मात्र त्या क्लायंट कंपन्याना घाई असेल तर त्याचा ताण संबंधित कंपनीवर येतो, पण तरीही सतत अशी स्थिती नक्कीच नसते.
कर्मचाऱ्यांवर ताण येण्याची कारणे ही काही प्रमाणात कंपनीच्या कामाच्या स्वरूपावर आणि कामाच्या पद्धतीवर अवलंबून असतात. त्यासाठी आजकाल ‌‘वर्क कल्चर‌’ असा शब्द वापरला जातो. प्रत्येक कंपनीची कार्यपद्धती, व्यवस्थापन प्रणाली आणि त्या विभागाच्या व्यवस्थापकांचा कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यासंदर्भात मोठी भूमिका बजावतो. सर्वसामान्यत: व्यवस्थापन तीन पातळ्यांवर काम करते. उच्च, मध्यम आणि निम्न पातळी. कामाचा ताण सर्वांनाच असतो. किंबहुना, मॅनेजमेंटमध्ये पद जितके उच्च, तितका ताण अधिक. कामाचा ताण वरच्या लोकांकडून हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे आणि त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांकडे ढकलला जातो. अनेकदा कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी किंवा प्रमोशन मिळवण्यासाठी काही मॅनेजर्स आपल्या कर्मचाऱ्यांवर दहा दिवसांचे काम पाच दिवसात पूर्ण करण्यासाठी सक्ती करतात. अशा वेळी प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण येतो. त्यातच कामाच्या पूर्ततेसंबंधी सतत पाठपुरावा करणे, अपमानास्पद भाषेचा उपयोग करणे यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होते आणि ताण वाढू लागतो.
एखाद्या कर्मचाऱ्याचा कामाचा वेग कमी असतो. कधी तरी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कामाचे ओझे वाढते किंवा काही लोकांना लहान-सहान गोष्टींचा ताण येतो. अशा प्रत्येक वेळी कर्मचाऱ्यांचा ताण वाढत राहतो. त्या ताणाचा त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे तो ताण वरच्या अधिकाऱ्यांकडे सरकत जातो आणि पुन्हा वाढून खाली येतो. या विषारी चक्राचा कंपनीवर, कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर, उत्पादकतेवर आणि पर्यायाने कंपनीच्या प्रतिमेवर होतो. कधी कधी विशिष्ट प्रकारच्या कामासाठी एखाद्या कर्मचाऱ्याची कौशल्ये उपयोगी नसतात. परंतू तो हट्टाने ते काम स्वीकारतो आणि ते नीट जमत नाही. त्यामुळे त्याच्यावर आणि अधिकाऱ्यांवर ताण येतो. ताण वाढवणाऱ्या घटना घडतच नाहीत किंवा घडणारच नाहीत, असे आपण म्हणू शकत नाही. परंतु असे घडू नये यासाठी सगळ्या मोठ्या कंपन्या सजग असतात. सगळ्या मोठ्या आणि ब्रँड कंपन्यांमध्ये हजारो, लाखो कर्मचारी विविध पातळ्यांवर काम करत असतात. कंपन्यांनाही चांगल्या कर्मचाऱ्यांची गरज असतेच. त्यामुळे बहुतेक कंपन्यांमध्ये ‌‘रिटेनिंग पॉलिसी‌’ राबवली जाते. कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडून जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. किंबहुना, या मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारीकेंद्रित धोरणेच राबवली जातात. विशेषत: स्त्री कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. बरेच वेळा कर्मचारी या बाबतीत जागरूक नसतात. त्यांना याची माहिती नसते आणि ते करूनही घेत नाहीत.
बहुतेक सर्व बड्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये व्हिसल ब्लोअर फंक्शन अस्तीत्वात आहे. कंपनी अत्यंत तत्परतेने या तक्रारीची शहानिशा करून निर्णय घेते. ठराविक काळानंतर त्याचा रिव्हयू घेतला जातो. एकही तक्रार दुर्लक्षित राहणार नाही, याची काळजी घेतली जाते. विशेष म्हणजे कंपनीने काढून टाकलेले किंवा कंपनी सोडून गेलेल्या तक्रारींचीदेखील रीतसर चौकशी केली जाते आणि अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाईही केली जाते. अर्थात हे अहवाल सार्वजनिकरित्या जाहीर करणे- न करणे ही कंपनीची पॉलिसी असते. पण सर्व कायदेशीर नियमांचे आयटी कंपन्या अत्यंत काटेकोरपणे पालन करतात. अगदीच वेळ आली तर पोलिसांनादेखील पूर्ण सहकार्य करतात. कारण तसे न केल्यास त्यांच्यावर सरकारी कारवाई होण्याचा आणि कंपनीच्या प्रतिमेला धक्का लागण्याचा धोका असतो.
बड्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना हिताचे रक्षण करणाऱ्या सर्व नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.आपले वरिष्ठ आणि त्या साखळीतले सर्वात वरिष्ठ अधिकारी कोण आहेत याविषयी कर्मचाऱ्याला माहीत असणे आवश्यक आहे. तरच त्याला योग्य व्यक्तिबद्दल योग्य त्या मार्गाने तक्रार करता येईल. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे बहुतेक सर्व बड्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या या व्हिसल ब्लोअर फंक्शनची माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याला व्हावी, यासाठी एक ऑनलाइन कोर्स पूर्ण करावा लागतो. त्यात कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार याविषयी माहिती दिली जाते. त्या विषयाची लेखी परीक्षा घेतली जाते आणि 80 पेक्षा अधिक गुण असतील तर प्रशस्तीपत्रक दिले जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर त्याची तक्रार कर्मचाऱ्याने नि:संकोचपणे करणे अपेक्षित आहे. तसे न घडल्यास त्यामागच्या कारणांची बारकाईने चौकशी व्हायला हवी.
अर्थात करियरच्या आणि स्पर्धेच्या जगात असे मॅनेजर्स असू शकतात, जे स्वत:च्या प्रगतीसाठी हाताखालच्या लोकांना दिलेल्या वेळेपेक्षाही लवकर कामे पूर्ण करण्यासाठी मागे लागतात. काहीजण स्वत:च प्रचंड काम करतात. त्यामुळे कर्मचाऱ्याकडूनही त्यांच्या तशाच अपेक्षा असतात. परंतु आपल्यावर असहनीय ताण येत असेल तर तक्रार करायलाच हवी. सहन करण्याची काहीही गरज नाही. याव्यतिरिक्त अनेक आयटी कंपन्यांमध्ये एचआर विभाग यासाठी सतत काम करत असतो. माझं प्रमोशन झालं नाही, माझा मॅनेजर वेडेवाकडे बोलतो इथपासून चहाकॉफीचे मशीन बिघडले आहे, इथपर्यंत तक्रारी केल्या जातात आणि त्यांचा गंभीरपणे विचार केला जातो. काही कंपन्यांमध्ये ‌‘360 फीडबॅक‌’ सिस्टिम वापरली जाते. मॅनेजर्सविषयी तीन लेव्हलचे लोक फीड बॅक देतात. त्याचा बॉस, त्याच्याच पातळीवर काम करणारा दुसऱ्या विभागाचा सहकारी आणि त्याच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याचे वागणे, बोलणे, त्याची तत्वे याविषयी माहिती मिळवली जाते आणि ती त्याच्यापर्यंत पोचवली जाते. त्यामुळे संबंधित मॅनेजर स्वत:मध्ये सुधारणा करू शकतो.
शेवटी एक गोष्ट नक्की की ताण असणार, पण तो किती आणि कसा सहन करायचा हे त्या कर्मचाऱ्याने स्वत: ठरवायला हवे. तुमच्या मदतीसाठी अनेकजण आहेत. अनेक मार्ग आहेत, पण तुम्हाला मदतीची गरज आहे हे त्यांच्यापर्यंत पोचायला हवे आणि ते तुम्हीच सांगायला हवे.
(लेखक पुण्यातील एका मोठ्या आयटी कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहेत.)
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *