खालापूर तालुक्यात भोलेनाथ धाब्यासह रुचिरा बियर शॉपीजवळील धंदा तेजीत राज भंडारी
रायगड : इंधनाचे दिवसेंदिवस भाव वाढत असल्याने अनेक वाहन चालक पर्यायी इंधनाचा वापर करत आहेत. खालापूर तालुक्यातील भोलेनाथ ढाब्यासह रुचिरा बियर शॉपीजवळ देखिल अशा पर्यायी आणि स्वस्त इंधनाची विक्री बेकायदेशिरपणे होत आहे. खालापूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून कोणत्याही कारवाईचा बडगा उचलला जात नसल्यामुळे बेकायदेशीर डिझेल विक्री करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. यामध्ये पोलीस प्रशासन असो किंवा मग तहसील विभागाचे पुरवठा अधिकारी कारवाई करण्यासाठी मागे का ? असा सवाल उठवला जात आहे.
सामान्य डिझेलच्या किमतीत आणि बायो डिझेलच्या किमतीतील तफावत अशा पद्धतीने व्यवसाय तेजीत आणत आहेत. डिझेल पंप चालकांना त्यामागे कर स्वरूपात शासनाला महसूल द्यावा लागतो, मात्र बायो डिझेल विक्री करणारे मोकाट रस्त्यांवर या डिझेलची विक्री करीत आहेत. राज्यात बायो डीझेल विक्रीवर प्रतिबंध असतानाही अनेक ठिकाणी बायो डिझेलची विक्री जोर धरत आहे. अशातच गेली अनेक वर्षे खालापूर तालुक्यात या डिझेलच्या विक्रीने उच्छाद मांडला आहे. चौक फाटा ते खालापूर या रस्त्यावर भोलेनाथ धाब्यासह रुचिरा बियर शॉपीजवळच्या मागील बाजूस लाखो लिटर बायो डिझेलची दिवसभर साठवणूक करून रात्रीच्या अंधारात विक्री करण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच काही ठिकाणी टँकरमधून ऑईल चोरी देखील केली जात आहे. याठिकाणी पोलिसांची गस्त असते, मात्र रात्रीच्या सुमारास मोठमोठे कंटेनर या धाब्याच्या मागे का जात असावे किंवा मग टँकर या बियर शॉपीच्या मागे का जात असावे ? हे त्यांना दिसत नसावे का ? तसेच तहसील कार्यालयाच्या पुरवठा अधिकाऱ्यांचे त्यांच्या परिसरात लक्ष नाही का ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहेत.
अशाच प्रकारे बेकायदेशिरपणे बायोडिझलची आणि ऑईलची खरेदी – विक्री करणाऱ्या खालापूर तालुक्यातील तस्करांना अभय दिले जात आहे. डिझेल विक्रीचा तसेच ऑईल विक्रीचा कोणताही परवाना नसतानाही बेकायदेशिर साठवणूक आणि विक्री केली जात असून यामध्ये कायदेशीर कारवाईची गरज समोर आली आहे. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक अवैध कामांची माहिती पोलिसांसह तहसील विभागाला देण्यात येते, मात्र अनेक वर्षे हा धंदा तेजीत चालत असूनही येथील लोकप्रतिनिधींचे लक्ष या बेकायदेशीर कामांकडे जाऊ शकले नाही की मग लक्ष दिले जात नाही, असा संभ्रम होत असताना आता तरी पोलीस प्रशासन आणि तहसील विभाग कारवाई करणार का ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
0000