वसई : वसई-विरार महापालिकेच्या क्षेत्रात क्षयरोगमुक्तीसाठी प्रशासनाकडून शोधमोहीम राबवली जात आहे. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत एकूण ६९२ रुग्ण समोर आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास आहे. नागरीकरण मोठ्या प्रमाणात असल्याने महापालिकेच्या क्षयरोग विभागाकडून सक्रिय क्षयरोग शोधमोहीम राबवली जात आहे. क्षयरोगमुक्त वसई-विरार असे मिशन राबवले जात आहे. घरोघरी जाऊन नागरिकांना लक्षणे आढळत आहेत का, याची माहिती घेत मार्गदर्शन व निदान, उपचाराची व्यवस्था केली जात आहे. अशा रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
माहितीपत्रक, दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, वजन घटणे, थुंकीवाटे रक्त येणे, छातीत दुखणे, मानेवरील गाठ आदी लक्षणे या रुग्णांत आढळतात. महापालिकेने थुंकीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेची व्यवस्था केली आहे. विनामूल्य एक्स-रे यासह केंद्र सरकारची निक्षय मित्र ही संकल्पनादेखील सुरू केली आहे. रुग्णांना दत्तक घेण्याचे आवाहनदेखील केले आहे. त्यामुळे अनेक दाते समोर आले व रुग्णांना अन्नपुरवठ्यासाठी रुग्णाला कोरडा शिधा, फळे, अंडी, दूध, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, व्यवसाय उभारणी, आर्थिक साह्य अशी मदत करता यावी, म्हणून प्रशासन प्रयत्न करत आहे.
ऑगस्टमध्ये ४२१, तर सप्टेंबरमध्ये २७१ क्षयरोग रुग्ण तपासणीमध्ये समोर आले आहेत. ऑगस्टमध्ये रुग्णाची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. त्यापैकी जे रुग्ण महापालिका क्षेत्रात उपचार घेत आहेत, त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे.
वसई-विरार शहरात सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबवली जाते. ज्यामुळे रुग्णांना त्वरित उपचार मिळतील, हा उद्देश आहे. आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून सर्व्हे केला जात आहे. त्यानुसार दोन महिन्यांत जे रुग्ण आढळले, त्यांना उपचाराची योग्य माहिती देण्यात येत आहे.
औद्योगिक वसाहत, तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम सुरू आहे. ज्यामुळे लक्षणे, निदान व उपचार घेणे सोईचे होत आहे. महापालिकेकडून आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करता यावी, यासाठी दात्यांना आवाहन केले जात असते.
