इंडिया आघाडी व सिव्हिल सोसायटीचे नेते व पदाधिकारी पदयात्रेत सहभागी होणार.

 

मुंबई : भाजपा युती सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईसह राज्यात मुली व महिलांवरील अत्यचाराच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. तसेच सत्ताधारी पक्षातील नेतेच भडकाऊ विधाने करून धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत, असे असतानाही सत्ताधारी मात्र त्याला लगाम घालण्याऐवजी अशा प्रवृत्तींना पाठिंबा देत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न व सामाजिक शांतता अबाधित रहावी यासाठी गांधी जयंती व लालबहाद्दुर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने पदयात्रेचे आयोजन केले असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेते व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव, भाकपाचे प्रकाश रेड्डी, माकपाचे शैलेंद्र कांबळे, शेकापचे राजू कारंडे, समाजवादी पक्षाचे नियाजी सिद्दीकी, लाल निशाण पक्षाचे विजय कुलकर्णी, आपचे धनंजय शिंदे, तुषार गांधी, फिरोज मिठीबोरवाला, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस आदी उपस्थित होते.
या बैठकीची माहिती देताना वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त बुधवारी २ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता पदयात्रेचे आयोजन केले आहे. पदयात्रा हुतात्मा चौक येथून सुरु होऊन एल. बी. शास्त्री पुतळा, बाळासाहेब ठाकरे पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रीगल थिएटर, एम.जी.रोड, राजीव गांधी पुतळा असे मार्गक्रमण करत महात्मा गांधी पुतळा येथे समाप्त होईल.
मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, नगरसेवक, प्रदेश प्रतिनिधी, पक्ष आघाड्या, डिपार्टमेन्ट व सेलचे अध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहनही वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *