कसबा बावड्यात छ. शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे होणार अनावरण
मुंबई : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधीपक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार अशी माहिती काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.
राहुल गांधी यांचा ४ व ५ ऑक्टोबर २०२४ रोजी कोल्हापूर दौरा असून ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे.५ तारखेला राहुल गांधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत, असे सतेज पाटील यांनी सांगितले.
