Month: September 2024

 ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांच्या आंदोलनामुळे बंद

 शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने   ठाणे : संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करा, कंत्राटी शिक्षक भरती रद्द करा, विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश द्या यासह इतर मागण्यांसाठी ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी बुधवारी सामूहिक किरकोळ रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा बंद होत्या. आंदोलनादरम्यान, ठाणे जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदिप माने यांना मागण्यांचे निवेदन दिले. राज्य शासनाची प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील धोरणे चुकीची असल्याचा आरोप करत राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी शासनाविरोधात असहकाराची हाक दिली होती. यानुसार ठाणे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी २५ सप्टेंबरला सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे शिक्षकांनी सामुहिक रजा घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शिक्षकांच्या या आंदोलनामुळे जिल्हा परिषद शाळा बंद होत्या. आधारवर आधारित संच मान्यता, वीस पटाला एक कायम आणि एक कंत्राटी शिक्षक हे शासनाचे धोरण विद्यार्थी विरोधी असल्याचा आरोप करत त्यास शिक्षक संघटनांसह पालकांनी विरोध केला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने या निर्णयामध्ये अंशतः बदल करून वीस ऐवजी दहा पटाला एक कंत्राटी शिक्षक, प्रत्यक्ष वर्गातील विद्यार्थी संख्येवर शिक्षक निश्चिती यासारखे शासन निर्णय निर्गमित केले होते. परंतु शिक्षकांनी आंदोलनावर ठाम राहत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. मोफत गणवेश योजना चुकीचे पद्धतीने राबविल्याने गणवेश उशिरा प्राप्त होत आहेत. गणवेश योजना जुन्याच पद्धतीने राबवावी. पाठ्यपुस्तकात कोरी पाने देण्याऐवजी स्वतंत्र वही द्यावी, पोषण आहार योजना स्वतंत्र्य योजनेकडे सोपवावी, याबाबत प्रामुख्याने घोषणाबाजी होत होती. १५ मार्चचा संच मान्यता निर्णय रद्द करा, कमी पटसंख्येच्या शाळेत कंत्राटीत शिक्षक भरतीचा निर्णय रद्द करा, शैक्षणिक आणि शैक्षणिक कामाचा शासन निर्णय शिक्षक संघटनांबरोबर चर्चा करून दुरुस्त करा, अशी मागणी ठाणे जिल्हा शिक्षक समन्वय समितीकडून यावेळी करण्यात आली. 00000

ग्रामस्थाच्या सहभागाने ‘एक झाड आईच्या नावे’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात “स्वच्छता ही सेवा” उपक्रम १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात आहे. या उपक्रमांतर्गत जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ‘एक झाड…

 मीरा भाईंदरमध्ये ‘वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट’चे काम सुरु होणार -प्रताप सरनाईक

१५० कोटींची मंजुरी अनिल ठाणेकर/अरविंद जोशी   मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील वर्सोवा ब्रिज ते घोडबंदर गावाशेजारी घोडबंदर किल्ल्यापर्यंत खाडी किनारा विकसित करण्याचे काम लवकरच म्हणजे पुढील महिन्यापासून सुरु होणार आहे. या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यापासून प्रत्यक्षात जागेवर कामाला सुरुवात होईल , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. या पहिल्या टप्प्यात जवळपास २ किलोमीटर इतकी लांब ‘वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट’ म्हणजेच खाडी किनाऱ्याचा सुनियोजित आकर्षक पद्धतीने विकास होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १५० कोटींच्या निधीला राज्य सरकारने आधीच मंजुरी दिली होती. हे काम सुरु करण्यासाठी आवश्यक पर्यावरण खात्याची , सीआरझेडची परवानगी महापालिकेला मिळाली असल्याने आता काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मीरा भाईंदर शहराला लाभलेल्या खाडी किनाऱ्याचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास व्हावा , ‘वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट’ केली जावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कामाचा पाठपुरावा सुरु ठेवला होता. या कामाचे डिजाईन , संकल्प चित्र तयार करण्यात आले. वरसावे ब्रिज ते घोडबंदर गावा पर्यंत खाडी किनारा साधारण १.८ किलोमीटर इतका विकसित केला जाणार आहे. परदेशात जसे ‘वॉटरफ्रंट डेव्हल्पमेंट’ करून परिसर सुशोभित केला जातो , त्या परिसरात नागरिकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा असतात त्याचपद्धतीने मीरा भाईंदरचा हा खाडी किनारा सौंदर्यीकरण करण्यासाठी हा आराखडा बनविण्यात आला आहे. गुजरातच्या साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रमाणे घोडबंदर खाडी किनारा विकास करण्याची आमदार सरनाईक यांची संकल्पना आहे. या सुशोभीकरणाच्या कामाचे पहिल्या टप्प्याचा खर्च १५० कोटी इतका असून त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. त्यातील १२१ कोटींचे टेंडर प्रक्रिया मीरा भाईंदर महापालिकेने पूर्ण केली आहे. ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून पुढील महिन्यापासून कामाला सुरुवात केली जाणार आहे. खाडी किनारा असल्याने त्याठिकाणी काम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सीआरझेडची परवानगी २३ सप्टेंबर रोजी मिळाली आहे.  ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी’ कडून महापालिकेला पत्र पाठवून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खाडी किनारा विकासाच्या प्रकल्पाचे काम सुरु झाल्यावर पुढील २ वर्षात हा खाडी किनारा विकास पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे , अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली. वर्सोवा-घोडबंदर खाडी किनाऱ्याला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा आराखडा तयार आहे. खाडी किनारा विकास करीत असताना नागरिकांना चालण्या-फिरण्यासाठी मोठा ‘पाथ वे’ , विविध प्रकारचे आकर्षक गार्डन , विसर्जन घाट , लहान मुलांना खेळण्यासाठी जागा , बसण्यासाठी वेगवेगळ्या जागा तयार केल्या जातील. शिवाय दाट झाडांचे उद्यान, हिरवेगार लॉन , पार्किंगची सुविधा , वॉक वे , खेळण्यासाठी मोकळी जागा , ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा , लहान मुलांसाठी मनोरंजन क्षेत्र, व्हॉली बॉल –  फुटबॉल खेळता येईल अशी जागा , आकर्षक लायटिंग ,सुसज्ज जेटी, दशक्रिया घाट अशी विविध कामे येथे केली जाणार आहेत. खाडी किनारा विकास करत असताना येथे ‘वॉटर स्पोर्ट्स’ सुरु करण्याचाही विचार आहे. खाडी किनारा विकास म्हणजेच हे ‘वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट’ आहे. या खाडी किनाऱ्यावर जिथे मँग्रोज आहेत तिथे ‘लाकडाचे’ म्हणजेच इको फ्रेंडली साहित्य हा प्रकल्प राबविताना या  कामात वापरण्याचे प्रस्तावित केले आहे. या किनाऱ्यावर जे घाट बनवले जातील ते घाट सोडले तर नागरिकांचा पाण्याशी संपर्क येणार नाही. हे ‘वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट’ खाडी किनारा विकास पूर्ण झाल्यावर फक्त मीरा भाईंदर मधील नाही तर संपूर्ण मुंबई महानगरातील हे पर्यटन केंद्र बनेल , असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. सर्व वयोगटातील नागरिकांना आवडेल अशापद्धतीने येथे खाडी किनारा विकास केला जाणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने व शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी हे खाडी किनारा सुशोभीकरण अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या टप्प्यात १५० कोटींचा निधी दिल्याने हे काम सुरु होत आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. हा माझा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तो पूर्ण झाल्यावर ठाणे जिल्ह्यातच न्हवे तर संपूर्ण राज्यात हा खाडी किनारा विकास प्रकल्प सर्वाना प्रेरणादायी ठरेल , असे आमदार सरनाईक म्हणाले. 0000

 ई- रिक्षाचा प्रवास होणार सुकर !

 रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात   माथेरान : ई रिक्षामुळे माथेरान मध्ये पर्यटन क्रांती घडत आहे. परंतु या रिक्षाच्या मार्गात अनेक ठिकाणी दगडगोटे आणि खराब रस्त्यामुळे प्रवास करताना रिक्षाला खर्चिक बाब होत आहे तर काही भागात खाचखळग्यातून जाताना त्रासदायक बनत होते. येथील वखारी नाक्यापासून ते पांडे रोडच्या पुढील भागापर्यंत पावसाळी पाण्याच्या प्रचंड ओघाने खूपच रस्ता खराब झाला होता. याकामी अनेकदा लोकांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात तक्रारी दिल्या होत्या.याकामी कार्यतत्पर प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी संबंधीत विभागाला सूचना देऊन या रस्त्याची दुरुस्ती करण्यास सांगितले त्यानुसार या रस्त्याची कामे सद्यस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहेत यामुळे पायी चालत जाणाऱ्या त्याचप्रमाणे ई रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे. अशाप्रकारे ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची वाताहत झाली आहे ते रस्ते सुध्दा जलदगतीने दुरुस्त करावेत अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे. 0000

संविधानामुळे मी मंत्री झालो याची सदैव जाणीव – पालकमंत्री उदय सामंत

अशोक गायकवाड   रत्नागिरी : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मी मंत्री झालो, याची सदैव मला जाणीव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्यभिषेक सोहळ्यास रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून…

Photo-2 स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे साहेब  यांच्या माध्यमातून आनंद नगर शिर्डी नगर महिलांचे सभासद नोंदणी फॉम भरण्यात आले. स्वराज अभियान संघटनेशी जोडण्यात आले. स्वराज अभियान ही एक सामाजिक आणि राजकीय चळवळ आहे, ज्याचा उद्देश स्थानिक स्वराज्य, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे आहे. स्वराज अभियानाचे सक्रिय सदस्य होण्याचे आवाहन करण्यात आले. हे शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी स्वराज अभियानाच्या महिला सदस्य संजना खोत, सुषमा ब्रीद, मृणाल सूवरे, प्रिया सोडगे, अंकिता शिर्के यांचा सहभाग आहे.

पायताणाची काळजी घेणारा चर्मकार समाज आक्रमक

रमेश औताडे मुंबई : फूटपाथवर बसून जनतेच्या पायताणाची काळजी घेणारा चर्मकार समाज आज अनेक वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मात्र सरकार फसव्या घोषणा  व आश्वासन देण्यात गुंग झाले आहे. त्यामुळे आता हा समाज आझाद मैदानात सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. चर्मोद्योग हा परकीय चलन मिळवून देणारा व्यवसाय आहे. मात्र या व्यवसायाकडे सरकारचे लक्ष नाही. चर्मकार समाजाचे महामंडळ आहे. त्याला अध्यक्ष नाही. पुरेसे कर्मचारी महामंडळात नाहीत. असे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड यांनी सांगितले. फंड नसल्याने अनेक चर्मकार बांधव अनुदान व कर्ज यापासून वंचित आहेत. तरुण बेरोजगार झाले आहेत, असे  मुंबई अध्यक्ष राजू नेटके यांनी यावेळी सांगितले. लाडकी बहिण व लाडका भाऊ या योजना मतांच्या जोगव्यासाठी आहेत हे सरकारलाही माहीत आहे. तरीही सरकार मनमानी कारभार करत आपलेच खरे करत आहे. त्यामुळे आता मागण्या मान्य होईपर्यंत मैदान सोडायचे नाही असा इशारा समाजाचे युवा नेते जगदीश लाड यांनी दिला आहे. 000

मुरबाड-कल्याण रेल्वे लवकरच सुरु होणार

 २०० कोटींचा निधी मंजूर मुरबाड : मुरबाड- ल्याण रेल्वेच्या भूमी अधिग्रहणासाठी रेल्वेने २०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती माजी खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड येथे दिली. मुरबाड-कल्याण रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांची…

ठाणे स्थानक परिसर मोकळा

ठाणे : काही महिन्यांपासून थंड पडलेल्या फेरीवाला विरोधातील कारवाईचे हत्यार ठाणे पालिकेने पुन्हा एकदा बाहेर काढले आहे. त्याअंतर्गत ठाणे स्थानकात कारवाई करून पालिकेने परिसर फेरीवालामुक्त केला आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या…

 पात्र अर्जदारांची प्रारूप यादीची प्रतीक्षा संपणार

 म्हाडा मुंबई मंडळ सोडत ऑक्टोबर २०२४ मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली असून मुंबई मंडळाने अर्ज विक्री – स्वीकृतीसाठी दिलेल्या विहित मुदतीत अनामत रकमेसह एक लाख १३ हजार इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. प्राप्त अर्जांची मुंबई मंडळाकडून छाननी पूर्ण करण्यात आली असून गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जदारांची प्रारूप यादी मुंबई मंडळ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करणार आहे. मुंबईतील गोरेगाव, बोरिवली, जुहू, पवई, विक्रोळी, ताडदेव, दादर, वरळी, वडाळा आदी ठिकाणच्या २०३० घरांसाठी ९ ऑगस्टपासून सोडत पूर्व प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबरदरम्यान ही प्रक्रिया सुरू होती. या कालावधीत मुंबई मंडळाकडे अनामत रकमेसह एक लाख १३ हजार अर्ज सादर झाले आहेत. या अर्जांची छाननी करण्यात आली असून छाननीत पात्र – अपात्र ठरणाऱ्या अर्जदारांची यादी गुरुवारी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अपात्र ठरलेल्या अर्जदारांना सूचना – हरकती नोंदविण्यासाठी काही कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीत आपल्या अर्जातील त्रुटी दूर करणाऱ्या आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांची नव्याने पात्रता तपासत एकूण पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीच्या वेळापत्रकानुसार अंतिमतः पात्र ठरलेल्या अर्जदारांची यादी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत जे अर्जदार समाविष्ट असतील तेच सोडतीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे या यादीत एकूण किती अर्जदार पात्र ठरतात आणि किती अर्जदार सोडतील सहभागी होतात हे ३ ऑक्टोबर रोजी स्पष्ट होईल. पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार आहेत. सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी अर्जदारांची यादी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर यशस्वी अर्जदारांना देकार पत्र वितरित करून त्यांच्याकडून घराची विक्री किंमत भरून घेतली जाईल. निश्चित कालावधीत जे यशस्वी अर्जदार घराची संपूर्ण रक्कम मुद्रांक, शुल्क नोंदणी शुल्क आणि देखभाल शुल्क अदा करतील त्यांना घरांचा ताबा दिला जाईल. दरम्यान, यंदा सोडतील निर्माणाधीन प्रकल्पातील घरांची संख्या बरीच आहे. त्यामुळे अशा घरांसाठी यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना घराचे काम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळाल्यानंतर घरांचा ताबा दिला जाणार आहे.