मुंबई: ‘महाराष्ट्र टाइम्स’चे ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण (५३) यांचे मंगळवारी पहाटे विक्रोळी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर विक्रोळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेले काही महिने ते फुप्फुसाच्या विकाराने आजारी होते.
नितीन चव्हाण यांनी गेली २७ वर्षे अत्यंत तळमळीने पत्रकार म्हणून काम केले. गरीब आणि वंचितांच्या वेदना, सामान्य नागरिकांच्या जगण्याचे प्रश्न ते लिखाणातून मांडत असत. मागील २० वर्षांपासून मुंबई महापालिकेचे ते वार्तांकन करीत असत. गेल्या १४ वर्षांपासून ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी दैनिक मुंबई तरुण भारत, सकाळ, सामना येथे पत्रकार म्हणून काम केले. वृत्तपत्र लेखनापासून सुरुवात करणाऱ्या चव्हाण यांनी सामाजिक, नागरी, सांस्कृतिक आदी विविध विषयांवर विपुल लेखन केले. विशेषत: गिरणी कामगारांचे प्रश्न आणि मुंबईकरांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्यांवर त्यांनी आपल्या वार्तांकनातून आवाज उठवला होता. दिवाळी अंकामध्येही त्यांनी आपल्या लेखनाने ठसा उमटविला होता. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या दिवाळी अंकातील त्यांचे लेख वाचकांच्या पसंतीस उतरले. त्यांच्या मुंबई महापालिकेसह अन्य विषयांवरील बातम्यांनी सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांना वाचा फोडली होती. परखड भूमिका मांडणारे लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य होते. कोकणी माणूस आणि मालवणी भाषेवर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. कामगार, झोपडपट्टीवासी, भाडेकरू, मुंबईतील मैदाने, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील लेखनाबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘कॉ. तु. कृ. सरमळकर स्मृती’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.
