Month: September 2024

परतीच्या पावसाने महामुंबईला झोडपले

 शहापूर, मुरबाडला वीज कोसळून दोघांचा मृत्यू   ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी दुपारनंतर परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. ठाणे शहरात सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे नुकसान झाले. तर सखल भागात पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली होती. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत ३१.७५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर साडेसहापर्यंत ५०.८० मिमी पाऊस पडला. ठाणे शहरासह भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूरमध्येही जोरदार पाऊस बरसला. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी चिंतित आहे. शहापूर तालुक्यातील शेद्रुंणजवळ वीज पडून दिनेश जाधव (३०) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर मुरबाड तालुक्यात चिखले शिरगाव येथील परसू पवार या शेतकऱ्यावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला. झेनिथ धबधब्यात तरुणी गेली वाहून रायगड जिल्ह्यात बुधवारी हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ दिला होता. सायंकाळी काही भागात पावसाने हजेरी लावली. यात खोपोली व पालीत ढगफुटीसारखा पाऊस झाला. खोपोलीत बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे झेनिथ धबधब्यावरून परतणारे सहाजण पाण्याची पातळी वाढल्याने अडकले होते. स्वप्नाली क्षीरसागर (२२) ही नदीमध्ये वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहाला वेग होता. क्षीरसागर कुटुंबीय धबधब्यापर्यंत जाऊ शकले नाही; परंतु नदीच्या प्रवाहामध्ये ते अडकले. पाचच्या सुमारास झेनिथ धबधब्यात सहाजण अडकल्याची माहिती मिळताच त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी गेले. त्यांनी आयेशा शेख, मोनिका क्षीरसागरची सुटका केली. धनंजय क्षीरसागर (भाऊ) हा बॅरिकेड्सला धरून स्वप्नालीसोबत  होता; मात्र स्वप्नालीचा हात सुटला आणि ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. नवी मुंबईला पुन्हा पावसाने झोडपले नवी मुंबईला बुधवारी दुपारपासून पुन्हा पावसाने झोडपण्यास सुरुवात केली, तर सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने  ठाणे-बेलापूर रोडवर लोकमत प्रेस बाहेरील मार्गावर पाणी साचले होते. तुर्भे-महापे रोडवरही ठिकठिकाणी पाणी साचले होते. परिणामी या मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याने तुर्भे ते शीळफाटापर्यंत वाहतूक मंदावली होती. तसेच सायन-पनवेल महामार्गावरही ठिकठिकाणी पाणी साचले होते. पाऊस असाच सुरू झाला तर बाजार समितीच्या आवक-जावक व्यवहारांवर आज, गुरुवारी परिणाम होण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये पावसाचा दुसऱ्या दिवशीही धुमाकूळ पालघर जिल्ह्यात वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाणगाव रेल्वे स्थानकाच्या ट्रॅकवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची सेवा काही काळ बाधित झाली. जिल्ह्यात सरासरी ४९ मिलिमीटर इतका पाऊस पडला असून सर्वाधिक पाऊस वसई तालुक्यात ८२.६० मिलिमीटर तर सर्वात कमी पाऊस जव्हार तालुक्यात १२ मिलिमीटर इतका पडला आहे. बुधवारी पहाटेपासून जोरदार सुरुवात केली. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाणगाव स्थानकात रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पहाटे ५ वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत उशिराने सुरू होती. त्यामुळे लांब पल्ल्याच्या अप व डाऊन मार्गावरील गाड्यांसह डहाणू-चर्चगेटपर्यंतच्या लोकलही उशिराने धावत होत्या. त्यामुळे हजारो वीज वितरण ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. 0000

आमचे पैसे परत द्या!

वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांतील पासधारक प्रवाशांची मागणी   मुंबई : मध्य रेल्वेच्या ताफ्यातील एका वातानुकूलित रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे, तर अतिरिक्त रेक उपलब्ध नसल्याने वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. एसी लोकलच्या सुमारे १० फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. एसी लोकलचे महागडे तिकीट विकत घेऊनही साधारण लोकलमधून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली. त्यामुळे एसी लोकल जितके दिवशी रद्द केल्या जातील, त्या दिवसांचे पैसे परत करावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. सामान्य लोकलच्या प्रथम व द्वितीय श्रेणीच्या तुलनेत एसी लोकलचे तिकीट दर अधिक आहेत. या लोकलच्या वेळेत सामान्य लोकल चालवण्यात येत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्यासाठी प्रवासी अधिक पैसे मोजून तिकीट अथवा पास घेत आहेत, परंतु त्यांना सामान्य लोकलमधून प्रवासा करावा लागत आहे. प्रवाशांनी एसी लोकलची मागणी केली नव्हती. तरीही एसी लोकल चालवण्यात आली. त्यानंतर या लोकलमध्ये गर्दी वाढू लागली. त्यामुळे या लोकलमधील प्रवाशांचा प्रवास योग्यरित्या करून देण्याची जबाबदारी मध्य रेल्वेची आहे. मात्र, थेट लोकल रद्द करण्यात येते. एसी लोकल चालवता येणे शक्य नसल्यास, हार्बर, ट्रान्स हार्बरप्रमाणे मुख्य मार्गावरील एसी लोकल पूर्णत: रद्द कराव्यात, असे मत उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी व्यक्त केले. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक वेळा वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द होत आहेत. दररोज प्रवाशांकडून अनेक तक्रारी येत आहेत. मात्र, असे असले तरी रेल्वे प्रशासन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करीतच आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या पासधारकांना त्यांचे पैसे परत देणे आवश्यक आहे. तसेच वातानुकूलित लोकलचे रेक वाढविणे आवश्यक आहे, असे रेल यात्री परिषदेचे सुभाष गुप्ता यांचे म्हणणे आहे. रद्द मालिका : १३ सप्टेंबर रोजी ११ वातानुकूलित लोकल फेऱ्या, १४ सप्टेंबर रोजी ९ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. १६ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेवरील मुंब्रा – दिवादरम्यान दादर – बदलापूर वातानुकूलित लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली होती. तर, वातानुकूलित रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने २१ सप्टेंबर, २३ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर रोजी प्रत्येकी १० वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. 00000

ठाणे जिल्ह्यातील सीसीटीव्हीची प्रतिक्षाच

ठाणे : आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर ते बदलापूर या शहरांत सहा हजाराहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली असली तरीही या कामास अद्यापही सुरुवात झाली…

डोंबिवलीतील बेकायदा राधाई इमारत भुईसपाट

डोंबिवली : येथील पूर्व भागातील नांदिवली पंचानंद भागातील डाॅन बाॅस्को शाळेमागील राधाई काॅम्पलेक्स बेकायदा इमारत पालिकेच्या ई प्रभागाच्या तोडकाम पथकाने शक्तिमान कापकाम यंत्राच्या साहाय्याने गेल्या महिनाभराच्या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाच्या…

प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून नागला बंदर खाडी किनाऱ्याचा विकास

अनिल ठाणेकर   ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील गायमुख तिसरा टप्पा ते नागला बंदर खाडी किनारा विकसित करून आरामाराची  प्रतिकृती उभारण्याचे काम लवकरच म्हणजे पुढील महिन्यापासून सुरु होणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यापासून प्रत्यक्षात जागेवर कामाला सुरुवात होईल, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. या ठिकाणी ‘वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट’ म्हणजेच खाडी किनाऱ्याचा सुनियोजित आकर्षक पद्धतीने विकास होणार आहे. या कामासाठी १५० कोटींच्या निधीला राज्य सरकारने आधीच मंजुरी दिली होती. हे काम सुरु करण्यासाठी आवश्यक पर्यावरण खात्याची, सीआरझेडची परवानगी महापालिकेला मिळाली असल्याने आता काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही आमदार सरनाईक यांनी सांगितले. ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनार्याचा सुनियोजित पध्दतीने विकास झाल्यास स्थानिकांना चार निवांत क्षण घालविण्यासाठी हक्काची जागा मिळेल, त्या-त्या परिसराचे सुशोभीकरण झाल्यास शहराच्या सौंदयात भर पडून पर्यटनाला चालना मिळेल. ठाणे शहराला लाभलेल्या नागला बंदर खाडी किनार्याचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास व्हावा, ‘वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट’ केली जावी अशी मागणी आमदार  प्रताप सरनाईक यांनी केली होती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कामाचा पाठपुरावा सुरु ठेवला होता. या कामाचे डिजाईन , संकल्प चित्र तयार करण्यात आले. परदेशात जसे ‘वॉटरफ्रंट डेव्हल्पमेंट’ करून परिसर सुशोभित केला जातो, त्या परिसरात नागरिकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा असतात त्याच पद्धतीने नागला बंदर खाडी किनारा सौंदर्यीकरण करण्यासाठी हा आराखडा बनविण्यात आला आहे. गुजरातच्या साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रमाणे घोडबंदर खाडी किनारा विकसित करण्याची आमदार सरनाईक यांची संकल्पना आहे. या सुशोभीकरणाच्या कामासाठी पहिल्या टप्प्याचा खर्च १५० कोटी इतका असून त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. ठाणे महापालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून पुढील महिन्यापासून कामाला सुरुवात केली जाणार आहे. खाडी किनारा असल्याने त्याठिकाणी काम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सीआरझेडची परवानगी मिळाली आहे.  ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी’ कडून महापालिकेला पत्र पाठवून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खाडी किनारा विकासाच्या प्रकल्पाचे काम सुरु झाल्यावर पुढील २ वर्षात हा खाडी किनारा विकास पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली. नागला बंदर खाडी किनाऱ्याला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून तेथे छत्रपती शिवाजी महाराजाच्या आरमार केंद्राची प्रतिकृती उभारण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.  छत्रपती शिवाजी महाराजाच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांचा इतिहास देखील या खाडी किनार्याला असल्यामुळे या परिसराला ऐतिहासिक असे महत्व आहे. घोडबंदर गावात इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा दिसतात. खाडी किनारा विकसित होत असताना नागला बंदर येथे “आरमार केंद्राची“ प्रतिकृती उभारली जाणार असून त्यात या संपूर्ण इतिहासाची माहिती नवीन पिढीला, इतिहासप्रेमींना करून दिली जाणार आहे. तसेच खाडी किनारा विकास करीत असताना नागरिकांना चालण्या-फिरण्यासाठी मोठा ‘पाथ वे’, विविध प्रकारचे आकर्षक गार्डन, विसर्जन घाट, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, बसण्यासाठी वेगवेगळ्या जागा तयार केल्या जातील. शिवाय दाट झाडांचे उद्यान, हिरवेगार लॉन, पार्किंगची सुविधा, वॉक वे, खेळण्यासाठी मोकळी जागा, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा, लहान मुलांसाठी मनोरंजन क्षेत्र, व्हॉली बॉल – फुटबॉल खेळता येईल अशी जागा, आकर्षक लायटिंग, सुसज्ज जेटी, दशक्रिया घाट अशी विविध कामे येथे केली जाणार आहेत. खाडी किनारा विकास करत असताना येथे ‘वॉटर स्पोर्ट्स’ सुरु करण्याचाही विचार आहे. खाडी किनारा विकास म्हणजेच हे ‘वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट’ आहे. या खाडी किनाऱ्यावर जिथे मँग्रोज आहेत तिथे ‘लाकडाचे’ म्हणजेच इको फ्रेंडली साहित्य हा प्रकल्प राबविताना या  कामात वापरण्याचे प्रस्तावित केले आहे. या किनाऱ्यावर जे घाट बनवले जातील ते घाट सोडले तर नागरिकांचा पाण्याशी संपर्क येणार नाही. हे ‘वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट’ खाडी किनारा विकास पूर्ण झाल्यावर मोठ्या प्रमाणात शहरात पर्यटक येऊन पर्यटनाला चालना मिळेल व त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. सर्व वयोगटातील नागरिकांना आवडेल अशा पद्धतीने येथे खाडी किनारा विकसित केला जाणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने व शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी हा खाडी किनारा सुशोभीकरण करणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पहिल्या टप्प्यात १५० कोटींचा निधी दिल्याने हे काम सुरु होत आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. हा माझा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तो पूर्ण झाल्यावर ठाणे जिल्ह्यातच न्हवे तर संपूर्ण राज्यात हा खाडी किनारा विकास प्रकल्प सर्वाना प्रेरणादायी ठरेल, असे आमदार सरनाईक म्हणाले. 0000

कर्जत-माथेरानच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी निरंजन डावखरेंचा पुढाकार

 पायाभूत सुविधांची कामे वेगात करण्याचा निर्णय   ठाणे : कर्जत व माथेरान परिसरातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा सुरू राहण्यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेतला आहे. कर्जत तालुका संघर्ष समितीने सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याविरोधात केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन आमदार डावखरे यांनी घेतलेल्या बैठकीत संघर्ष समितीच्या सर्व मागण्या मंजूर करण्यात आल्या. तसेच पायाभूत सुविधांच्या कामांना अतिरिक्त निधी मिळविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार डावखरे यांनी दिली. कर्जत व माथेरान परिसरातील वीज समस्येबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य वीज पारेषण कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्यासह ऊर्जा खात्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर महावितरण अधिकारी व संघर्ष समितीची काल एकत्रितरित्या ठाण्यात बैठक झाली. या बैठकीला महावितरणच्या पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता राजाराम मा्ने, कार्यकारी अभियंता विद्यानंद शिंदे, कर्जत उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे, भाजपा उत्तर रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस दीपक बेहरे, कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत, कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीचे संयोजक कैलास मोरे, सदस्य रंजन दातार आदी उपस्थित होते. या बैठकीत वीज वितरणाच्या पायाभूत सुविधा उभारण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधांसाठी लागणाऱ्या निधीबाबत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार निरंजन डावखरे यांनी दिले. कर्जत व माथेरान शहरासाठी स्वतंत्रपणे एक्सप्रेस फीडर कार्यरत असून, वीजपुरवठा सलग सुरू राहण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. शिरसे येथे वीज उपकेंद्राचे कामे वेगाने पूर्ण केले जाईल, वाढत्या वीज मागणीनुसार ट्रान्सफॉर्मर उभारण्याच्या मागणीला प्राधान्य दिले जाईल, कर्जत शहर आणि नेरळ ते माथेरानपर्यंत वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी निधी मंजूर केला जाईल, केंद्र सरकारच्या आरडीएसएस योजनेतून पायाभूत सुविधांची कामे सुरू असून, आणखी दोन इनकमर बसविण्याचे काम सुरू आहे. तर ४१ नवे ट्रान्सफॉर्मर व १०२ ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेत वाढ केली जाईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. त्याचबरोबर ग्राहक तक्रार निवारण शिबीर रविवारी आयोजित करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संमती दिली. 0000

ग्रामस्थाच्या सहभागाने ‘एक झाड आईच्या नावे’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात “स्वच्छता ही सेवा” उपक्रम १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात आहे. या उपक्रमांतर्गत जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ‘एक झाड…

 ‘भिवंडीतील गुन्हे मागे घ्या, अन्यथा आंदोलन करू’

 विश्व हिंदू परिषदेचा ठाणे पोलिसांना इशारा   ठाणे : अनंत चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला होता. यावेळी दगडफेक आणि लाठीमार झाला होता. तसेच हिंदूत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि साधूंनी दिली. भिवंडी शहरात गणेश विसर्जन मिरवणूकी दरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर दोन गटात वाद झाले होते. पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी लाठीमार केला होता. या घनटेनंतर आयपीएस अधिकारी डाॅ. श्रीकांत परोपकारी यांची बदली देखील झाली. या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. बुधवारी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि साधूंनी ठाण्यातील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेतली. हिंदु समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी पोलीस आग्रही होते. त्याच सुमारास दगडफेकीचा प्रकार घडले. तर पोलीस प्रशासन म्हणते लहान मुलांनी दगड मारले. मग यामागे कोण आहे ? आठ दिवसांत १८ ते २२ जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, अन्यथा भारतभरातील साधुसंत, विविध आखाड्याचे महंत, वारकरी संप्रदाय, ५०० नागा साधुसह लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते भिवंडीत येऊन आंदोलन छेडतील. सरकार व भिवंडीतील प्रशासनाने याची दखल घ्यावी असा इशारा त्यांनी दिला. भिवंडीतील विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने ठाणे पोलिसांना निवेदन देण्यात आले.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेस ज्येष्ठांचा उत्तम प्रतिसाद

माथेरान : राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित होत असताना जेष्ठ नागरिकांना सुध्दा राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री वयोश्री योजनेस सुरुवात करण्यात आली असून त्यास जेष्ठांचा उत्तम प्रतिसाद लाभत…

जे.एम. बक्षी कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढीचा करार

मुंबई : जे.एम. बक्षी कंपनीतील कामगारांना कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष  ॲड. एस. के. शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली सरासरी पगारवाढ ५४०१ रुपये भरघोस पगारवाढीचा करार करण्यात आला आहे. भारतातील प्रमुख बंदरांमधील सर्वात जुनी असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने जे. एम बक्षी या कंपनीमध्ये १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२८  असा ४  वर्षाचा वेतन करार केला आहेम या वेतन  करारामुळे कामगारांना कमीत कमी ४४९६ रुपये तर जास्तीत जास्त ६९५३ रुपये पगार वाढ झाली आहे. सरासरी पगारवाढ ५४०१ रुपये आहे. या वेतन करारावर युनियनच्या वतीने ज्येष्ठ कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष  ॲड. एस. के. शेट्ये, सेक्रेटरी विद्याधर राणे,  खजिनदार विकास नलावडे,  कामगार प्रतिनिधी म्हणून  अरुण खाडे आणि  प्रवीण जाधव तर व्यवस्थापनाच्या वतीने उपाध्यक्ष व एच. आर. ई. अरुमुगम आणि मॅनेजर व एच. आर. रितूराज ढाकणे यांनी सह्या केल्या आहेत, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. 0000