सन्मान युवा प्रतिष्ठानचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष, एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती
ठाणे : शहरातील वर्तकनगरच्या पावन नगरीत यंदा शारदीय नवरात्रोत्सवासाठी तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात येत आहे. सन्मान युवा प्रतिष्ठानचे संस्थापक आयोजक राजेंद्र फाटक व शिवसेनेच्या माजी नगरसेविका राधिका फाटक यांच्या सौजन्याने होत असलेल्या या नवरात्रौत्सवात यंदा तिरुपती बालाजी मंदिराच्या देखाव्यात प्रभु श्री रामाची, बालाजीची मूर्तीच्या मधोमध देवी अंबे माँ विराजमान होणार आहे. त्यामुळे, भाविकांना भक्तिचा त्रिवेणी संगम अनुभवता येणार आहे. सन्मान युवा प्रतिष्ठानचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असुन या नवरात्रौत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आयोजक राजेंद्र फाटक व राधिका फाटक यांनी दिली. याप्रसंगी शिवसेना सचिव अभिनेता सुशांत शेलार, उपविभाग प्रमुख समिर उरणकर, शाखाप्रमुख अनिल भोईर आदी जण उपस्थित होते.
ठाण्यातील वर्तकनगर येथील दत्तमंदिर जवळील ठा.म.पा. शाळा क्रमांक ४४ च्या पटांगणात सन्मान युवा प्रतिष्ठानच्यावतीने गेली २४ वर्षे सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा केला जातो. यंदा २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृतीचा प्रेक्षणीय देखावा पाच हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये ४० बाय ६० फुटांच्या आकारात साकारण्यात येत आहे. दररोज ब्राम्हणांच्या साक्षीने होम हवन विधी करण्यात येणार आहे. यावर्षी सुशांत शेलार प्रस्तुत सन्मान दांडीयाचे आयोजन करण्यात आले असून अक्षया आयर, सावनी रवींद्र, आनंदी जोशी, रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, आदिश तेलंग, मयूर सुकीळे, राहूल मुखर्जी आदी अनेक मराठी कलाकार दांडियामध्ये सहभागी होणार आहेत. या नवरात्र उत्सवात शेवटचे दोन दिवस फॅन्सी ड्रेस स्पर्धा तर दररोज रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाटक यांनी दिली. या उत्सवात लाडक्या बहिणींसाठी खेळ रंगला पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला चार चांद लावण्यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित राहणार असून मंगळवारी ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती आयोजक राजेंद्र फाटक व राधिका फाटक यांनी दिली.
00000
