अनिल ठाणेकर
ठाणे : मानवता, करुणा आणि एकता ही शिकवण देणाऱ्या साई बाबांना धर्माच्या चष्म्यातून पाहणाऱ्यांची खरंच कीव येते. साईबाबांना नाकारणे हे सनातन धर्माच्या रक्षणासाठी नसून धार्मिक असहिष्णुतेचा अजेंडा पुढे नेणारी कृती आहे. आपण अशा घटनांविरोधात उभं राहणं गरजेचं आहे. अन्यथा, आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे रूपांतर केवळ कट्टरता आणि द्वेषात होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर व्यक्त केले. उत्तर प्रदेशातील १४ मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या गेल्या, ही अत्यंत क्लेषदायी घटना कानावर आली. हे हिंदू धर्माच्या खऱ्या तत्वाच्या अगदी विरोधात आहे. हिंदू धर्म आपल्या सर्वसमावेशकता आणि स्वीकृतीसाठी ओळखला जातो.
अध्यात्मिक विचार आणि आचरणात विविधता स्वीकारणारा हिंदू धर्म आहे. महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात पूज्य असलेल्या साईबाबांचा सनातन धर्माशी संबंधच नसल्याचा दावा करणं ही श्रद्धा नव्हे तर द्वेष आहे. लाखो-करोडो साईभक्तांच्या मनाला ठेच पोहोचवणाऱ्या या संस्थेविरोधात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंभीर दखल घेऊन.
कडक कारवाई करायलाच हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
