नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांच्या प्रती आपुलकी जपत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केला जाणारा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन समारंभ वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात ज्येष्ठांच्या उत्साही उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाला.
याप्रसंगी ऐरोली विधानसभा सदस्य गणेश नाईक, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, समाजविकास विभागाचे उपआयुक्त .किसनराव पलांडे, वाशी विभागाचे सहा.आयुक्त सागर मोरे, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे व मुंबई प्रादेशिक विभाग अध्यक्ष सुरेश पोटे, समाजविकास अधिकारी सर्जेराव परांडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई हे शहर एखादया कुटुंबासारखे असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या भावनांचा आदर केला जातो. अशी एकात्म संस्कृती नवी मुंबईत जपली जात असून नवी मुंबई महानगरपालिकाही ज्येष्ठांबाबत आपुलकीने सेवाभावी काम करते असे सांगत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार गणेश नाईक यांनी ज्येष्ठांना संपर्क साधता येईल अशी हेल्पलाईन सुरु करण्याची सूचना केली. वय वाढले म्हणून निराश न होता सकारात्मक भावना जोपासण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी वृध्द होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी शारीरिक व्यायाम व तणावरहीत जीवन जगण्यासाठी धावपळीच्या जीववशैलीत थोडा वेळ काढून आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर व्यक्त करीत विविध सेवासुविधांच्या माध्यमातून महानगरपालिका कल्याणकारी काम करीत असल्याचे सांगत आयुक्तांनी मोठयांचे मार्गदर्शन महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले व यादृष्टीने ज्येष्ठांनी आपले सामाजिक अनुभव व विचार महापालिकेकडे पाठवावेत, जेणेकरुन त्यांचा उपयोग लोकाभिमुख प्रशासन राबविताना कामकाजात सुधारणा करण्यासाठी होईल असे आवाहन केले. तसेच महानगरपालिका शाळांमध्येही ज्येष्ठांनी विदयार्थ्यांच्या विकासासाठी काही वेळ दयावा असेही त्यांनी सांगितले.
अतिरिक्त आयुक्त . सुनिल पवार यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठांसाठी राबविण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती देत ज्येष्ठांनी आधार देण्याचे काम करावे असे सांगितले. समाजविकास विभागाचे उपआयुक्त .किसनराव पलांडे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात या कार्यक्रमाची आयोजनामागील भूमिका विशद केली.
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष .अण्णासाहेब टेकाळे यांनी नवी मुंबई हे देशातील सर्वात शांत व सुंदर शहर असल्याची भावना व्यक्त करीत ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र सुरु करणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका असल्याचा अभिमान व्यक्त केला. नवी मुंबई इतक्या मोठया प्रमाणात ज्येष्ठांसाठीच्या सुविधा इतर कोणत्याच शहरात दिल्या जात नाहीत असेही ते म्हणाले.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कॅरम, बुध्दीबळ, ब्रिझ, एकपात्री अभिनय, वेशभूषा, काव्यवाचन, गायन, नृत्य, कथाकथन, हास्य, टेलिफोन, टपाल पत्रलेखन, निबंध अशा विविध स्पर्धांमधील विजेत्या ज्येष्ठ नागरिकांना मान्यवरांच्या शुभहस्ते रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
त्यासोबतच विवाहाचा सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या 13 ज्येष्ठ दाम्पत्यांना तसेच वयाचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या 131 ज्येष्ठ नागरिकांचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या गीत, नृत्य वादयवृंदात ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फुर्तपणे सहभागी होत हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन समारंभ उत्साहात साजरा केला.
000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *