श्रीकांत शिंदेच्या मेव्हण्याला तिकीट दिल्यास गुहागरमध्ये पाय ठेवणार नाही.

स्वाती घोसाळकर

रत्नागिरी: महाराष्ट्रातील विधानसभेचे बिगूल अजून वाजले नसले तरी सर्वच पक्षात रणशिंग मात्र फुंकली जात आहेत. विरोधी पक्षांना आव्हान देणे तसे निवडणूकीच्या काळात नेहमीचेच. पण साक्षात आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा देण्याचा पराक्रम रामदास कदम यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील गुहागर मधून श्रीकांत शिंदेचा मेव्हणा विपुल कदम यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केल्याचे माहिती आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तसे केल्यास विपुलचा पराभव तर अटळ आहेच पण आपण गुहागरमध्ये प्रचारासाठी पायदेखील ठेवणार नाही असा इशाराच रामदास कदम यांनी दिला आहे.

गुहागरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे भास्कर जाधव विद्यमान आमदार आहेत. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यात भास्कर जाधवांविरोधात नवखा उमेदवार देणे योग्य नाही असे मत रामदास कदम यांना मांडले आहे.

गुहागर  विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी रविवारी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते. यावेळी गुहागर विधानसभेसाठी विपुल कदम यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. जवळचा नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असं वाटतं नाही. अचानक सीट दिली तर नियमित काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल, अशा शब्दात रामदास कदम यांनी विपुल कदम यांच्या उमेदवारीला स्पष्ट शब्दात विरोध केला आहे. नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट दिली तर, त्याचा पराभव नक्की असल्याचंही कदम यांनी स्पष्टच सांगितलं. तसेच, विपुल उमेदवार असेल तर त्याला माझ्या शुभेच्छा, पण मी गुहागर विधानसभा मतदार संघात पाय ठेवणार नाही, असेही रामदास कदम यांनी परखडपणे बोलून दाखवले.

आता शिंदेंच्या शिवसेनेत कोकणातील तीन दिग्गज नेते आहेत. उदय सामंत आणि दीपक केसरकर हे दोघे कॅबिनेट मंत्री आणि स्वता रामदास कदम कोकणातून येतात. त्यामुळे, येथील विधानसभेच्या उमेदवारी देताना निश्चितच या नेत्यांना विचारात घेतले जाईल. मात्र, गुहागरसाठी हा अपवाद केला जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विपुल कदम यांच्या उमेदवारीमुळे गुहागर विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिंदे गटाकडून पितृपक्ष संपल्यानंतर विपुल कदम यांची उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, ही बातमी बाहेर येताच विपुल कदम हे कामाला लागल्याचे दिसत आहे. कारण, विपुल कदम यांच्याकडून गुहागरमध्ये ‘धर्मवीर-2’ या चित्रपटाचे मोफत खेळ आयोजित करण्यात आले आहेत. विपुल कदम यांच्याकडून शहरात याचे फलक लावून जोरदार जाहिरातबाजी केली जात आहे. यानिमित्ताने विपुल कदम हे गुहागरमध्ये पूर्णपणे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

या मतदारसंघातून भाजपचे विनय नातू आणि निलेश राणे हे दोघेही इच्छूक आहेत. त्यामुळे आता गुहागरची जागा आपल्या मेहुण्यासाठी पदरात पाडून घेताना श्रीकांत शिंदे भाजपची समजूत कशाप्रकारे काढणार, हे पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *