Month: September 2024

महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स स्पर्धा

ठाण्याच्या शौर्या अंबुरेची विशेष कामगिरी   पुणे- महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स स्पर्धा यावर्षी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे १९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आल्या .  या वर्षीच्या क्रीडा स्पर्धेत ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने क्रीडाप्रेमींचं विशेष  लक्ष वेधून घेतलं . शौर्या हिने १६ वर्षाखालील मुलींच्या ६० मी धावणे या शर्यतीमध्ये ७.५८ सेकंदाचा नवीन विक्रम नोंदवून सुवर्णपदक पटकावले . यापूर्वीचा राज्य विक्रम ७.९५ सेकंद असून राष्ट्रीय विक्रम ७.७७ सेकंद इतका आहे.  तसेच ८०मी अडथळा शर्यतीत सुद्धा शौर्या हिने ११.४७ सेकंदाचा नवा राज्य विक्रम नोंदवून सुवर्णपदक पटकावले. यापूर्वीचा राज्य विक्रम ११.७६ सेकंद आहे व राष्ट्रीय विक्रम ११.५ सेकंद इतका आहे .  ठाण्याच्या शौर्याने एकापाठोपाठ एक असे दोन विक्रम नोंदवल्याने सर्व क्रीडाजगतामध्ये  तिचे कौतुक होत आहे . शौर्या ही ठाण्याच्या universal high शाळेची विद्यार्थिनी असून ती ज्येष्ठ क्रिडा प्रशिक्षक अजित कुलकर्णी सरांकडून त्यांच्या Aim Sports and Fitness अकॅडमी मध्ये गेली ८ वर्ष प्रशिक्षण घेत आहे.  प्रशिक्षक अजित कुलकर्णी सरांनी आतापर्यंत अनेक जागतिक स्तरावरचे खेळाडू घडवले आहेत व त्यांच्या Aim Sports foundation च्या माध्यमातून ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी विविध क्रीडा उपक्रम राबवत असतात.

राज्यात परिवर्तनाची संधी महाविकास आघाडीने गमावू नये

 ‘आंबेडकरवादी भारत मिशन ‘चे आवाहन मुंबई : २०११ च्या जनगणनेत राज्यात जातीची नोंद केलेल्या आणि न केलेल्या बौद्ध बांधवांची एकत्रित लोकसंख्या १ कोटी इतकी आहे. त्याप्रमाणे विधानसभेत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या एकूण २९ जागांपैकी २०  जागांवर बौद्धांचा ‘ हक्क ‘ आहे, असे नमूद करत महाविकास आघाडीकडे तसा दावा करण्याचा निर्णय आंबेडकरवादी भारत मिशनने घेतला आहे. या मुद्द्यावर मुंबईत लवकरच बौद्धांचा एक मेळावा घेण्याचेही ठरवण्यात आले आहे. अनुसूचित जातींमध्ये सर्वाधिक म्हणजे ८० टक्के लोकसंख्या असूनही विधानसभेत सध्या फक्त ८ आमदार बौध्द आहेत, याकडे एका पत्रकाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. पवार, ठाकरे, खारगे यांना भेटणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांना एका निवेदनाद्वारे बौद्ध समाजाचा हा  ‘ दावा ‘ सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी बौद्धांचे मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या प्रांतांतील प्रत्येकी दोन प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ महाविकास आघाडीच्या धुरिणांची भेट घेणार आहे. २० जागांचा फॉर्म्युला विधानसभेच्या १२ जागांवर  शिवसेना ( उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी ( शरद पवार) आणि काँग्रेस यांनी त्यांच्या पक्षातील प्रत्येकी ४ सक्षम बौध्द कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी. ८ जागा महाविकास आघाडीला साथ देणाऱ्या आंबेडकरवादी संघटनांमधील उमेदवारांसाठी विजयाची क्षमता या निकषावर  सोडाव्यात. तसेच विधान परिषदेच्या ३ जागांवर बौध्द समाजातील विचारवंत, साहित्यिक, पत्रकार, कलावंत, माजी सनदी अधिकारी यांना संधी द्यावी, यासाठी आग्रह धरण्यात येणार आहे. बौद्ध समाजाची ताकद निर्णायक बौद्ध समाजाची ताकद ही राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी १८९  जागांवर निर्णायक आहे. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीतही हे सिद्ध आलेले आहे. १९९० च्या निवडणुकीत बौद्ध समाजाच्या पाठिंब्यामुळेच काँग्रेसला हातची सत्ता राखण्यात यश आले होते. तर, रमाबाई कॉलनीतील दलित हत्याकांडानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर युती सरकारला बौद्ध समाजाने सत्तेतून हद्दपार केले होते, याची आठवण पत्रकातून करून देण्यात आली आहे. आंबेडकरी समाजाची जनभावना काय? १) जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ‘ इबीसी ‘ आणि ‘ ओबीसी ‘ या वर्गांना दिलेली सहा महिन्यांची मुदत अनुसूचित जातींना भाजप आणि मित्र पक्षांनी जाणूनबुजून नाकारली आहे. त्यामुळे सुमारे २ लाख दलित विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला मुकावे लागले आहे. २) शिष्यवृत्ती, फेलोशीपअभावी एससी विद्यार्थ्यांची नेहमीच ससेहोलपट सुरू आहे. ३) भीमा – कोरेगाव येथे आंबेडकरी समाजाला लक्ष्य करत घेरून करण्यात आलेले हल्ले आणि माजवलेल्या हिंसाचारानंतर फडणवीस सरकारने खोटे गुन्हे दाखल करून दलित बांधवांनाच खटल्यांमध्ये अडकवले आहे. ते खटले त्वरित काढून घेण्याची नितांत गरज आहे. ४) राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात ( ७ मे २०२१ पासून) अनुसूचित जाती – जमातींचे बढती ( प्रमोशन) मधील आरक्षण बंद करण्यात आलेले आहे. ते पूर्ववत सुरू करण्याची गरज आहे. ५) भूमिहीनांना जमीन वाटपासाठी राज्यात असलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना कागदोपत्री अस्तित्वात आहे. तिची प्रभावी अंमलबावणी करून जमिनींचे वाटप होणे आवश्यक आहे. ६) गायरान जमीन धारकांच्या अतिक्रमणाचे दावे अनेक वर्षे प्रलंबित आहेत. ते तातडीने निकाली काढण्याची गरज आहे. ७) महाराष्ट्राच्या एकूण बजेटपैकी अनुसूचित जातींच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मंजूर करून त्याचा १०० टक्के विनियोग करणे राज्य सरकारला बंधनकारक करण्यात आले पाहिजे. त्यासाठी विधिमंडळात कायदा संमत करण्याची आवश्यकता आहे. दलित समाजात या आणि अशाच अनेक ज्वलंत प्रश्नांवरून कमालीचा असंतोष आहे. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सध्याचे भाजपप्रणीत सरकार हटविण्याशिवाय तरणोपाय नाही, अशी भूमिका आंबेडकरवादी भारत मिशनने घेतली आहे. राज्यात परिवर्तनाचे उद्दिष्ट राज्यातील बौद्ध – आंबेडकरी समाजातही तीच जनभावना प्रखर आणि प्रबळ झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप – मित्र पक्षांना १७ जागांवर रोखण्यात यश आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून हटवून राज्यात ‘ परिवर्तन ‘ घडवण्याची संधी हाताशी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आंबेडकरवादी पक्ष – संघटना यांनी ही संधी गमावू नये, असे आवाहन आंबेडकरवादी भारत मिशनने केले आहे. त्यासाठीचे हे आवाहन पत्रक राज्यातील खालील आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध केले आहे. १) दलित पँथर नेते सुरेश केदारे २) प्राचार्य रमेश जाधव ३) ज्येष्ठ पत्रकार सुनील खोबरागडे ४) ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ…

 1600 हून अधिक विद्यार्थी, नागरिकांनी केली खारफुटी परिसर स्वच्छता

 स्वच्छता ही सेवा’ मोहीमेत   नवी मुंबई : स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 2 ऑक्टोबरपर्यंत दररोज विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये आज 21 सप्टेंबर या जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांमध्ये खारफुटी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 1600 हून अधिक एनसीसी व स्काऊटचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, नागरिक यांच्या एकत्रित सहयोगातून महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी सर्वच ठिकाणी खाडीकिना-यांवरील खारफुटी भागातील कचरा साफ केला. बेलापूर विभागात डोलया समुद्रेश्वर मंदीर पाणथळ भाग, नेरूळ विभागात सारसोळे जेट्टी 1 व 2 भाग, वाशी येथील सागर विहार किनारा, कोपरखैरणे येथील धारण तलाव सेक्टर 19 परिसर, घणसोली येथे सेक्टर 12 पामबीच रोड नजिकचा खाडीकिनारा परिसर, ऐरोली सेक्टर 10 येथील जैवविविधता केंद्र कांदळवन परिसर याठिकाणी सागरीकिनारी खारफुटी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. यामध्ये सहभागी विद्यार्थी, नागरिकांनी समुद्राच्या पाण्यातून वाहत आलेला प्लास्टिक, कापड, थर्माकोल, कागद यांचा कचरा संकलित केला. यामध्ये चपलांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आले. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी मोहीमेच्या विविध ठिकाणी भेट देत मोहीमेत सहभाग घेतला. त्यांच्यासमवेत त्या त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी स्वच्छता व प्लास्टिकबंदीची सामुहिक शपथ ग्रहण केली. परिमंडळ 1 उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे व डॉ.संतोष वारूळे यांनीही विविध ठिकाणी मोहीमेत सहभाग घेतला. यामध्ये वाशी येथे सागरविहार सेक्टर 8 परिसरात राबविण्यात आलेल्या खारफुटी व परिसर स्वच्छता मोहीमेत 450 हून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत साधारणत: 2 मेट्रिक टन कचरा संकलित केला. याप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक यांनी सहभागी होत नागरिक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. वाशी विभागाचे सहा. आयुक्त सागर मोरे, मुख्य स्वच्छता अधिकारी सतीश सनदी, स्वच्छता अधिकारी सूर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या या खारफुटी स्वच्छता मोहीमेत सागरी सीमा मंच, कर्मवीर ॲकेडमी, मॅनग्रुव्हज मार्शल या संस्थांच्या सदस्यांप्रमाणेच आयसीएल झुनझुनवाला कॉलेज सेक्टर 9, टिळक कॉलेज सेक्टर 28, वेस्टर्न कॉलेज सानपाडा, कर्मवीर भाऊराव पाटील मॉडर्न महाविद्यालय सेक्टर 15 येथील एनएसएसचे विद्यार्थी सहभागी होते.

प्लास्टिक मुक्त माथेरान केव्हा होणार ?

 स्थानिकांसमोर यक्षप्रश्न ! माथेरान : माथेरान मध्ये बहुतेक ठिकाणी प्लास्टिकजन्य कचरा इतस्ततः विखुरलेल्या अवस्थेत दिसत असून स्वच्छ माथेरान, हरित माथेरान,सुंदर माथेरान ही बिरुदावली हळूहळू लोप पावत चाललेली असल्याने या नयनरम्य पर्यटनस्थळाची प्रतिमा काही वर्षांपासून इथे वाढत चाललेल्या वस्तीमुळे त्याचप्रमाणे जिकडेतिकडे पॉईंट तसेच रस्त्याच्या बाजूला नजर जाईल तिकडे टपऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत त्यामुळे प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या तसेच रॅपेर्स पाकीट जंगलात कुठेही टाकली जात आहेत.यामुळे या गावाच्या भविष्यातील पर्यटनाबाबत स्थानिकांना यक्षप्रश्न पडलेला दिसत आहे.अनेक ठिकाणी कचराकुंड्या नसल्याने जंगलात आणि नागरी वस्तीत सुध्दा मोठया प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन कामी दरवर्षी जवळपास एक करोड रुपयांपेक्षाही अधिक खर्च केला जात आहे. परंतु या व्यवस्थापन ठेकेदाराचे कामगार खरोखरच आत्मीयतेने आपल्या कामाला न्याय देतात का हा सुद्धा प्रश्न स्थानिकांना सतावतो आहे. प्लास्टिक जन्य कचऱ्यामुळे अनेक झाडे दगावत असून याचा पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. झाडी हळुहळु लोप पावत असल्याने इथला हवेतील गारवा पूर्णपणे संपुष्टात आल्याने याठिकाणी बाराही महिने पंखा लावल्याशिवाय राहणे कठीण बाब बनली आहे.इथल्या पर्यटन वाढीच्या विकास कामाला आडकाठी आणणाऱ्या पर्यावरण वाद्यांना या बाबी निदर्शनास येत नाहीत परंतु भूमिपुत्रांच्या न्याय हक्कावर, त्यांच्या स्वातंत्र्यावर, मूलभूत सेवासुविधा तसेच अत्यावश्यक गरजेच्या सोयींवर गदा आणण्यासाठी मुंबई स्थित पर्यावरण वाद्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का ? असाही प्रश्न युवा वर्गातून उपस्थित केला जात आहे.घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराचे कामगार नियोजित कामे पूर्ण करीत नसतील तर अशा ठेक्यासाठी करोडो रुपये नाहक खर्च का केला जात आहे. यापेक्षा येथील जे कुणी सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत ज्यांना खरोखरच या गावाविषयी तळमळ आहे आपले गाव कायमस्वरूपी हरित सुंदर आणि स्वच्छ असावे ही मनोवृत्ती ज्या होतकरू युवकांमध्ये आहे अशाना हा ठेका सुपूर्द करण्यात यावा जेणेकरून नगरपरिषदेची आर्थिक बचत आणि हा सर्व पैसा गावात राहू शकतो असेही स्थानिकांमधून बोलले जात आहे. घनकचरा व्यवस्थापन कामे असोत किंवा नगरपरिषदेच्या कायम असणाऱ्या कामगार वर्गाची स्वच्छता बाबतीत कामे असोत ही सर्व नियोजन पद्धतीने केली जात आहेत की नाही त्याचप्रमाणे हे सर्वच कामगार स्वेच्छेने कामात पुढाकार घेत आहेत की फक्त पगारापूरता कामे करत आहेत यावर अंकुश राहण्यासाठी कार्यक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक शासनाने करणे गरजेचे आहे अन्यथा ह्या स्थळावर भविष्यात कुणीही फिरकणार नाही याचा फटका स्थानिकांनाच सोसावा लागणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत नगरपरिषदेप्रमाणे वनखात्याची, वन संरक्षण समितीची सुध्दा जबाबदारी आहे. ही वनसंपदा टिकून राहण्यासाठी या खात्यानी बारकाईने लक्ष केंद्रित करून माथेरान मधील विविध ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा तारेचे कंपाउंड केल्यास खऱ्या अर्थाने वृक्ष जतन केले जाऊ शकते अन्यथा हे स्थळ कायम हरित राहील याची शाश्वती देता येणार नाही असा जेष्ठ नागरिकांमधून सूर ऐकावयास मिळत आहे.

बीओबी बॅडमिन्टन स्पर्धेत स्वाती विजेती    

मुंबई : बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय बॅडमिन्टन निवड चाचणी स्पर्धेमध्ये स्वाती एस. हिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले. दादर-पश्चिम येथील बीएसएनएल बॅडमिन्टन कोर्टवरील महिलांच्या अंतिम सामन्यात स्वातीने १२-१२ अशा बरोबरी नंतर निर्णायक क्षणी अचूक फटके साधले आणि पूजा मोरेचे जोशपूर्ण आव्हान १५-१२ असे संपुष्टात आणून स्वातीने अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केला. परिणामी प्रारंभी आघाडी घेणाऱ्या पूजाला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बँक ऑफ बडोदा क्रीडा विभागाचे प्रदीप सुरवसे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी विजेत्या-उपविजेत्यांचे अभिनंदन केले. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने झालेल्या महिला बॅडमिन्टन स्पर्धेची उपांत्य लढत देखील अटीतटीमध्ये रंगली. पहिल्या सलग ४ गुणासह डावाच्या मध्यापर्यंत ९-८ अशी आघाडी घेणाऱ्या गरिमा श्रीवास्तवला स्वाती एस. हिने अखेर २१-१३ असे चकवून अंतिम फेरी गाठली. दुसरी उपांत्य लढत जिंकताना पूजा मोरे हिने प्रियांका उपाध्यायचा २२-२० असा निसटता पराभव केला. स्पर्धेमधून महिला विभागात स्वाती एस., पूजा मोरे, गरिमा श्रीवास्तव, प्रियांका उपाध्याय आणि पुरुष विभागात ऋषिकेश शिंदे, हनमंत सुद्रिक, प्रमोद जयस्वाल, ऋग्वेद फराडे यांची मुंबई विभागीय संघात निवड करण्यात आली असून  १७ व १८ ऑक्टोबर रोजी राजकोट येथे होणाऱ्या अखिल भारतीय बीओबी बॅडमिन्टन स्पर्धेमध्ये मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रशिक्षक सचिन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पंचाचे कामकाज सिध्देश राऊत, आदित्य कीर, साहिल, चंद्रकांत करंगुटकर, ओमकार चव्हाण, अर्जुन कालेकर, श्रीधर नार्वेकर, अविनाश महाडिक आदींनी पाहिले.

माझी वसुंधरा जिल्हास्तरीय स्पर्धेत बांदोडकर कॉलेजला प्रथम क्रमांक

ठाणे महानरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण व   *माझी वसुंधरा स्पर्धा’ राबविण्यात आली होती या स्पर्धेत विद्या प्रसारक मंडळाच्या बा.ना. बांदोडकर स्वायत्त विज्ञान महावद्यालयाला प्रथम क्रमांक प्रदान करण्यात आला आहे, ही स्पर्धा ठाणे महानगरपालिका (TMC)* द्वारे आयोजित करण्यात आली होती. या प्रतिष्ठित स्पर्धेत महाविद्यालये, उद्योग आणि एनजीओकडून पर्यावरणीय शाश्वत प्रयत्ना साठी केलेल्या अपवादात्मक योगदानाची दखल घेतली जाते. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाला या उल्लेखनीय कामगिरीसाठी *₹१,०२,००० चे रोख बक्षीस देण्यात आले आहे. ‘माझी वसुंधरा स्पर्धा’ ही संस्थांना पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास,आणि हवामान बदलाच्या उपाययोजना करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित केली जाते. या पुरस्कारामुळे विविध *पर्यावरणपूरक उपक्रम,विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि आमच्या प्रयत्नांचे योग्य दस्तऐवजीकरण करण्याच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचे महाविद्यालयाच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन होते हे यश गाठण्यासाठी *विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, समिती समन्वयकांचे आणि कार्यालयीन व प्रयोगशाळेतील सहायक कर्मचारी वर्गाचे एकत्रित प्रयत्नांमुळे मिळाले आहे. क्रियाकलापांचे अहवाल, उपस्थिती, अभिप्राय आणि भू-संकेतित छायाचित्रांचे दस्तऐवजीकरण यामुळे हा सन्मान मिळवणे शक्य झाले*असे मत यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विंदा मांजरमकर यांनी व्यक्त केले. तसेच पर्यावरणशास्त्र विभाग (EVS), BWCM, NSS, NCC आणि ग्रीन क्लब* यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे त्यांनी कौतुक केले . पर्यावरण प्रकल्पांच्या दिशेने त्यांचे अविरत प्रयत्न आणि समर्पण या यशात मोलाचे ठरले आहे असेही त्या म्हणाल्या. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विंदा मांजरमकर यांचे व  संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ अधिकारी सन्माननीय डॉ.विजय बेडेकर, डॉ.महेश बेडेकर, श्री.अभय मराठे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आणि शाश्वत भविष्यासाठी या प्रयत्नांना सतत पुढे नेण्याच्या महत्त्वावर भर दिला. जिल्हा स्तरीय स्पर्धेत व काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे अध्यात्मरंग महोत्सवाचे आयोजन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने अध्यात्मरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २७ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत दररोज सायंकाळी ५.३० वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ या दिवशी डॉ. सुचेता परांजपे यांचे ऋग्वेदाचा परिचय या विषयावरील व्याख्यान होईल. शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४ या दिवशी त्यांचेच उपनिषदे-कथांमधून तत्वज्ञान या विषयावरील व्याख्यान होईल. महोत्सवाचा समारोप कै. विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान निर्मित संगीत नाटकातील भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीगीत गंगा हा रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ या दिवशी होईल. याची संकल्पना आणि मार्गदर्शन शुभदा दादरकर यांची असून धवल भागवत, श्रीया सोंडूर, संगीता चितळे यांचा यात सहभाग असेल. त्यांना केदार भागवत आणि सुहास चितळे यांची साथसंगत असून निवेदन प्रज्ञा लेले यांचे असेल. अधिकाधिक रसिकांनी या अध्यात्मरंग महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वच्छता सायक्लॉथॉनमध्ये 500 हून अधिक सायकलपटूंचा सहभाग

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनीही सायकल चालवित घेतला प्रत्यक्ष सहभाग स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरणहिताय उपक्रमांवरही ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भर देण्यात येत असून ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियानांतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आयोजित करण्यात आलेली ‘स्वच्छता सायक्लोथॉन’ 500 हून अधिक सायकलपटूंच्या सहभागाने यशस्वीरित्या संपन्न झाली. विशेष म्हणजे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्वत: सायकल चालवित या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन स्वच्छता व पर्यावरणाचा संदेश प्रसारित केला. नमुंमपा मुख्यालयाच्या आयकॉनिक इमारतीपासून सुरू झालेली ही स्वच्छता सायक्लोथॉन मुख्यालयासमोरील सर्व्हिस रोडवरून पामबीच मार्गाने टीएसचाणक्य चौकापर्यंत गेली व तिथून वळून पुन्हा पामबीच रस्त्याने मुख्यालयासमोर सायक्लोथॉनची सांगता झाली. या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यात आला तसेच सायकलसारख्या इंधनविरहित वाहनाचा वापर वाढवून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे तसेच स्वआरोग्य जपणुकीचे महत्वही प्रसारित करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, माजी आमदार संदीप नाईक, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व डॉ.संतोष वारूळे, सहा.आयुक्त डॉ.अमोल पालवे व शशिकांत तांडेल, कार्यकारी अभियंता राजेश पवार व इतर मान्यवर आणि सायकलपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त महोदयांसमवेत उपस्थितांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ घेऊन प्रारंभ झालेल्या या स्वच्छता सायक्लोथॉनमध्ये सहभागी सायकलपटूंना सहभाग पदके देऊन सन्मानीत करण्यात आले. 7 वर्षांच्या लहानग्या सायकलपटूपासून 68 वर्षांपर्यंतचे 500 हून अधिक सायकलपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये सहभागी महिला सायकलपटूंची संख्याही लक्षवेधी होती. लेट्स सेलिब्रेट फिटनेस आणि द लर्नयार्ड या संस्थांच्या सहयोगाने आयोजित या सायक्लोथॉनव्दारे स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रसारित करण्यासोबतच सायकल सारखे वाहन चालवून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी असाही संदेश देण्यात आला. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत सोमवार, दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 वा. महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्टेशन्सची सखोल स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली असून मंगळवार, 4 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसीच्या सर्व मार्केट्समध्ये सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित राहून सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

वीजबिल सवलतीपोटी महावितरणला ४२ कोटी

मुंबई, ता. २१ : महावितरणकडून राज्यभरातील कृषीपंपधारकांना वीजपुरवठा केला जातो. अनुसूचित जाती घटकांना या दरात दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या रकमेच्या प्रतिपूर्तीसाठी महावितरणला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून ४२ कोटींचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे वीजबिल थकबाकीचा सामना करणाऱ्या महावितरणला दिलासा मिळणार आहे. कृषीपंप ग्राहकांना वीजबिलात सवलत योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता चालू आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने ११५ रुपयांची तरतूद केली आहे. त्यानुसार महावितरणही सातत्याने अनुसूचित जाती घटकातील कृषीपंपधारक ग्राहकांना सवलतीच्या दराने वीज पुरवते. त्यामुळेच सरकारने या बिलाची रक्कम महावितरणला देण्याबाबत निर्णय घेतला आहे. दरम्यान, महावितरण इतर गटांतील वीज ग्राहकांनाही सवलतीच्या दराने वीजपुरवठा करते; मात्र सवलतीची रक्कम वेळेत मिळत नसल्याची माहिती महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दिली.

बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी समितीला ८ दिवसांची मुदत

 धारावी मशीद प्रकरण मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील धारावीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बीएमसी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे मशीद पाडल्याच्या आरोपावरून येथे वाद निर्माण झाला. या विरोधात शेकडो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या बीएमसीची टीम तेथून रवाना झाली आहे. याप्रकरणी पालिकेने बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी मशीद समितीला आठ दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत बीएमसी मशिदीवर कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र त्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मशिदीवर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी मुस्लीम समुदाय न्यायालयात धाव घेणार आहे. त्याचवेळी स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. धारावीचे रहिवासी समरुद्दीन शेख म्हणाले, “मी धारावीत जन्मलो आणि लहानाचा मोठा झालो, ज्या इमारतीला बीएमसी आणि इतर अधिकारी बेकायदेशीर म्हणत आहेत, ती एका दिवसात बांधली गेली नव्हती. बांधायला अनेक दिवस आणि महिने लागले, मग अधिकारी कुठे होते? आज ते संरचनेला मशिदीचे स्वरूप आले आहे, त्यामुळे आता ते मशीद पाडणार असल्याचे सांगत आहेत. मुंबईतील धारावी येथील मेहबूब सुभानी मशिदीचा काही भाग बेकायदेशीर असल्याचे सांगत बीएमसी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. ही मशीद खूप जुनी असल्याचे येथील लोक सांगतात. अशा स्थितीत मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी बीएमसीचे अधिकारी पोहोचले तेव्हा आंदोलकांनी त्यांच्या वाहनांचीही तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ००००