Month: September 2024

भाजपाचे खापरी येथील कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

 भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांच्याकडून स्वागत मुरबाड : तालुक्यातील खापरी ग्रामपंचायतीतील सदस्य व गावातील भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष गोटीराम पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पवार व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पवार उपस्थित होते. माजी आमदार गोटीरामभाऊ पवार व शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांना खापरी ग्रामपंचायतीत पदाधिकारी व ग्रामस्थांकडून कायम साथ देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मुरबाड तालुक्यात विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून विकासकामे सुरू असून, ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी दिली. खापरी, कामतपाडा, वैतागवाडी कामतपाडावाडी भागात झालेल्या विकासकामांसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदी असताना सुभाष पवार यांनी पुढाकार घेतला होता, याचा आवर्जून उल्लेख उपसरपंच सुरेश भांगरथ यांनी केला. तसेच खापरी येथील अरुण सीताराम राऊत, पांडुरंग राऊत, कपिल राऊत यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांचे भाजपामधून शिवसेनेत स्वागत केले. या वेळी सरपंच दीपक कवटे, संतोष देशमुख, अरुण (बंडू) पवार, महेश पवार, भाई देशमुख, नाना देशमुख, राजेश राऊत, चिंतामण वाघ, शंकर पारधी, अनिल भांगरथ, नेताजी भांगरथ, बुधाजी पारधी, संतोष वाघ, रघुनाथ हिलम, भालचंद्र लचका, योगेश भांगरथ, महेश भांगरथ, भूषण राऊत, कुणाल शिंदे, समीर पवार, गणेश बांगारा, दशरथ लचका, गणेश भला, अंकुश भांगरथ, सागर भांगरथ, काळुराम वाघ, प्रमोद लचका, पांडुरंग मुकणे, सचिन भांगरथ, सार्थक भांगरथ रोहित राऊत,प्रतीक राऊत,प्रशांत भांगरथ तुकाराम मुकणे संतोष भांगरथ कमलाकर भांगरथ, काशिनाथ पारधी, काशिनाथ मुकणे, सुनील फसाळे, संदेश पारधी, जगन मुकणे, सोमनाथ चवर, हिरामण हिरवा अशी शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांची नावे आहेत.

बदललेल्या टीशर्टमुळे कर्जत तिहेरी हत्याकांडातील आरोपी अडकला, पोलिसांच्या जाळ्यात

  अलिबाग  (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी हनुमंत जैतु पाटील याची पोलिसांनी 36 तास चौकशी केली. तरी तो गुन्ह्याची कबूली देत नव्हता. कोणताही पुरावा सापडत नव्हता. त्यामुळे त्याला सोडून देण्याच्या तयारीत पोलीस होते. परंतु ज्या घरातून आरोपी निघाला होता; तेव्हा त्याच्या अंगात पांढरा शर्ट होता. सकाळी घरी आला तेव्हा त्याच्या अंगात वेगळे टीशर्ट होते. टीशर्ट का बदलले हे सांगू शकला नाही. त्यानंतर त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. त्यामुळे हनुमंत हादरला आणि घराच्या हिस्स्यासाठी आपणच हे तिहेरी हत्याकांड केल्याची कबुली त्याने दिली. त्याला अटक करण्यात आले आहे, अशी महिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मंगळवारी  पत्रकार परिषदेत दिली. कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील मदन पाटील, त्यांची सात महिन्यांची गरोदर असलेली पत्नी अनिषा उर्फ माधुरी त्यांचा 11 वर्षांचा मुलगा विनायक यांची डोक्यात धारधार शास्त्रांनी वार करून हत्या केली.  तिघांचेही मृतदेह फेकण्यात आले होते. या प्रकरणात हत्येमागच्या सर्व  शक्यता तपासण्यात आल्या. तपास करत असताना मदन पाटील आणि त्यांचा सख्खा भाऊ हनुमंत यांच्यात घराच्या हिस्स्यावरून वाद होते अशी महिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी हनुमंत याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची 36 तास चौकशी केली. तरी तो गुन्ह्याची कबुली देत नव्हता. ही हत्या झाली तेव्हा आपण पोशीर येथे मामाकडे रहायला गेलो होतो. तेथून कुठे गेलो नाही असे पोलिसांना त्यांनी सांगितले. त्याचे मामा देखील हनुमंत आमच्याचकडे होता असे सांगत होते. पोलीस त्याला सोडून देण्याच्या मानसिकतेत होते. त्याचवेळी त्याने रात्री सफेद शर्ट घातला होता आणि सकाळी घरी आला तेव्हा त्याच्या अंगात वेगळा टीशर्ट होता, अशी माहिती मिळाली. टीशर्ट का बदलला. रात्री घातलेला पांढरा शर्ट कुठे आहे?असे प्रश्न विचारताच तो निरूत्तर झाला. त्याचवेळी पोशीर येथील शाळेच्या आवारतील सीसीटीव्ही फुटेजमधील त्याच्या हालचाली त्याला दाखवण्यात आला. तो हादरला आणि गुन्ह्याची कबुली दिली. चिकनपाडा येथील घराचा हिस्सा मिळावा व वेगळे रेशकार्ड काढून द्यावे  अशी मागणी हनुमंत थोरला भाऊ मदन याच्याकडे अनेक वर्ष करत होता. यावरू काही वर्षापूर्वी दोन्ही भावांमध्ये भांडण झाली होती. आपला भाऊ आपल्याला घराचा हिस्सा देणार नाही याची खात्री झाल्यामुळे मदनची हत्या करण्याचे हनुमंतने ठरवले. त्यानुसार गणेशचतुर्थीच्या निमित्ताने आपल्या पत्नीला माहेरी पाठवले. स्वतः पोशीर येथे मामाकडे राहण्यासाठी गेला. रात्री घरी मामाच्या घरी थांबला. मध्यरात्री घरातील सर्व मंडळी झोपल्यानंतर तो उठून चालत चिकनपाडा येथे भावाच्या घरी गेला. दरवाजा उघडा असल्यामुळे सरळ घरात शिरला. त्याने कुर्‍हाडीने मदन, अनिषा व विनायक यांच्यावर वार केले. घरातील रक्ताचे डाग फुसले. तीघांचे मृतदेह घराशेजारच्या ओढ्यात फेकले. रक्ताने माखलेला आपला सफेद शर्ट फेकला व दुसरे टीशर्ट घालून तो पुन्हा पोशीर येथे मामाच्या घरी गेला व गणपतीसमोर जाऊन बसला. चिकनपाडा येथे तिहेरी हत्याकांड झाल्याची बातमी पोशीरमध्ये पोहचली. तरी जणू आपण काही केले नाही असे हनुमंत वावरत होता. भावाच्या हत्येमुळे तो दुःखी झाल्याचे नाटक करत होता. त्यामुळे हनुमंत रात्रभर घरातच होता असे मामांना देखील वाटत होते. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अटकला.  हनुमंतनेच  घराच्या हिस्स्यासाठी सख्खा भाऊ, गरोदर  वहिनी आणि पुतण्याची हत्या केली हे  उघड झाले तेव्हा सारेच हादरून गेले. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी धुळा टेळे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या पथकांनी तपास करून गुन्हा उघडकीस आणला. कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी धुळा टेळे पुढील तपास करत आहेत. ही पूर्वनियोजित हत्या आहे. यात एका गरोदर महिलेची हत्या झाली आहे. 11 वर्षाच्या लहान मुलाची हत्या करण्यात आली आहे. ही क्रुरता लक्षात घेता आरोपी हनुमंत पाटील याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. एक महिन्याच्या आत आरोपपत्र दाखल करून. हा खटला फास्टट्रॅकवर चालवाव अशी न्यायालयाला विनंती करणार आहोत, अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. ००००

बीओबी टेबल टेनिस स्पर्धेत अंकित, कविता विजेते

मुंबई : बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय निवड चाचणी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये अंकित धीकोनियाने पुरुष गटात व कविता राणाने महिला गटात विजेतेपद पटकाविले. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने ग्रँट रोड येथील वायएमसीए टेबल टेनिस हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंकित धीकोनियाने व्ही. कुलदीपचा ११-४, ११-४, ११-४ असा सहज पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. प्रथमपासून आघाडीचे वर्चस्व राखणाऱ्या अंकितचे अचूक जोरकस फटके परतविण्यास अपयश आल्यामुळे व्ही. कुलदीपला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कविता राणा विरुद्ध कृतिका यामधील महिलांची अंतिम लढत अटीतटीची झाली. दुसऱ्या सेटमध्ये आक्रमक खेळ करीत १-१ अशी बरोबरी साधणाऱ्या कृतिका अग्रवालला अखेर कविता राणाने ११-६, ३-११, ११-७ असे चकविले आणि कविताने प्रथम क्रमांकावर झेप घेतली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टेबल टेनिस पंच सीताराम गमरे, बँक ऑफ बडोदा क्रीडा विभागाचे प्रदीप सुरोशे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी विजेत्या-उपविजेत्यांचे अभिनंदन केले. अखिल भारतीय स्तरावर होणाऱ्या बँक ऑफ बडोदा आंतर विभाग टेबल टेनिस स्पर्धेसाठी मुंबई विभागीय संघाचे प्रतिनिधित्व पुरुष गटामध्ये अंकित धीकोनिया, व्ही. कुलदीप, आशिष दवे, अभी चटोपाध्याय तर महिला गटामध्ये कविता राणा, कृतिका अग्रवाल, प्रार्थना मस्तुल, क्लॅरेट पी. आदी टेबल टेनिसपटू करणार आहेत.

खारघरकरांसाठी नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या-प्रशांत ठाकूर

अशोक गायकवाड पनवेल : एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत, त्या अनुषंगाने या ठिकाणी नाट्यगृहाची आवश्यकता निर्माण झाली असून नाट्यगृहाच्या उभारणीसाठी सिडकोने पाच हजार चौरस मीटरचा भूखंड द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक व भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर मंडल अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रवीण पाटील, माजी नगरसेक शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, कीर्ती नवघरे आदी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल विधानसभा मतदारसंघाची आजमितीस लोकसंख्या जवळपास साडे पाच ते सहा लाखांच्या आसपास असून आज झपाट्याने विकसित होणारे क्षेत्र म्हणून पनवेल व उरण तालुक्यांकडे पाहिले जाते. भविष्यात या परिसरात येणाऱ्या विविध प्रकल्पांमुळे या परिसरातील लोकसंख्या अजूनही मोठया प्रमाणात वाढणार आहे. त्या अनुषंगाने नागरिकांच्या मुलभूत गरजांसोबतच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गरजा पुरविणे हे शासन म्हणून आद्य कर्तव्य आहे. पनवेल परिसरामध्ये फक्त पनवेल येथील ‘आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके’ हे एकमेव नाट्यगृह आहे, त्यामुळे पनवेल परिसरातील सर्व नागरिकांच्या सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्याकरिता मर्यादा येत आहेत. पनवेल विधानसभा अंतर्गत खारघर विभाग हा अत्यंत सुनियोजित पध्दतीने विकसित होत असलेला विभाग असून, त्या ठिकाणची लोकसंख्याही मोठया प्रमाणावर वाढत आहे. खारघर क्षेत्राची ओळख ही उत्तम शैक्षणिक केंद्र (Educational Hub) म्हणून असून सेंट्रल पार्क गोल्फ कोर्स, उत्सव चौक तसेच अन्य धार्मिक प्रार्थनास्थळांमुळे एक वेगळी ओळख या परिसराची निर्माण झाली आहे. या परिसरात कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर रहात असून त्यांची मागणी व सांस्कृतिक गरज लक्षात घेता खारघरमध्ये एका नाटयगृहाची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे खारघर परिसरातील मोकळ्या भूखंडापैकी ५००० चौ. मी.चा भूखंड नाट्यगृहाकरिता तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. पनवेलला कला व सांस्कृतिक वारसा आहे. त्याच प्रमाणे झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या खारघरमध्येही कलाप्रेमी आहेत. येथील नागरिकांची नाट्यगृह असावी अशी मागणी आहे. त्यानुसार सिडकोकडून भूखंडाची मागणी केली आहे. नाट्यगृहाची लवकरात लवकर उभारणी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्या अनुषंगाने सिडको आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

१४ वर्षीय द्रिश्या नाईकची राष्ट्रीय ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

मुंबई : येत्या १६ ते २४ सप्टेंबर दरम्यान कर्नाल, हरियाणा येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील ज्युनियर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी भांडूपच्या अवघ्या १४ वर्षीय नववीत शिकत असलेल्या द्रिश्या श्रीकांत नाईक हीची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत द्रिश्याने चमकदार कामगिरी करताना ६ गुणांची कमाई करुन आपले हरियाणाचे तिकिट पक्के केले. या स्पर्धेत तिने ६ विजय मिळविले. तर दोन सामने गमावले.  तिचा चौथा क्रमांक लागला. स्पर्धेत प्रथम ६ क्रमांक मिळवणारे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. शेवटच्या फेरीत द्रिश्याने यजमान कोल्हापूरच्या प्रथम मानांकन देण्यात आलेल्या दिव्या पाटीलचा पराभव करुन स्पर्धेत खळबळ माजवली. तसेच तिने पुण्याच्या फिडे रेटेड खेळाडू राजराजेश्वरी देशमुखला देखील नमविण्याचा पराक्रम केला होता. राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेली द्रिश्या मुंबईची एकमेव खेळाडू आहे. ३ वर्षे स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळणाऱ्या द्रिश्याचे केतन पाटील प्रशिक्षक आहेत. ती रोज ४ तास नियमित सराव करते. तिचे वडिल आंतर कॉलेज बुद्धिबळ स्पर्धेत खेळले होते.

टाकाऊ मधून टिकाऊ 

मुंबई : घरगुती आणि सार्वजनिक श्री गणेशोत्सवामध्ये विविध प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला पहायला मिळतात. ठाण्यातील ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री श्रीमती शुभांगी जयंत लेले यांच्या निवासस्थानी सुपूत्र आनंद, स्नुषा स्नेहा आणि नात मधुरा ही मंडळी दरवर्षी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ सजावट करण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतात. जुन्या वर्तमानपत्रांचा लगदा बनवून त्यापासून विविध प्रकारची सजावट करतात. पेन्सिली, सोडावॉटर बाटल्या, छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, जुन्या वह्या, पुस्तके, किराणा मालाच्या दुकानातून आणलेल्या वस्तूंच्या खोक्यांचा वापर सजावटीसाठी करुन आनंद जयंत लेले यांनी पारितोषिके पटकावली आहेत. ग्रंथ आणि साहित्य यांचा उपयोग करुन साहित्य प्रेमी गणरायही भक्तांच्या दर्शनाला आले आहेत. यंदा कोरोगेटेड बॉक्सच्या पुठ्ठ्यातून मंदिर साकारुन त्याला छानशी रंगसंगती करुन भाविक भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले आहे.

दादरच्या सुंदरनगरी अवतरली अयोध्या : श्री सिद्धिविनायक अंध अपंग सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे यांच्या सुंदरनगर, दादर येथील निवासस्थानी श्री गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे.  अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर श्रींची मूर्ती विराजमान झाली आहे. या विलोभनीय मूर्तीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी लोटत आहे.

स्वामी विवेकानंद स्मृती दिनाचे आयोजन

मुंबई : स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागोमध्ये जे ऐतिहासिक भाषण केले त्याला १३१ वर्ष झाली. या पार्श्वभूमीवर स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई येथे ” राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यास ” संस्थेने राष्ट्रप्रेम उत्सव चे आयोजन केले असल्याची माहिती न्यास चे अध्यक्ष नीरज कुमार यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ११ सप्टेंबर रोजी होत असलेल्या या राष्ट्रप्रेम उत्सवामध्ये युवकांच्या भविष्यावर परिसंवाद, स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचे चित्र प्रदर्शन, देव धर्म या पेक्षा देश मोठा आहे या विषयावर भव्य नाटक, राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेस केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, मनजीत सिंग,कुमार सुशांत, रोशन सिंग उपस्थित होते.

खासदार नरेश म्हस्के यांची नवी मुंबईकरांना गणेशोत्सवाची आरोग्यपूर्ण भेट

 नवी मुंबई महापालिकेस स्वतःचे पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास नॅशनल मेडिकल कमिशनची परवानगी प्राप्त नवी दिल्ली, दि. १० – नवी मुंबई महापालिकेचे ‘पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महावि‌द्यालय (Post Graduate Institute of Medical Science)’ सुरु करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अर्थात National Medical Commission मार्फत परवानगी प्राप्त झालेली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी या संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची १ जुलै २०२४ रोजी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन तात्काळ परवानगी मिळण्याची आग्रही मागणी केली होती. खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीला यश आले राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. महापालिकेचे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांचेही आवश्यक परवानगी प्राप्त व्हावी यादृष्टीने सहकार्य लाभले. खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्यानंतर सकारात्मक परिणाम होत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची नवी मुंबई महानगरपालिका पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महावि‌द्यालय (Post Graduate Institute of Medical Science) सुरु करण्यास परवानगी प्राप्त झाली असून ही नवी मुंबईकरांना गणेशोत्सवात मिळालेली मौल्यवान आरोग्यपूर्ण भेट आहे.…

ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

  मुंबई, दि. १० :- ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांनी मानवी स्वरूपात अनुज्ञप्ती प्राप्त केली आहे, अशा वाहन चालकांनी १५ सप्टेंबरपर्यंत अनुज्ञप्तीचे (ड्रायव्हींग लायसन्स) संगणक प्रणालीद्वारे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे. १५ सप्टेंबर नंतर मानवी स्वरूपातील अभिलेखाचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरण केले जाणार नाही याची अनुज्ञप्ती धारकांनी नोंद घ्यावी. मुंबई (मध्य) ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) परिसरात कार्यालयीन इमारतीचे बांधकाम, आय ॲण्ड सी सेंटर, वाहन चालक प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम होणार आहे. या कार्यालयाकडून नोव्हेंबर २००६ पूर्वी जारी करण्यात आलेल्या सर्व अनुज्ञप्ती धारकांना अनुज्ञप्ती मानवी स्वरूपातच आहे. अशा अनुज्ञप्ती धारकांनी १५ सप्टेंबरपर्यंत या कार्यालयामध्ये येऊन आपले अनुज्ञप्तीचे संगणक प्रणालीमध्ये बॅकलॉग करून घ्यावे. व मानवी स्वरूपातील अभिलेखाचे स्माट कार्डमध्ये रूपांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.