रमेश औताडे

मुंबई : सामाजिक कार्यकर्ते व युवा से युवा फौंडेशन या संस्थेचे अध्यक्ष आदित्य अरुण माहिमकर यांनी मंगळवारी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील राजीव गांधी भवन, काँग्रेस पक्ष कार्यालयात शेकडों कार्यकत्यांसह राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
आदित्य माहिमकर यांचा दक्षिण मुंबईत चांगला जनसंपर्क आहे. युवा से युवा फौंडेशन च्या माध्यमातून ते तरुण वर्गाशी जोडले गेले आहेत. तरुण पिढीचे प्रश्न पोटतिडकीने मांडण्याचे सामर्थ्य त्यांच्या शब्दात आहे. त्यामुळे आदित्य माहिमकरांचे नेतृत्व तरुणवर्गाला आकर्षित करत आहे.
काँग्रेस पक्षाचा देशाला इतिहास आहे. त्यामुळे मी माझ्या हजारो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मुंबई काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी माझ्या सारख्या तरुण नेतृत्वावर विश्वास दाखवून मला काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. काँग्रेस पक्षाने मला कुलाबा विधानसभा मतदारसंघात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
आज प्रस्थापित नेतृत्व असणारे लोक फक्त सत्तेसाठी आणि मोठेपणा करण्यासाठीच आपलं नेतृत्व करतात. अशा लोकांच्या सत्तेला धक्का देण्याची ताकद युवा नेतृत्वात आहे असे महिमकर यावेळी म्हणाले.
आजच्या तरुणाचे  प्रश्न आणि समस्या वेगळ्या आहेत आणि त्यावर आजही योग्य ते निर्णय घेताना फार उशीर होतो. हेच तरुण नेतृत्व आमच्या अनेक समस्यांचा योग्य तो तोडगा शोधताना आम्हाला दिसत आहे. प्रस्थापित नेतृत्वावरील विश्वास आता उडाला आहे आणि आता तरुण नेतृत्वासोबत अनेक नवीन बदल घडून येतील अशी इच्छा आदित्य माहिमकर यांनी बोलताना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *