ठाणे : ठाण्यातील विविध समविचारी संस्था – संघटना आणि शांतताप्रिय व संविधानवादी ठाणेकर नागरिकांनी महात्मा गांधी जयंती दिनी २ ऑक्टोबर रोजी शांती यात्रेचे आयोजन केले आहे. महात्मा गांधी उद्यान, तलाव पाळी येथील म. गांधी पुतळा येथे सायंकाळी ४.३० वाजता जमून महात्मा गांधीजींना अभिवादन करून यात्रेला सुरुवात होईल. मासुंदा तलावाला वळसा घालून मराठी ग्रंथ संग्रहालय समोरून ठाणे रेल्वे स्टेशन येथील भारतीय संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेचे समारोप केला जाणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता जगदीश खैरालिया यांनी दिली.
या वेळी समाजात समता, बंधुता, लोकशाही मूल्य, सामाजिक न्याय, स्त्री सन्मान आणि धर्म – जाती पलिकडे माणुसकी जपण्यासाठी भारतीय संविधान याचा प्रचार प्रसार केला जाणार आहे. बेरोजगारी, व्यसनाधीनता आणि महागड्या शिक्षणाचा विळखा यापासून तरूण पिढीला वाचवा, शासकीय कारभारात पारदर्शकता आणणा, सर्वांना शिक्षण, रोजगार, सार्वजनिक आरोग्याची हमी द्या असा आग्रह केला जाणार आहे. यावेळी भारतीय महिला फेडरेशन च्या वतीनें पथनाट्य, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समता विचार प्रसारक संस्था यांचेतर्फे गाणी सादर होणार आहे. जागरूक, संविधानवादी व शांतताप्रिय नागरिकांनी यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ता जगदीश खैरालिया यांनी केले आहे.
00000