उपसभापती झिरवाळांसह सत्ताधारी आदिवासी आमदारांनी न्यायासाठी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी
सरंक्षक झाळीमुळे बचावले. झिरवाळांना अश्रु अनावर
स्वाती घोसाळकर
मुंबई : महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत आणि त्यातही मंत्रालयात आज आदिवासी आमदारांनी आपल्या न्याय हक्कासाठी एल्गार पुकारला. विधानसभेचे उपसभापति आणि सत्ताधारी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळांसह, किरण लहामटे, राजेश पाटील आणि हेमंत सावरा यांनी सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधण्यासाठी चक्क मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उड्या घेतल्या. सुदैवाने संरक्षक जाळी असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. पण याघटनेदरम्यान झिरवळांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीन वैद्यकीय सुवीधा उपलब्ध करून देण्यात आली.
धनगर आणि धनगड एकच असल्याचा जीआर राज्य सरकारने काढला आहे. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून त्यातूनही धनगड प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, यासाठी आदिवासी आमदारांकडून विरोध केला जात आहे. तसेच गेल्या १५ दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांकडून पेसाभरती अंतर्गत भरतीसाठीही आंदोलन करत आहेत. मात्र यावर कुठलाही तोडगा निघत नसल्याने आज आदिवासी आमदारांनी टोकाचे पाऊल उचलत थेट मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या घेतल्या.
यामुळे मंत्रालयात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर मीडियाशी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना अश्रु अनावर झाले.
मागील 15 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी पेसा कायद्याअंतर्गत भरती करा, या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहा दिवसांपासून आम्ही वेळ मागत आहोत. मात्र, ते देखील आम्हाला भेट देत नाहीत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यात याबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही तुमच्या विषयाबाबत सकारात्मक आहोत, असे आश्वासन झिरवाळ यांना दिले. मात्र कुठलाही निर्णय न झाल्याने आदिवासी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्या.
आमच्या मुलांना वाचवा हो…
यानंतर नरहरी झिरवाळ म्हणाले की, आमच्या आदिवासी समाजाचे शंभराहून अधिक मुलांनी काही बरे वाईट करायला नको म्हणून माझी शासनाला विनंती आहे की, शासनाने तत्काळ तिथे जाऊन विद्यार्थ्यांना सुरक्षा द्यावी. आमच्या मुलांना वाचवा अशी आर्त सादही त्यांनी स्वताच्याच सत्तेतील सहकाऱ्यांना घातली. आधी मी आदिवासी आहे आणि नंतर विधानसभा उपाध्यक्ष झालो आहे. ज्या आदिवासी समाजाने आम्हाला निवडून दिले आहे. त्यांचे सण उत्सव सगळे इकडेच होत असतील तर आमचा काय उपयोग आहे? १५ दिवसांपासून आमचे मुले आंदोलन करत आहेत. एखाद्या नेत्याने तरी त्यांच्याकडे येऊन पाहिले का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
झिरवाळांना हे शोभत नाही –संजय शिरसाट
नरहरी झिरवाळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. हे घटनात्मक पद आहे. या पदावर असणाऱ्या झिरवाळ यांनी असे कृत्य करणं अशोभनीय आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सरकार विचार करत आहे. त्यामुळे झालेला प्रकार अयोग्य आहे. यामुळे नाहक लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो अशी प्रतिक्रीया शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली.
सगळा पोरकटपणा चाललाय…
राज ठाकरे झिरवाळांवर भडकले
मुंबई : सगळा पोरकटपणा चाललाय. या सगळ्यांनी झाळ्यानसलेल्या बिल्डींगवरून उडया माराव्या आणि प्रायश्चित घ्यावे अशा तिकीट शब्दात राज ठाकरे यांनी झिरवाळांच्या आंदोलनावर तिखट प्रतिक्रीया नोंदविली. राज ठाकरेंनी समाज माध्यमांवर पोस्ट केलेली प्रतिक्रीया जशीच्या तशी
“सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आणि इतर दोन आमदारांनी , आदिवासी समाजवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून, म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध ? सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं म्हणणं शक्य नव्हतं, म्हणून ‘जनतेच्या सेवेला सत्ता हवी’, म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना? सत्ता आली तरी तुम्ही स्वतःचं सोडून कोणाचंही भलं करू शकत नाही हे नक्की. बरं मुळात तुम्ही सत्ताधारी, त्यात पुन्हा संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय? आदिवासी जनतेबद्दल खरंच कळवळा असेल तर, आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी, ज्यांनी आदिवासी हे मागासच राहतील हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवली आहे. त्या सर्कसीत तोफेच्या आत जाऊन नंतर तिकडून बाहेर जाळ्यात फेकला जाणारा माणूस आठवतोय? तसं या सगळ्यांचं झालं आहे, आता जनतेच्या तोफेच्या तोंडी जायची वेळ आली आहे, मग आपणच स्वतः जाळ्यावर उड्या मारा. माझी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की यांना तोफेच्या तोंडी जाणं म्हणजे नक्की काय असतं हे या निवडणुकीत दाखवूनच द्या. तुम्हाला गृहीत धरायचं, तुमच्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद करायच्या आणि नंतर स्वतः पोरकट चाळे करायचे, या सगळ्याला झटका देण्याची, ही विकृत झालेली व्यवस्था उलथवून टाकण्याची संधी आजपासून काही आठवड्यात तुम्हाला येणार आहे. आणि या वेळेस जर तुम्ही योग्य पाऊल उचललं नाहीत तर मात्र हे लोकं परिस्थिती अधिक विदारक करतील आणि संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट करतील. तेंव्हा वेळ जायच्या आत जागे व्हा !”
– राज ठाकरे