अनिरुद्ध पोटावाडने यंदा देखील विजेतेपद राखले

 

मुंबई : चेंबूर जिमखान्याने क्रिस्टल कम्युनिटी हॉल, जेड १ आणि जेड २ हॉलमध्ये आयोजित केलेल्या दुसऱ्या ऑल इंडिया फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत यंदा देखील गत विजेत्या अनिरुद्ध पोटावाडने चमकदार कामगिरी करताना विजेतेपद कायम राखले. अनिरुद्धने या स्पर्धेत ९ पैकी ८.५ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. पारस भोईर आणि अर्णव कोळी यांचा अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक लागला. आयएम समीर खाटमाळे यांनी ९ पैकी ८ गुणांची कमाई केली. आयएम सौम्या स्वामीनाथनने या स्पर्धेत ९ पैकी ७ गुणांची कमाई केली. स्पर्धेचे संयोजक आणि सीजी बुद्धिबळ विभागाचे सचिव बाळकृष्ण परब यांनी खेळाडूंचा मिळालेला मोठा प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी चेंबूर जिमखान्याला स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व संबंधित बुद्धिबळ संघटनांचे आभार मानले. मध्य उपनगरातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ६०९ खेळाडूंचा सहभाग लाभला होता. या स्पर्धेत एकूण २ लाख रुपयांची पारितोषिके होती. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *