Month: September 2024

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेची सप्टेंबरमध्येही नोंदणी – किशन जावळे

अशोक गायकवाड   रायगड : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तरी पात्र महिलांनी तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी सप्टेंबर २०२४ मध्येही सुरू राहणार आहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. 0000

हेराल्ड ग्लोबल या जागतिक संस्थेद्वारे खासदार अरविंद सावंत यांना ‘प्राइड ऑफ इंडिया – आयकॉन २०२४’ पुरस्कार

राजेंद्र साळसकर   मुंबई : हेराल्ड ग्लोबल आणि  ईआरटीसी मीडिया द्वारे “प्राइड ऑफ इंडिया – आयकॉन २०२४” हा पुरस्कार भारताच्या अभिमानाला मूर्त रूप देणाऱ्या प्रतिष्ठित नेत्यांचा सन्मान करण्यासाठी देण्यात येतो. देशास अभिमानास्पद कामगिरी, कर्तव्याप्रति वचनबद्धता, दूरदर्शी नेतृत्व, महत्त्वपूर्ण योगदान, भारताच्या समृद्ध वारसाचे प्रतिबिंब आणि अर्थव्यवस्थेवरील परिवर्तनात्मक प्रभाव अशा विविध बाबींची दखल घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अरविंद सावंत यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयटीसी मराठा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘गोलफेस्ट कॉन्क्लेव्ह २०२४’ या भव्य सोहळ्यामध्ये खासदार अरविंद सावंत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर सोहळ्यास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर अध्यक्ष श्री. ललित गांधी, बॉम्बे बार असोसिएशन अध्यक्ष श्री. नितीन ठक्कर यांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी चित्रपट , उद्योग ,संगीत क्षेत्रातील  यशस्वी,प्रतिभावंतांचा  सत्कार करण्यात आला .हेराल्ड ग्लोबल चे  मुख्य संपादक सैमिक सेन यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .यावेळी ईआरटीसी मीडियाचे प्रतिनिधी, समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणारे गुणवंत उपस्थित होते. हेराल्ड ग्लोबल संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतास थायलंड, दुबई, मलेशिया, सिंगापूर, लंडन आदी देशांत अनेक यशस्वी कार्यक्रम यापूर्वी केले आहेत. आज संपन्न झालेल्या सोहळ्यात भारतातील यशस्वी ब्रँड्स आणि विविध क्षेत्रातील यशस्वी नेत्यांची ओळख करून देणार्‍या कॉफी टेबल बुकच्या 16 व्या आवृत्तीचे प्रकाशन देखील याप्रसंगी करण्यात आले. ०००००

ठाकरे गटाचा मुरबाड तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

राजीव चंदने मुरबाड :  तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये जनतेची कामे होत नसल्याने मुरबाडच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव यांच्या संकल्पनेतून तालुका प्रशासकीय प्रमुख म्हणून मुरबाड तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुखरुपेश म्हात्रे, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते अल्ताफ शेख,हे मोर्चाच्या अग्रस्थानी होते. महिला व मुलींबाबतच्या प्रश्नांसह मुरबाड तालुक्यातील कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती,आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग,फॉरेस्ट, विद्युत कंपनी, औद्योगिक महामंडळ, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, नगरपंचायत इ. कार्यालया संदर्भातील विविध जनहितार्थ मुरबाडच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे, सेनेकडून शुक्रवारी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी रुपेश म्हात्रे यांनी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर धडक दिली. 00000

राजाराम मोरे यांची ‘सहाय्यक गट विकास अधिकारी’ माणगाव पदी बढती

विश्वास गायकवाड   बोरघर / माणगाव : रायगड जिल्हा परिषद अलिबाग विभागांतर्गत  माणगाव पंचायत समितीच्या ‘सहाय्यक प्रशासन अधिकारी’ या पदावर कार्यरत असणारे राजाराम अनंत मोरे यांच्या आजवरच्या प्रशासकीय कार्याची रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेऊन त्यांची माणगाव पंचायत समिती कार्यालय येथे ‘सहाय्यक गट विकास अधिकारी’ पदावर नियुक्ती करून बढती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे रायगड जिल्हा परिषद व माणगाव पंचायत समिती कार्यालय,कौटुंबिक आप्त परिवार, मित्र परिवार आणि सामाजिक स्तरातून सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. राजाराम मोरे हे ८ जानेवारी १९९० रोजी माणगाव पंचायत समिती येथे रुजू झाले होते, आणि आता त्याच ठिकाणी त्यांना ‘सहाय्यक गट विकास अधिकारी’ या पदावर बढती देण्यात आली आहे. राजाराम मोरे यांना प्रथम पदोन्नती हि १० ऑक्टोबर २००३ मध्ये बालविकास प्रकल्प विभागात मिळाली होती तर दुसरी पदोन्नती हि १ फेब्रुवारी २०१३ मध्ये म्हसळा पंचायत समिती येथे ‘कनिष्ठ प्रशासन अधिकारी’ या पदावर देण्यात आली होती. तसेच राजाराम मोरे यांनी सुधागड पाली पंचायत समिती येथे देखील रोखपाल पदावर काम केले आहे. एकंदरीत राजाराम मोरे यांना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन, बालविकास प्रकल्प, ग्रामपंचायत, समाजकल्याण, प्राथमिक शिक्षण विभागात देखील काम केल्याचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांचे कार्य कुशल आणि समाधानकारक प्रशासकीय कामकाज पाहता प्रशासकिय दृष्टिकोनातून त्यांना ही एक संधी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांनी दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पंचायत समिती माणगाव आता पर्यंतच्या कार्यकाळात सहाय्यक प्रशासन अधिकारी यास प्रथमत सहाय्यक गट विकास अधिकारी ह्या पदावर श्री. राजाराम मोरे साहेबांच्या रूपाने संधी मिळाली याचा समस्त माणगाव करांसह रायगड जिल्ह्यास आनंद होत आहे.   राजाराम मोरे हे ‘सहाय्यक गट विकास अधिकारी’ या पदावर 2 सप्टेंबरला हजर झाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या प्रशासकिय कामकाजाची जबाबदारी देखील वाढली असून ते या पदाला निश्चितच योग्य तो न्याय देतील यात शंका नाही. त्यांचा मित्र परिवार आणि   हितचिंतकांकडून त्यांना सोशल मीडियाच्या वॉट्सअप, फेसबुक आणि प्रत्यक्ष भेटून त्यांना अभिनंदनपर शुभेच्छा देत आहेत.

‘किड्स स्पोर्ट्स कार्निवल’ बोरीवलीत उत्साहात संपन्न

मुंबई : प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘किड्स स्पोर्ट्स कार्निवल’ या आगळ्यावेगळ्या   आंतरशालेय उपक्रमाला  विद्यार्थी व पालकांचा छान प्रतिसाद मिळाला. सुविद्या स्पोर्ट्स अकॅडमी गोराई, बोरीवली…

अविनाश फडतरे यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

ठाणे : जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे या अनुषंगाने ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व…

जिल्हा परिषद अंतर्गत ६९७ युवा प्रशिक्षणार्थीना नियुक्तीपत्र

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-ठाणे कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिल्हा परिषद अंतर्गत राबविली जात आहे. युवा प्रशिक्षणांतर्गत…

अखिल आगरी समाज परिषदेच्या मेळाव्यात मान्यवरांचा

आगरी समाजाच्या उन्नतीसाठी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार !   पनवेल : आगरी समाजाच्या सध्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थितीचा विचार करून सामूहिक संघटनेच्या बळावर काही ठोस कार्यवाही करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी अखिल आगरी समाज परिषदेतर्फे आगरी समाज काल आज आणि उद्या या शीर्षकाखाली समाजातील लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि समाज बांधव, भगिनींचा भव्य मेळावा रविवारी जासई येथील लोकनेते दि. बा. पाटील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी मान्यवरांनी आपली मते व्यक्त करून समाजाच्या उन्नतीसाठी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला. या मेळाव्यास आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील, सल्लागार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री व ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, खासदार बाळ्यामामा म्हात्रे, खासदार संजय पाटील, आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार मनोहर भोईर, कामगार नेते महेंद्र घरत, उद्योगपती जे.एम. म्हात्रे, अरुणशेठ भगत, कार्याध्यक्ष जे.डी.तांडेल, सरचिटणीस दिपक म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भगत, लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, कामगार नेते भूषण पाटील, राजेश गायकर, संतोष केणे, दशरथ म्हात्रे, माजी नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुरेश ठाकूर, सोन्या पाटील, संतोष घरत, दीपक पाटील, भावना घाणेकर, वंदना घरत यांच्यासह आगरी समाजाचे बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या. या वेळी आगरी समाजातील नवनिर्वाचित खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि खासदार संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रत्येक समाज आपापल्या संघटना बळकट करत आहेत. आम्हीही आमची आगरी समाजाची संघटना एकसंघ मातृसंस्था म्हणून अखिल आगरी समाजाच्या व्यासपीठावर एकत्र आणण्याचा हा पहिला प्रयत्न केला आहे. समाजातील नवतरुणांमध्ये जागृती व्हावी याकरिता या मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे मत परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी व्यक्त केले. लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव विमानतळाला देण्यात यावे यासाठी जो संघर्ष इथल्या भूमिपुत्रांनी आणि स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी केला, त्यामुळेच या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश येताना दिसतंय. आधीपासूनच समाज कष्टाने स्वाभिमानाने जगत राहिला, परंतु समाजाच्या कथा व्यथा या सर्व मांडण्याकरिता अखिल आगरी समाज परिषदचे व्यासपीठ निर्माण झाले, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार आमदार गणेश नाईक यांनी काढले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, आपण ज्या ज्या परिसरात राहतो त्या परिसराचे संदर्भ आणि प्रश्न बदलत चाललेले आहेत. समाज हा वेगवेगळ्या समाजामध्ये काम करणार्‍या आपणा सर्वांच्या धडपडणार्‍या आणि त्याचबरोबर चळवळ आंदोलनाच्या मार्गामध्ये पुढे जाणार्‍या आपल्या सर्व सहकार्‍यांमुळे समाज अधिकाधिक व्यापक आणि मोठा होत चाललेला आहे. आपण आज ज्या गावात बसलोय ती भूमी क्रांतीची आहे. या भूमीने १९८४ सालच्या आंदोलनाची धग पाहिलेली आहे. लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या विरोधातील आंदोलन आणि आंदोलनामुळे दि.बा. पाटीलसाहेबांचा लढा महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडून पलीकडे गेला. या आंदोलनामुळे जे साडेबारा टक्के विकसित भूखंड भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांना द्यायचे तत्व प्रस्तापित झाले आणि त्यामुळे पाटीलसाहेबांचे नेतृत्व आणि समाजाचा लढा साता समुद्रापलिकडे जाऊन पोहचला त्यातून आगरी समाजाची संघर्षशील प्रवृत्ती अधिक ठळक झाली. आपल्याला साहेबांनी एक मंत्र दिलाय की, लढल्याशिवाय मिळत नाही आणि लढणे हे थांबवायचे नसते. समाजाच्या मागण्यांसाठी व प्रगतीसाठी जोमाने वाटचाल करूया. अन्य उपस्थित वक्त्यांनीही आपले विचार व्यक्त केले. या वेळी आगरी दर्पण या मासिकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. 0000

करंजा बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करणार – देवेंद्र फडणवीस

अशोक गायकवाड   रायगड : रायगड जिल्ह्यातील करंजा येथे एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे मच्छीमार बंदर उभारणीचे कामाला गती देण्यात येणार असून त्यासाठी १५३ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय याठिकाणी अत्याधुनिक अशी जेटी तयार करण्यात येणार असून, हे बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उरण नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत, सावित्रीबाई फुले फुल मार्केट आणि विश्वरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर भवन आणि समाज विकास केंद्र, उरण टाऊन हॉल यांचे लोकार्पण आणि उपजिल्हा रुग्णालय भूमिपूजन,उरण चारफाटा येथील मच्छिमार्केटचे उदघाटन यांसह विविध विकास कामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी उरण येथे झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, लोकनेते रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर मावळचे खासदार श्रीरंग बारणे, प्रशांत ठाकूर, रविंद्र पाटील, महेश बालदी, जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, न्हावा – शिवडी अटल सेतूमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. भविष्यात उद्योगाचे खरे मॅग्नेट रायगड जिल्हा होणार आहे. यामुळे जिल्ह्यात मोठया संधी निर्माण होणार आहेत. नवी मुंबई विमानतळामुळे जी डी पी मध्ये १ टक्के वाढ होणार आहे. डेटाचे हब म्हणून रायगड आणि नवी मुंबईची ओळख निर्माण झाली आहे. या दोन भागांमधून मोठ्या प्रमाणात डेटाची निर्मिती होत असून देशपातळीवर डेटा सेंटर्सची ६० टक्के क्षमता ही रायगड आणि नवी मुंबईत आहे.त्यामुळे या पुढील काळात महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन म्हणून रायगड जिल्हा होत असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. मच्छीमारांचे हित जोपासत वाढवण बंदराची उभारणी करण्यात येत आहे. या बंदरामुळे निर्यात क्षमता वाढणार आहे. ग्लोबल सप्लाय चेनचा भाग आपण आता झालो आहोत असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आ. महेश बालदी हे अतिशय अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी अतिशय कल्पकतेने मतदार संघात दर्जेदार व उत्कृष्ट विकासकामे केली आहेत. त्यांच्या प्रत्येक विकासकामासाठी पुरेसा निधी आणि आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. उरणच्या विकासासाठी सर्वोतॊपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. महेश बालदी सातत्याने आग्रही आहेत. उरण मध्ये सर्वसमावेशक विकास कामाना प्राधान्य देण्यात आले आहे. उरणच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे काम आ. बालदी यांनी केले आहे. उरणच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या माध्यमातून निधी देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्रीरंग बारणे यांचे मनोगत झाले.  महेश बालदी यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीचा पुनःरूच्चार आपल्या प्रास्तविकात केला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी यांसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. 00000

४० वर्षीय नराधमाने ८ वर्षीय बालिकेवर केले अत्याचार

पनवेल शहर पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल राज भंडारी   पनवेल : शहरातील गजबजलेल्या ठिकाणी राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाने याच परिसरात राहणाऱ्या ८ वर्षीय बालिकेला घरातील बाथरूममध्ये नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत आरोपी विरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. शहरातील वाल्मिकी नगर परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय इसमाने सोमवारी दिनांक ०३ सप्टेंबर रोजी परिसरात राहणाऱ्या ८ वर्षीय मुलीला बोलावून तिला घराच्या समोरील शौचालयात नेवून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीने घडला प्रकार आपल्या आईजवळ कथित केल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पनवेल शहर पोलिस ठाणे गाठले. यावेळी पोलिसांनी सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपीला अटक केली. याबाबत आरोपींविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पनवेल शहर पोलिस करीत आहेत.