२८८ आमदारांमध्ये राज्यात प्रश्न मांडण्यात आमदार विनोद निकोले यांचा सातवा क्रमांक, ‘संपर्क’ संस्थेच्या अहवालात कामगिरीवर शिक्कामोर्तब

अनिल ठाणेकर

ठाणे : १४ वी विधानसभा येत्या नोव्हेंबर महिन्यात विसर्जित होणार असून सन २०१९ ते २०२४ या पंचवार्षिक काळात विधिमंडळाचे एकूण १२ अधिवेशने पार पडली या अधिवेशनात राज्यातील आमदारांनी ५९२१ प्रश्न सभागृहात मांडले. त्यापैकी एकूण २३७ प्रश्न हे १२८ डहाणू (अ. ज.) विधानसभेतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी मांडून पालघर जिल्ह्यात सर्वाधिक प्रश्न मांडत अव्वल स्थान पटकावले असल्याचे ‘संपर्क’ या संस्थेने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.  तर राज्यातील विधानसभेच्या २८८ आमदारांमध्ये प्रश्न विचारणाऱ्या आमदारांत त्यांचा सातवा क्रमांक येतो.

मुंबईस्थित ‘संपर्क’ या धोरणविषयक अभ्यास व पाठपुरावा करणाऱ्या संस्थेने महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजाचे विश्लेषण केले. नुकतेच याबाबतचे अहवाल त्यांनी प्रकाशित केला आहे. त्यानुसार सन २०१९ ते २०२४ या काळातील विधिमंडळातील १२ अधिवेशनात 131 दिवसांच्या कामकाजात उपस्थित केले गेलेल्या तारांकित प्रश्न व लक्षवेधी सूचना या माहितीचे विश्लेषण अहवालात करण्यात आले आहे. १४ व्या विधानसभेत कोविडमुळे ३ अधिवेशने रद्द केली गेली. सन २०२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या रहित केला गेला. या विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याची संधी मागील विधानसभेच्या तुलनेत आमदारांना कमी मिळाली. राज्यातील वांद्रे पश्चिम चे आमदार आशिष शेलार यांनी बालक विषयी २८ प्रश्न तर आरोग्य विषयासंदर्भातील सर्वाधिक ८२ प्रश्न मांडले तर अमीन पटेल यांनी महिला विषयक २१ आणि शिक्षक विषय ४५ प्रश्न मांडले तर डहाणूचे मार्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी आदिवासी विषयक सर्वाधिक २१ प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यातील विविध आमदारांनी सर्वसाधारण एकूण ५९२१ तारांकित प्रश्न उपस्थित केले, तर २१३० लक्षवेधी सूचना मांडल्या. राज्यात पहिल्या क्रमांकावर आमदार अमीन पटेल यांनी ६५६ तारांकित प्रश्न मांडले. तर दुसरा क्रमांक आमदार आशिष शेलार यांनी ६३०, तर तिसऱ्या क्रमांकावर आमदार असलम शेख यांनी ५३२, तर चौथ्या क्रमांकावर आमदार मनीषा चौधरी यांनी ४५९, पाचव्या क्रमांकावर आमदार कुणाल पाटील यांनी ३५७, तर सहाव्या क्रमांकावर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ३१६ तर आमदार विनोद निकोले यांनी २३७ पैकी २१ आदिवासींबाबत प्रश्न मांडले आहेत. यावरून असे सिद्ध होते की, पालघर जिल्ह्यात देखील सर्वाधिक तारांकित प्रश्न आमदार विनोद निकोले यांनी मांडून अव्वल क्रमांक पटकावला आहे.

चौकट

मी पहिल्यांदाच विधानसभेत आमदार म्हणून निवडून आलो. विधिमंडळ कामकाजात माझे स्वीय सहाय्यक श्री शाहरुख मुलाणी यांचे उत्कृष्ट लिखाण काम असल्याने त्यांची मोलाचे सहकार्य मिळाले. राज्यातील पहिल्या सात सरस आमदारांमध्ये माझी निवड ‘संपर्क’ संस्थेच्या अहवालातून स्पष्ट होते. याबद्दल खरंच अभिमान आहे. शेतकरी, कामगार, आदिवासी तसेच इतर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी जनतेने मला विधानसभेत पाठवले आहे. पुढे देखील पाठवावे जेणेकरून अधिक काम करण्याची संधी मिळेल असे डहाणू विधानसभेतील मार्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार निकोले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *