पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत धरणे आंदोलन
अनिल ठाणेकर
ठाणे : महानगर पालिकेवर सध्या राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढीस लागला आहे. त्यामुळेच विरोधकांचे प्राबल्य असलेल्या विभागाबाबत दुजाभाव केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मुंब्र्यातील पाणीपुरवठ्यात अन्याय केला जात आहे, असा आरोप करीत डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार विरोधीपक्ष नेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी पाण्याचा काळाबाजार करणार्यांना मोक्का लावा, अशी मागणी पठाण यांनी केली.
मुंब्रा भागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा अत्यल्प पुरवठा केला जात आहे. मागणी करूनही पाणीपुरवठा वाढविण्यात येत नाही. तसेच, कचरादेखील उचलण्यात येत नाही. या निषेधार्थ ठामपाच्या मुंब्रा येथील पाणीपुरवठा विभागासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला, पुरूष आणि लहान मुले सहभागी झाले आहेत. या आंदोलकांकडून ठाणे पालिकेवर भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात शानू पठाण यांनी, मुंब्रा भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार चे प्राबल्य आहे. गेल्या दोन वर्षांचा इतिहास पाहता, विरोधकांना निधी देताना राज्य सरकारकडून आखडता हात घेतला जात आहे. तसाच प्रकार आता नागरी सुविधा पुरवण्यातही केला जात आहे. . गेल्या 15 दिवसांपासून 3-3 दिवस पाणीपुरवठाच करण्यात येत नाही. काही ठिकाणी पाणी माफियांकडून पंप लावून पाणी खेचले जात आहे. टँकर माफिया खुलेआम पाण्याची विक्री करीत आहेत. विकण्यासाठी पाणी आहे. मात्र, गोरगरीबांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दुसरीकडे कचरा उचलण्यासाठी कोट्यवधींचे ठेके दिले जात आहेत. शहराच्या विविध भागातील कचरा हटवण्यात येत नाही. अगदी मंदिराच्या आवारातील, मंदिर परिसरातील शाळेजवळील कचराही उचलण्यात येत नाही. परिणामी, मुंब्रा , कौसा भागात साथीच्या आजारांचा प्रचंड फैलाव झालेला आहे. ठामपाची निवडणूक झालेली नसल्याने ठाणे पालिकेचा कारभार राज्य सरकारच्या निर्देशानुसार चालत आहे. त्यातूनच मुंब्र्यावर अन्याय केला जात आहे. पण, आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. त्याविरोधात संघर्ष करू. जर आम्हाला योग्य पाणीपुरवठा आणि नागरी सुविधा दिल्या नाहीत. तर आम्ही पालिका मुख्यालयात घेराव आंदोलन करू, असा इशारा शानू पठाण यांनी दिला.
00000