ठामपाकडून लवकरच पाणी अन् कचरा समस्येचा निपटारा होणार

 

ठाणे : मुंब्रा – कौसा भागातील पाणी टंचाई आणि कचऱ्याच्या समस्येविरोधात डॉ..जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार मा. विरोधीपक्ष नेते शानू पठाण यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. आंदोलनाच्या दुसर्‍याच दिवशी ठाणे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाणी आणि कचऱ्याची समस्या मार्गी लावण्याबाबत लेखी आश्वासन दिले.
मुंब्रा भागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा अत्यल्प पुरवठा केला जात आहे. मागणी करूनही पाणीपुरवठा वाढविण्यात येत नाही. तसेच, कचरादेखील उचलण्यात येत नाही. या निषेधार्थ ठामपाच्या मुंब्रा येथील पाणीपुरवठा विभागासमोर शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनात बाबाजी पाटील, सुनिता सातपुते, हिरा पाटील, फरजाना शेख, रेहान पितलवाला, साकीब दाते, मैशर शेख, नाजीम बुबेरे,  शोएब खान,  शाकिर शेख, जाहीद राजपूत  कमरून हुदा  यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, पुरूष आणि लहान मुले सहभागी झाले होते.  याप्रसंगी,  पठाण यांनी, गेल्या 15 दिवसांपासून 3-3 दिवस पाणीपुरवठाच करण्यात येत नाही. काही ठिकाणी पाणी माफियांकडून पंप लावून पाणी खेचले जात आहे. टँकर माफिया खुलेआम पाण्याची विक्री करीत आहेत. विकण्यासाठी पाणी आहे. मात्र, गोरगरीबांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दुसरीकडे कचरा उचलण्यासाठी कोट्यवधींचे ठेके दिले जात आहेत.   शहराच्या विविध भागातील कचरा हटवण्यात येत नाही. अगदी मंदिराच्या आवारातील, मंदिर परिसरातील शाळेजवळील  कचराही उचलण्यात येत नाही, असा आरोप करीत पाणी माफियांवर मोक्का लावण्याची मागणी केली होती. या आंदोलनात सामान्य नागरिकांचा सहभाग वाढल्यानंतर आज (मंगळवारी) ठाणे पालिकेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळ गाठले. ठाणे महानगर पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता विनोद पवार , मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त बाळू पिचड,  मुंब्रा पाणीपुरवठा विभागाचे साळुंखे , घनकचरा विभागाचे एकनाथ मोतीलाल  यांनी शानू पठाण आणि आंदोलकांची भेट घेऊन पाणी, कचरा यासर्व सर्व समस्यांचा निपटारा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळेस विनोद पवार यांनी, पाणी चोरी रोखण्यासाठी मोहीम आखण्यात येईल; तसेच,  वाॅलमेन्स वाढविण्यात येणार आहेत. शिवाय, पाणीचोरांवरही कडक कारवाई करण्यात येईल,  असे जाहीर केले. तर बाळू पिचड यांनी कचर्याबाबत योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन दिल्याने आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. मात्र, ठाणे पालिकेने मुंब्रा – कौसाबाबत अशीच सापत्न भावाची दृष्टी ठेवली तर अत्यंत उग्र आंदोलन छेडण्यात येईल,  असा इशारा शानू पठाण यांनी दिला.
चौकट
मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
एकीकडे पाणी आणि कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी आंदोलक धरणे आंदोलन करीत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण या शेकडो महिलांसह आंदोलनात सहभागी झाल्या. कौसा, अमृतनगर, रशीद कपाऊंड आदी भागातील महिला मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने येऊन आंदोलनात सहभागी झाल्या.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *