मुंबई : अभिनेता गोविंदा यांच्याकडून चुकुन गोळी झाडली गेल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांच्या स्वतःच्याच पायाला गोळी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती मिळत आहे. पहाटे पावणे पाच वाजता ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून पोलिसांनी बंदूक ताब्यात घेतली आहे.

दुर्घटना घडली त्यावेळी गोविंदा एकटेच घरात होती. त्यामुळे नेमकं काय घडलं याबाबत अजून स्पष्टता नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, दुर्घटनेनंतर गोविंदा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अंधेरीच्या क्रिटी केयर रुग्णालयात गोविंदा यांना दाखल करण्यात आलं. गोविंदा यांच्या गुडघ्यात गोळी घुसल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना ICU मध्ये हलवण्यात आलं आहे.

गोविंदा यांची मुलगी टीना आहूजा यांनी एबीपी न्यूजशी फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी गोविंदा यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. टीना आहूजा यांनी सांगितलं की, पप्पांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आता मी जास्त बोलू शकत नाही. पण, पप्पांची तब्येत आता स्थिर आहे. गोळी लागल्यानंतर पप्पांचं ऑपरेशन करण्यात आलं असून ऑपरेशन यशस्वी पार पडलं आहे. सर्व तपासण्या डॉक्टरांकडून सुरू आहेत. त्यांचे रिपोर्ट्स आले असून रिपोर्ट्सही व्यवस्थित आहेत. कमीत कमी 24 तास पप्पांना आयसीयूमध्ये ठेवणार आहे.

गोविंदा यांच्याकडे परवानाधारक पिस्तुल आहे. दुर्घटना घडली त्यावेळी गोविंदा एकटेच घरात होते. त्यामुळे नेमकं काय घडलं हे स्पष्ट होत नाही. पण समोर आलेल्या माहितीनुसार, ते सकाळी बाहेर जाण्यासाठी आपल्या गाडीनं बाहेर जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी गाडीत बसताना गोविंदा यांच्याकडील पिस्तुलमधून चुकून गोळी सुटली आणि ती थेट पायात शिरली, असं सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *