न्यायाच्या प्रतीक्षेतील ९५० दाव्यांचा निकाल
ठाणे : लोकअदालतीच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर न्यायालयावरील ३१,१२५ दाव्यांचा मोठा भार कमी झाला. त्याचबरोबर तब्बल एक अब्ज ५९ कोटी ६७ लाख १९ हजार ४३० रुपयांची भरपाई पक्षकारांना मिळवून देण्यात यश आले आहे. इतकेच नव्हे तर वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले ९५० दावेदेखील निकाली काढून पक्षकारांना न्याय मिळवून देण्यात आला आहे. या दाव्यांमध्ये ३० वर्षे जुन्या प्रकरणांचाही समावेश होता. ठाणे जिल्ह्याचे प्रमुख सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे न्यायालयाने ही मोलाची कामगिरी केली.
न्यायालयाची पायरी चढण्यासाठी अनेकांकडून टाळले जाते. न्यायालयात चालणारी धीमी प्रक्रिया आणि खर्चिक बाब याला कारणीभूत होती, परंतु आता सर्वसामान्यांचा न्यायालयाच्या कामकाजावरील विश्वास वाढू लागला आहे. आता सर्वसामान्यांनाही विनाखर्च आणि विनाविलंब झटपट न्याय मिळू लागला आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य विधी सेवा प्राधिकरणाने जिल्हा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक चार महिन्यांनी अशा प्रकारची लोक अदालत भरवून त्यात पक्षकारांच्या आपसातील तडजोडीतून प्रलंबित आणि दाखल पूर्व दावे निकाली काढले जातात. ठाणे आणि पालघर न्यायालयात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठ्या प्रमाणात दावे निकाली काढून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना न्याय मिळवून देण्यात आला.
मागील ३०, २० आणि १० वर्षांपासून न्यायाची प्रतीक्षा असलेल्या दाव्यांनाही न्याय देण्यात आला. या प्रकारचे ९५० दावे तडजोडीतून निकाली काढून पक्षकार आणि न्यायालयाचा अमोल वेळ बचत केला आहे, तर अनेक वर्षांपासून हे दावे रखडलेले असल्यामुळे पक्षकरांना वारंवार न्यायासाठी न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागतात, परंतु राष्ट्रीय लोकअदालतीत त्यांची समाधानकारक सोडवणूक करण्यात आल्यामुळे आता या पक्षकारांना न्यायालयात यावे लागणार नाही. मोटार अपघात प्रकरणांतदेखील लोकअदालतीत अतिशय समाधानकारक निर्णय झाला. अशा दाव्यांपैकी एका प्रकरणात ४.५० कोटींची तडजोड करून मयताच्या वारसाला मोठी मदत मिळवून दिली, तर जिल्ह्यातील २१७ अपघात प्रकरणे निकाली काढून पीडितांना २६ कोटी ८० लाख ४९ हजार ७२२ रुपयांची मदत मिळवून दिली. राष्ट्रीय लोकअदालतीत व्हिडिओ काॅन्फरन्स यांसारख्या इलेक्ट्राॅनिक साधनांचा मोठ्या प्रमाणत वापर करून अनेक प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड करण्यात आली.