Month: September 2024

बोरा बाजार येथील रस्त्याचे ‘शांतीनाथ देरासर मार्ग’ नामकरण करण्यात यावे

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची मागणी मुंबई : मुंबईतील फोर्ट येथील बोरा बाजार जवळील मार्गाचे नामकरण “शांतीनाथ देरासर मार्ग” असे करण्यात यावे, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड.राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे एका पत्राद्वारे केली आहे. कुलाबा विधानसभा क्षेत्रातील बोरा बाजार, फोर्ट येथे प्राचीन असे श्री शांतीनाथ श्वेतांबर जैन देरासर मंदिर आहे. श्वेतांबर जैन भाविकांच्या दृष्टीने हे अत्यंत पवित्र असे धार्मिक स्थळ असून येथे वर्षभर श्रध्दाळू आणि भाविक मोठया संख्येने भेट देत असतात. फोर्ट विभागातील रहिवाशांची या विभागातील रस्त्याचे नामकरण “शांतीनाथ देरासर मार्ग” असे करण्यात यावे, अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. जैन बांधवांची ही मागणी लक्षात घेता तातडीने याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, असे विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी या पत्रात नमूद केले आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 30 कोटी रुपये वितरित

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत  30 कोटी रुपये निधी वितरित करण्यास कृषी विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षातील मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये केलेल्या तरतुदीतून 30 कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

अबू धाबीच्या राजकुमारांचे मुंबईत आगमन

मुंबई : अबू धाबीचे राजकुमार शेख खालेद बीन मोहम्मद बीन झायेद अल नाहयान  यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दुपारी १.२० वाजता आगमन झाले. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, जिल्हाधिकारी राजेंद्र  क्षीरसागर यांनी यावेळी स्वागत केले. यावेळी राजशिष्टाचार विभाग तसेच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हॉटेल  ट्रायडन्ट, मुंबई  येथे पुढील नियोजित कार्यक्रमासाठी ते रवाना झाले.

वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५४वी बैठक संपन्न

राज्याच्या वतीने मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती मुंबई : वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५४वी बैठक ९ सप्टेंबरला सुषमा स्वराज भवन, चाणक्यपुरी, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला महाराष्ट्र राज्याच्या वतीने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, गोवा आणि मेघालयचे मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि तेलंगणाचे उपमुख्यमंत्री, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे वित्त मंत्री (विधानमंडळासह) आणि केंद्र सरकार आणि राज्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते. आरोग्य आणि टर्म इन्शुरन्स सेवांवरील जीएसटी, नुकसानभरपाई उपकर (कंपेंसेशन सेस), संशोधन आणि विकासासाठी अनुदानावरील जीएसटी इत्यादीसारख्या सामान्य जनतेच्या आणि समाजाच्या हिताशी संबंधित प्रमुख मुद्यांवर परिषदेत चर्चा करण्यात आली. यामध्ये जीवन व आरोग्य विमा सेवांवरील कराचा दर व जीएसटी उपकर (कंम्पेनसेशन सेस) बाबतचे भविष्य यांचा अभ्यास करण्यासाठी मंत्री गट तयार करण्याची शिफारस करण्यात आली. तर सरकारी संस्था, विद्यापीठे, महाविद्यालय तसेच सरकारी किंवा खाजगी अनुदाना आधारे संशोधन व विकास काम करणाऱ्या संस्थांना मिळणाऱ्या अनुदानात कर मुक्ततेबाबत प्राधान्याने विचार करण्याची जीएसटी परिषदेने शिफारस केली. यासह ५३ व्या जीएसटी परिषदेत घेतलेले लोकाभिमुख निर्णय जसे की, व्याज व दंड माफीची योजना, व इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याबाबतच्या मर्यादा कालावधीत वाढ यासारखे निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती या बैठकीत निश्चित करण्यात आली.

दलित पँथरच्या अध्यक्षपदी डॉ. स्वप्रिल ढसाळ

रमेश औताडे मुंबई : दलित पँथर या संघटनेची पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी १९७२ साली स्थापन केली होती. त्यांच्या दुर्दैवी दुःखद निधनानंतर त्यांच्या पत्नी मल्लिका यांच्याकडे संघटनेची जबाबदारी होती. त्यांनी आता त्यांच्या आजारपणामुळे संघटनेची अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांचे पुतणे डॉ. स्वप्नील ढसाळ यांच्याकडे त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. नवनिर्वाचित युवा अध्यक्ष डॉक्टर स्वप्रिल ढसाळ हे नामदेव ढसाळ यांचे पुतणे आहेतच पण नामदेवची ध्येयधोरण ही त्यांना माहित आहेत आणि आमची नवी फळी नव्या जोमाने पुन्हा मैदानात उत्तरत आहे . रोजगार योजना, महीला अत्याचार, उद्योग, जेष्ठ नागरिक, तरुण, शेतकरी असे सर्व घटक आज दुर्लक्षित आहेत. त्यांच्याकडे संघटना नव्या जोमाने सामोरे जाऊन लढा देणार आहे असे डॉ. स्वप्रिल ढसाळ  यांनी सांगितले.

अतिक्रमण विभागामार्फत ऐरोली विभागात तोडक कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सागरनाथ रामा मढवी, घर नं – 30 ,मच्छी मार्केटच्या मागे, दिवा गाव ,सेक्टर – 9 , ऐरोली येथील आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. मा.उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र.1591/2023 च्या आदेशानुसार आज रोजी दुसऱ्या मजल्याचे बांधकाम अंशत: निष्कासीत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सदर ठिकाणी पोकलेन, जेसीबी सारखी मशनरी जावु शकत नसल्याने या मोहिमेसाठी 10 हॅमर, 7 ब्रेकर, व 16 मजूर यांचा वापर करण्यात आलेला असून मोहिमेकरीता जी विभाग ऐरोली येथील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. 0000  

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती

 माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री व या समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते मधुकर मुसळे, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत उपस्थित होते. या समितीमध्ये  तीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख तसेच विशेष आमंत्रित आणि पदसिद्ध सदस्यांचा समावेश आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या निर्धाराने पक्ष कार्यकर्ते सज्ज झाले असल्याचेही  दानवे यांनी नमूद  केले. यावेळी दानवे म्हणाले की, बूथ पर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे ही व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे नियोजन, संचलन करण्यासाठी प्रदेश, जिल्हा, तालुका स्तरावर अधिवेशने झाली आहेत. विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती अंतर्गत विविध स्तरांवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, श्रीकांत भारतीय यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विविध समित्यांचे प्रमुख खालीलप्रमाणे –  जाहीरनामा समिती – वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार विशेष संपर्क – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक संपर्क – राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, महिला संपर्क – राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर,  कृषी क्षेत्र संपर्क – अशोक चव्हाण, लाभार्थी संपर्क – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, युवा संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, प्रचार यंत्रणा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सहकार क्षेत्र संपर्क – विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, मीडिया- अतुल भातखळकर, ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अनुसूचित जाती संपर्क – माजी आमदार भाई गिरकर, अनुसूचित जमाती संपर्क – आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, सोशल मीडिया – निरंजन डावखरे, निवडणूक आयोग संपर्क- माजी किरीट सोमय्या.महायुती निवडणूक अभियान समन्वयक म्हणून  ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन काम पाहणार आहेत. विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे ही  दानवे यांनी नमूद केले. पदसिद्ध सदस्य म्हणून प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, विक्रांत पाटील, माधवी नाईक, विजय चौधरी आणि संजय केनेकर काम पाहणार आहेत.

खारघरकरांसाठी नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

 प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत, त्या अनुषंगाने या ठिकाणी नाट्यगृहाची आवश्यकता निर्माण झाली असून नाट्यगृहाच्या उभारणीसाठी सिडकोने पाच हजार चौरस मीटरचा भूखंड द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक व भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर मंडल अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रवीण पाटील, माजी नगरसेक शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, कीर्ती नवघरे आदी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल विधानसभा मतदारसंघाची आजमितीस लोकसंख्या जवळपास साडे पाच ते सहा लाखांच्या आसपास असून आज झपाट्याने विकसित होणारे क्षेत्र म्हणून पनवेल व उरण तालुक्यांकडे पाहिले जाते. भविष्यात या परिसरात येणाऱ्या विविध प्रकल्पांमुळे या परिसरातील लोकसंख्या अजूनही मोठया प्रमाणात वाढणार आहे. त्या अनुषंगाने नागरिकांच्या मुलभूत गरजांसोबतच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गरजा पुरविणे हे शासन म्हणून आद्य कर्तव्य आहे. पनवेल परिसरामध्ये फक्त पनवेल येथील ‘आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके’ हे एकमेव नाट्यगृह आहे, त्यामुळे पनवेल परिसरातील सर्व नागरिकांच्या सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्याकरिता मर्यादा येत आहेत. पनवेल विधानसभा अंतर्गत खारघर विभाग हा अत्यंत सुनियोजित पध्दतीने विकसित होत असलेला विभाग असून, त्या ठिकाणची लोकसंख्याही मोठया प्रमाणावर वाढत आहे. खारघर क्षेत्राची ओळख ही उत्तम शैक्षणिक केंद्र (Educational Hub) म्हणून असून सेंट्रल पार्क गोल्फ कोर्स, उत्सव चौक तसेच अन्य धार्मिक प्रार्थनास्थळांमुळे एक वेगळी ओळख या परिसराची निर्माण झाली आहे. या परिसरात कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर रहात असून त्यांची मागणी व सांस्कृतिक गरज लक्षात घेता खारघरमध्ये एका नाटयगृहाची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे खारघर परिसरातील मोकळ्या भूखंडापैकी ५००० चौ. मी.चा भूखंड नाट्यगृहाकरिता तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. कोट- पनवेलला कला व सांस्कृतिक वारसा आहे. त्याच प्रमाणे झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या खारघरमध्येही कलाप्रेमी आहेत. येथील नागरिकांची नाट्यगृह असावी अशी मागणी आहे. त्यानुसार सिडकोकडून भूखंडाची मागणी केली आहे. नाट्यगृहाची लवकरात लवकर उभारणी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्या अनुषंगाने सिडको आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. – आमदार प्रशांत ठाकूर

एसटी महामंडळाची बसगाडी मेट्रो खांबाला धडकली

आठ प्रवासी जखमी ठाणे : घोडबंदर येथील ओवळा भागात मंगळवारी पहाटे राज्य परिवहन सेवेची (एसटी) बसगाडी मेट्रो मार्गिकेच्या खांबाला धडकली. या अपघातात चालक आणि वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. काही दिवसांपूर्वीच एसटी महामंडळाची बसगाडी घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलाजवळील कठड्याला धडकली होती. त्यानंतर हा दुसरा अपघात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आंबेजोगाई येथून बोरीवलीच्या दिशेने एसटी बसगाडी वाहतुक करत होती. त्यामध्ये वाहक आणि चालकासह एकूण १३ प्रवासी प्रवास करत होते. ही बसगाडी पहाटे ५.३० घोडबंदर येथील ओवळा नाका परिसरात आली असता, बसगाडीतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसगाडी मेट्रो मार्गिकेच्या खांबाला धडकली. या धडकेमध्ये बसगाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले. तर बसगाडीमधील १३ पैकी आठ प्रवासी जखमी झाले. या प्रवाशांना उपचारासाठी ब्रम्हांड आणि मानपाडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नावे के. अडसूळ (चालक, वय- ३५), चाटे (वाहक), उद्धव चौरे (६५), उर्मिला चौरे (५५), सलीम शेख (५८), आत्मराम शेजुळ (४९), राजश्री शेजुळ (४२) आणि आकांक्षा शेजुळ (३५) अशी जखमींची नावे आहेत. 0000

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर ध्वनी अवरोधक

मुंबई : मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी या मार्गावर ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. या मार्गावरील ५०८ किमी अंतरापैकी आतापर्यंत ८७.५ किमी परिसरात १ लाख ७५ हजार ध्वनी अवरोधक बसविण्यात आले आहेत. बुलेट ट्रेन खाडी भाग, डोंगराळ प्रदेश, नागरी वस्तीमधून जाणार आहे. विशेषतः बुलेट ट्रेन नागरी भागातून जात असताना प्रचंड ध्वनिप्रदूषण होण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेन आणि रुळाच्या घर्षणामुळे होणाऱ्या कर्कश आवाजाने मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन मार्गाच्या दोन्ही बाजूला ध्वनी अवरोधक बसविण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गुजरातमध्ये सर्वाधिक वेगात काम झाले आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत १ लाख ७५ हजारांहून अधिक ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. एक किमी अंतरावर व्हायाडक्टच्या दोन्ही बाजूला २ हजार ध्वनी अवरोधक बसविण्यात आले आहेत. ध्वनी अवरोधक सुरत, आनंद आणि अहमदाबाद येथील कारखान्यात तयार करण्यात आले आहेत. रेल्वे पातळीपासून २ मीटर उंच आणि १ मीटर रुंद काँक्रीटच्या पॅनेल स्वरुपात ते आहेत. प्रत्येक ध्वनी अवरोधक अंदाजे ८३०-८४० किलो वजनाचा आहे. ध्वनी अवरोधकामुळे ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे, असे नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) सांगण्यात आले.