राज्यातील महिला सुरक्षा व सामाजिक शांततेसाठी पदयात्रा.
मुंबई : भाजपा युती सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईसह राज्यात मुली व महिलांवरील अत्यचाराच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. एका वर्षात राज्यातून ६४ हजार मुली व महिला बेपत्ता झाल्या आहेत, त्या कुठे गेल्या याचे सरकारकडे उत्तर नाही. तसेच भाजपाचे नेते सातत्याने भडकाऊ विधाने करून धार्मिक वातावरण बिघडवत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सरकार त्यांना पाठिशी घालत आहे. महिला सुरक्षा व सामाजिक शांततेच्या मुद्द्यावर उद्या गांधी जयंती व लालबहाद्दुर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने इंडिया आघाडी आणि सामाजिक संस्था, संघटना यांच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.
इंडिया आघाडीचे मान्यवर नेते व सिव्हिल सोसायटींचे प्रतिनिधी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभाही होणार आहेत. बुधवार दिनांक २ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता ही पदयात्रा हुतात्मा चौक येथून सुरु होईल. त्यानंतर शास्त्री पुतळा, बाळासाहेब ठाकरे पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रीगल थिएटर, एम. जी. रोड, राजीव गांधी पुतळा असे मार्गक्रमण करत महात्मा गांधी पुतळा येथे समाप्त होईल.
